दिन विशेष
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार हे जन्मजात देशभक्त होते. शालेय वयापासूनच देश आणि समाज यांच्याबद्दल त्यांच्या मनात कळकळ होती. याबाबत आजूबाजूला होणाऱ्या घटना आणि चर्चा यांना ते आपल्या परीने प्रतिसादही देत. शाळेत ‘वंदे मातरम’ घोषणा देणे असो की, राणीच्या राज्यारोहणाची मिळालेली मिठाई कचऱ्यात फेकून देणे असो; त्यांची देशभक्ती, स्वाभिमान यांचे दर्शन होते. जसजसे वय वाढत गेले तसतसा या भावनेचा विस्तार झाला आणि त्यासाठीचे प्रयत्नही अधिक ठोस झाले. सुरुवातीला असलेले क्रांतिकार्याचे आकर्षण नंतर ओसरले आणि ते काँग्रेसच्या प्रवाहात सामील झाले. ते मुळात टिळक पंथाचे असले तरीही, १९२० साली काँग्रेसमध्ये गांधीयुग सुरू झाल्यावर त्यातही मनापासून पूर्ण शक्तीने सहभागी झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांची वर्गवारी न करता, प्रत्येकाने आपल्या वृत्तीनुसार प्रयत्न करावे आणि सगळ्यांनी त्या सगळ्या मार्गांबद्दल आस्था ठेवावी; असेच त्यांचे मत होते. अशातच १९२० साली नागपूरला काँग्रेसचे अधिवेशन झाले. डॉ. हेडगेवार त्या अधिवेशनात स्वागत समिती, सफाई समिती व स्वयंसेवक समितीचे सदस्य होते. या अधिवेशनात काँग्रेसने असहकार आंदोलनाची घोषणा केली आणि डॉ. हेडगेवार यांनी त्यात स्वतःला झोकून दिले.

विद्यार्थ्यांनी शाळा सोडाव्या, लोकांनी न्यायालयावर बहिष्कार घालावा, सरकारने दिलेल्या पदव्यांचा त्याग करावा, राष्ट्रीय शाळा सुरू कराव्या, घरोघरी चरखा हाती घ्यावा; या गोष्टींचा प्रचार सुरू झाला. सभा, परिषदा सगळीकडे हाच विषय राहत असे. भरीसभर गांधीजींनी ‘एक वर्षात स्वराज्य’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला होता. डॉ. हेडगेवार सुद्धा गावोगावी जाऊन या आंदोलनाचा प्रचार करीत होते. मध्य प्रांत तर त्यांनी पिंजून काढलाच पण मुंबई इलाख्यात सुद्धा ते डॉ. नारायणराव सावरकर यांच्यासोबत प्रचाराला गेले होते. ते गांधीजींच्या असहकार आंदोलनात सहभागी झाले होते तरीही त्यांची भाषणे त्यांच्या स्वभावाप्रमाणे जहाल आणि आक्रमक असत. कधीकधी तर काही लोक ‘डॉ. हेडगेवार यांना कशाला भाषणाला बोलावता’ अशी कुरकुर सुद्धा करत.
इ. स. १९२१ च्या सुरुवातीला डॉ. मुंजे व डॉ. हेडगेवार यांनी भंडारा, खापा, केळवद, तळेगाव दशसहस्र, देवळी, वर्धा, बोरी अशा अनेक गावी व ठिकठिकाणी जिल्हा परिषदातून भाषणे केली. त्यांच्या सभेनंतर विदेशी कापडाच्या होळ्याही होत असत. त्यांच्या या जहाल प्रचाराच्या परिणामी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्यावर एक महिन्याचा निर्बंध लावण्यात आला. २३ फेब्रुवारी १९२१ रोजी जिल्हाधिकारी सिरील जेम्स आयर्विन यांनी हा निर्बंध आदेश बजावला होता. सरकारविरोधात असहकार पुकारलेल्या डॉ. हेडगेवार यांनी मात्र हा निर्बंध धुडकावून लावला आणि दौरे, सभा, भाषणे सुरूच ठेवले. त्यामुळे त्यांच्यावर १९२१ च्या मे महिन्यात दंड विधानाच्या कलम १०८ अनुसार राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. परंतु हा खटला निर्बंध मोडल्याबद्दल न भरता, काटोल व भरतवाडा येथील भाषणे आक्षेपार्ह ठरवून त्यासाठी भरण्यात आला.

