उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी उदयगिरी महाविद्यालय कटिबद्ध – मल्लिकार्जुन मानकरी
उदगीर : ( दिनांक २६ जून २०२२ ) शैक्षणिक क्षेत्रात उदगीरची वेगळी ओळख आहे. त्यामुळे शिक्षणासाठी उदगीर सोडून जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी उच्च दर्जाचे शिक्षण देण्याकरिता महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे मत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित उदगीर शहरातील दहावी शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, पालक व मुख्याध्यापक सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष ॲड. प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव डॉ. आर. एन. लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर, सदस्य शिवाजी हुडे, प्रशांत पेन्सलवार, सुभाष धनुरे, बसवराज पाटील नागराळकर, प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एम. संदीकर, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य प्रा. सी. एम. भद्रे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संस्था सचिव रामचंद्र तिरुके म्हणाले, लातूर पॅटर्नची सुरुवात उदगीर पासून झाली असून उदगीरमधील पालकांना मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी वाटत असलेली चिंता दूर करण्याच्या दृष्टीने ‘कोटा पॅटर्न’ महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातून राबविला जाणार आहे. लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक केंद्र महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाला बनविण्याच्या दृष्टीने सर्व शिक्षक व पालकांनी पुढे यावे, असे आवाहन उपस्थितांना केले.

सदस्य बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयावर पालकांनी विश्वास ठेवावा. आपले पाल्य उज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात प्रवेशित करावे, असे उपस्थितांना सांगितले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उदगीर शहरातील मुख्याध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. एम. संदीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जाहूरे यांनी तर आभार प्रा. प्रसाद जालनापूरकर यांनी मानले. सत्कार समारंभासाठी उदगीर शहरातील मुख्याध्यापक, शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.




