ज्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले त्यांना विमा मिळालाच पाहिजे – आ. अभिमन्यू पवार.
विमा कंपनी व राज्य सरकारला न्यायालयात जाब विचारणार..
यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीचे शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी.
निलंगा, -(प्रशांत साळुंके)- ज्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले आहे ते सर्व शेतकरी विमा मिळण्यासाठी पात्र आहेत. ज्या अर्थी अतिवृष्टीचे अनुदान मिळाले आहे. त्याअर्थी नुकसान झाल्याचे मान्य आहे.कृषी, महसूल व जिल्हा परिषद यंत्रणेने पंचनामे केले आहेत. यंत्रणा तिच आहे. यामुळे शासकीय पंचनामे ग्राह्य धरून ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले आहे. त्या शेतकऱ्यांना विमा मिळालाच पाहिजे यासाठी आपण विमा कंपनी व राज्य सरकारला औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून जाब विचारणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले आहे.
दि. ३० सप्टेंबर रोजी मदनसुरी (ता. निलंगा) येथे अतिवृष्टीने बाधीत पाहाणी दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने अपेक्षित उत्पादनाची घट पन्नास टक्के पेक्षा कमी असेल तर पंचवीस टक्के आगाऊ नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. यानूसार लातूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे या मागणीचे निवेदन दिले होते. हि मागणी रास्त असल्याने जिल्हाधिकारी यांनी याबाबत विमा कंपनीला निर्देश दिले होते. मात्र विमा कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र धुडकावून लावले ऐवढी मुजोर विमा कंपनी विरोधात जिल्हाधिकारी यांनी न्यायालयात जायला पाहिजे होते. एकंदरीत विमा कंपनीच्या या मुजोर निर्णयाविरोधात आपण अगोदरच न्यायालयात याचिका दाखल करून सदरील पंचवीस टक्के आगाऊ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. आणि ती मिळालीच पाहिजे. सरकारने कितीही पळवाट केली तरी आपण सोडणार नसल्याचे सांगून विमा कंपनी व राज्य सरकारला न्यायालयात जाब विचारणार आहे. शेवटी शेतकऱ्यांचा वकील म्हणून मी लढणार असल्याची भूमिका स्पष्ट करीत.यावर्षी परिस्थिती तशीच आहे सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टीने सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आशा परिस्थिती शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. आपत्ती काळात शेतकऱ्यांना मदत करणे हि शासनाची जबाबदारी असल्याचे सांगून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अन्यथा या विरोधातही आपली न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी बोलताना सांगितले
.यावेळी भाजपचे कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, परमेश्वर बिराजदार, नितिन मुळे, प्रताप घोटाळे, संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, कृषी मंडळधिकारी आदी शेतकरी उपस्थित होते. यावेळी नदी हत्तरगा, एकोजी मुदगड, लिंबाळा, भंगार चिंचोंली, धानोरा, बामणी, सांगवी, जेवरी आदी गावांचा दौरा करण्यात आला.
पालकमंत्र्यांनी दौरा करावा.
औसा विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आशा परिस्थिती पंचनामे करुन नुकसानीची माहिती घेणे हि कासवगतीने चालणारी प्रक्रिया आहे. संबंधित नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख यांनी पाहणी दौरा करावा व प्रत्यक्ष नुकसान पाहावे असेही मत बोलताना आ. अभिमन्यू पवार यांनी यावेळी व्यक्त केला.