३१ मे रोजी नागपुरात न्या. सिराज अहमद यांच्यापुढे हा खटला उभा राहिला. अन प्राथमिक सुनावणीनंतर लगेच १४ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आला. १४ जून रोजी श्री. Smelly हे न्यायाधीश होते. डॉ. हेडगेवार यांच्या वतीने ऍड. बोबडे, ऍड. विश्वनाथ केळकर, ऍड. बाबासाहेब पाध्ये, ऍड. हरकरे व ऍड. बळवंतराव मंडलेकर काम पाहत होते. १४ जून रोजी पोलीस अधिकारी आबाजी यांची साक्ष झाली आणि १५ जून रोजी ऍड. बोबडे यांनी त्यांची उलटतपासणी घेतली. मात्र उलटतपासणी घेताना न्यायाधीश सतत अडथळे आणत राहिले. तेव्हा संतापून ऍड. बोबडे न्यायालयातून निघून गेले. त्यानंतर ‘आपण खटला दुसरीकडे हलवण्याची मागणी करणार असल्याने सध्या खटल्याचे काम स्थगित करावे’ अशी मागणी डॉ. हेडगेवार यांनी केली. त्यामुळे दुपारी दीड वाजता काम थांबले.
आपला खटला दुसऱ्या न्यायालयात चालवावा असे निवेदन डॉ. हेडगेवार यांनी २५ जून रोजी जिल्हाधिकारी आयर्विन यांच्याकडे पाठवले. २७ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन फेटाळले. अन खटला पुन्हा त्याच न्यायालयात सुरू झाला. यावेळी डॉ. हेडगेवार यांच्या बाजूने एकही वकील उपस्थित नव्हता. न्यायाधीशांनी डॉ. हेडगेवार यांना लेखी जबाब देण्यास सांगितले. त्यावर, ‘सर्व साक्षीपुरावे ऐकल्यावर जबाब देईन’ असे ते म्हणाले. ८ जुलै १९२१ रोजी खटला पुन्हा सुरू झाला. त्यावेळी पोलीस निरीक्षक गंगाधरराव यांची साक्ष झाली. त्यात त्यांनी आपण मिनिटाला २०-२५ शब्द लिहून घेत होतो असे सांगितले. त्यानंतर डॉ. हेडगेवार यांनी भाषण करूनच आपली बाजू मांडली. आपण मिनिटाला दोनशे शब्द बोलतो आणि यांनी फक्त २०-२५ शब्दांची नोंद घेतली हे त्यांनी लक्षात आणून दिले. न्यायालयात सादर करण्यात आलेली भाषणे आपली नाहीतच असेही ते म्हणाले. आपल्याला अन्य साक्षीदारांचीही उलटतपासणी घ्यायची आहे अशी मागणी डॉ. हेडगेवार यांनी केली. न्यायाधीशांनी ती मागणी फेटाळून लावली आणि खटला ५ ऑगस्टवर ढकलला.
५ ऑगस्ट १९२१ रोजी खटला पुन्हा उभा राहिला तेव्हा डॉ. हेडगेवार यांनी आपले लेखी निवेदन सादर केले आणि आपली भूमिका स्पष्ट करणारे भाषणही केले. त्यातील मुख्य मुद्दे होते – १) हिंदुस्थानातील हिंदी माणसाच्या कृत्याचा निवाडा परकीय राजसत्तेने करावा हा मी माझ्या देशाचा अपमान समजतो. २) हिंदुस्थानात सध्या अस्तित्वात असलेली राजसत्ता न्यायाधिष्ठित नसून, ती धूर्त लोकांनी चालवलेली पद्धतशीर लूट आणि फसवणूक आहे. ३) देशबांधवांच्या मनात मातृभूमीविषयी उत्कट भक्तिभाव जागवणे म्हणजे सरकारशी शत्रुत्व असे जर वाटत असेल तर या सरकारने आपले चंबुगबाळे आवरण्याची वेळ आली आहे असे समजावे. ४) माझ्या भाषणांचे सादर केलेले वृत्त भोंगळ, तुटक व विपर्यस्त असून मी केलेल्या भाषणांचे मी पूर्ण समर्थन करतो.
डॉ. हेडगेवार यांचे हे निवेदन ऐकताच न्यायमूर्तींच्या तोंडून शब्द बाहेर पडले – ‘यांच्या मूळ भाषणापेक्षा यांचे हे समर्थनच अधिक राजद्रोहपूर्ण आहे.’ जे बाहेर जाहीर सभांमध्ये बोलता येत नव्हते त्याची सगळी कसर डॉ. हेडगेवार यांनी न्यायालयात भरून काढली होती. आपल्या भाषणात त्यांनी, सरकारने पोलिसांशिवाय अन्य कोणीही साक्षीदार समोर आणला नाही हेही चाणाक्षपणे लक्षात आणून दिले. एवीतेवी पोलीस हे सरकारचे कर्मचारी असल्याने त्यांची साक्ष सरकारची तळी उचलणारीच राहणे स्वाभाविक होते. न्यायालयाच्या निष्पक्षपाती न्यायदानावर हे एक प्रश्नचिन्हच होते.

१९ ऑगस्ट २०२१ रोजी या खटल्याचा निकाल होता. त्यावेळी समोर आलेल्या जामीनाच्या मुद्यावर न्यायमूर्तींनी निकाल दिला की, ‘तुमची भाषणे राजद्रोही आहेत. तरी तुम्ही एक वर्षपर्यंत राजद्रोही भाषणे करणार नाही असे अभिवचन म्हणून, हजार हजार रुपयांचे दोन जामीन व एक हजार रुपयांचा जातमुचलका लिहून द्या.’ त्यावर मत मांडताना डॉ. हेडगेवार म्हणाले, ‘तुम्ही निकाल काहीही द्या. पण मी निर्दोष आहे. परमेश्वरावर माझा विश्वास आहे. मी जामीन देण्याचे नाकारतो.’
यावर न्यायालयाने लगेच डॉ. हेडगेवार यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा घोषित केली. कारागृहात जाण्यासाठी डॉ. हेडगेवार पोलिसांसोबत न्यायालयाबाहेर येताच, काँग्रेसच्या वतीने रावबहादूर गोखले यांनी त्यांना पुष्पहार घातला. त्यानंतर विश्वनाथराव केळकर, दामुपंत देशमुख, हरकरे इत्यादींनी त्यांना पुष्पहार घातले. टांग्यात बसण्यापूर्वी त्यांनी आपले काका आबाजी हेडगेवार, मोठे भाऊ सीतारामबुवा व डॉ. मुंजे यांना वाकून नमस्कार केला आणि ते कारागृहाकडे रवाना झाले.
शुक्रवार १९ ऑगस्ट १९२१ रोजी डॉ. हेडगेवार यांना नागपूरच्या केंद्रीय कारागृहात बंदी बनवण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी टाऊन हॉलच्या मैदानात त्यांच्या अभिनंदनाची सभा झाली. कारागृहाच्या नियमानुसार त्यांना गळ्यातील जानवे काढायला सांगण्यात आले. डॉ. हेडगेवार यांनी त्याला ठाम नकार दिला. त्यांचा नकार इतका दृढ होता की, कारागृह अधिकाऱ्यांनी माघार घेतली. नंतरच्या काळात अनेक चळवळी आणि आंदोलने यामुळे कारागृहातील गर्दी जसजशी वाढत गेली तसे हा नियम शिथिल होत गेला. डॉ. कारागृहात गेले त्यावेळी मात्र तो कडक होता. डॉ. हेडगेवार यांना कारागृहात प्रथम ‘पेपर पॉलिशिंग’चे, त्यानंतर ‘पेपर पल्प’ तयार करण्याचे आणि त्याही नंतर पुस्तक बांधणीचे काम देण्यात आले होते. त्यांच्यासोबत कोठडीत कर्मवीर बापूजी पाठक, पंडित राधामोहन गोकुळजी, बालवीर बाबुराव हरकरे आणि काझी इनामुल्ला हे होते. या सगळ्यांना कैद्याचा पोशाखच घालावा लागत असे आणि भाकरी, वरण व भाजी असे जेवण मिळत असे. राजकीय कैदी अशी वेगळी श्रेणी त्यावेळी नव्हती. सगळे कैदी सारखेच मानले जात. यतींद्रनाथ दास या क्रांतिकारकाच्या निधनानंतर राजकीय कैदी हा प्रकार अस्तित्वात आला. कागदाचे गठ्ठे बांधणे, पुस्तकबांधणी ही कामे आटोपल्यावर; उरलेल्या वेळात डॉ. हेडगेवार टकळीवर सूत काढीत व महाभारत वाचीत असत.
१२ जुलै १९२२ रोजी डॉ. हेडगेवार यांची सुटका झाली. त्यावेळी त्यांचे वजन २५ पौंड वाढले होते. फिरणे व अन्य कामांची दगदग नसणे व असेल त्या परिस्थितीला हसतमुखाने सामोरे जाणे या त्यांच्या गुणांचा हा परिणाम असावा. ते कारागृहाच्या बाहेर आले तेव्हा मुसळधार पावसातही डॉ. मुंजे, डॉ. परांजपे, डॉ. ना. भा. खरे व अनेक मित्र, परिचित त्यांच्या स्वागताला हजर होते. वाटेतही ठिकठिकाणी त्यांचे सत्कार झाले. ‘महाराष्ट्र’ने त्यांच्या सुटकेची बातमी छापली होती.
त्याच दिवशी संध्याकाळी चिटणीस पार्क मैदानावर डॉ. हेडगेवार यांच्या सुटकेनिमित्त स्वागत सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु संध्याकाळी जोरदार पाऊस असल्याने ‘व्यंकटेश नाट्यगृहात’ ही सभा घेण्यात आली. नाट्यगृहात तर पाय ठेवायलाही जागा नव्हती, अन आतल्यापेक्षा जास्त संख्येने लोक नाट्यगृहाच्या बाहेर पावसात उभे होते. डॉ. ना. भा. खरे या सभेचे अध्यक्ष होते. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या कामासाठी त्या दिवशी नागपुरात असलेले; पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील पंडित मोतीलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे भाऊ श्री. विठ्ठलभाई पटेल, हकीम अजमलखान, डॉ. अन्सारी, श्री. राजगोपालाचारी, श्री. कस्तुरीरंग अय्यंगार ही मंडळीही आवर्जून या सभेला उपस्थित होती. सर्वप्रथम डॉ. हेडगेवार यांच्या स्वागताचा ठराव सभेत मांडण्यात आला आणि टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात तो स्वीकारण्यात आला. त्यानंतर हकीम अजमलखान व पंडित मोतीलाल नेहरू यांची स्वागतपर व तात्कालिक स्थितीवर भाषणे झाली. त्यानंतर डॉ. हेडगेवार यांनी सत्काराला उत्तर देणारे भाषण केले.
आपल्या सत्काराला उत्तर देताना डॉ. हेडगेवार म्हणाले, ‘एक वर्ष सरकारच्या घरी पाहुणा म्हणून राहिल्याने माझी योग्यता पूर्वीपेक्षा वाढलेली नाही. तथापि, ती वाढली असेल तर त्याबद्दल सरकारचेच आभार मानले पाहिजेत. देशाचे ध्येय सर्वात उच्चतम असेच ठेवले पाहिजे. निर्भेळ स्वातंत्र्याहून कमी दर्जाचे ध्येय ठेवणे मुळीच रास्त ठरणार नाही. मार्ग कोणते असावे हे इतिहासतज्ञ श्रोत्यांना सांगणे म्हणजे त्यांचा उपमर्द करणे आहे. स्वातंत्र्यासाठी झगडण्यात मरण आले तरी त्याची फिकीर करता कामा नये. हा झगडा उच्च ध्येयावर दृष्टी ठेवून व डोके शांत ठेवून चालवला पाहिजे.’
नागपूरनंतर यवतमाळ, वणी, आर्वी, वाढोणा, मोहपा इत्यादी ठिकाणी त्यांचे सत्कार झाले होते. या सत्कार कार्यक्रमांमध्ये त्यांना ओवाळून खादीचे पोशाख भेट देण्यात आले होते. यवतमाळच्या त्यांच्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष लोकनायक बापूजी अणे हे होते.
- श्रीपाद कोठे
१२ जुलै २०२२




