*कैवल्यज्ञानी*
आपल्या आजोबांवर जेव्हा पुस्तक निघणार असतं, आणि त्यात सुधीर रसाळ, नरेंद्र चपळगावकर, सुरेश द्वादशीवार, महेश एलकुंचवार हे दिग्गज लोक तसंच जेष्ठ पत्रकार मंडळी, संपादक वगैरे यांचे लेख असतात आणि तुझा बाबा, आत्या आणि काका यांच्या सोबत तू सुद्धा त्यात एक लिही असं पुस्तकाचे संपादक साहेब सांगतात, तेव्हा काय लिहावं, कुठून सुरवात करावी आणि आपलेच आजोबा कसे ग्रेट होते हे आपणचं स्वतः कसं काय लिहावं असे कित्येक प्रश्न मला पडले होते. पण मग ज्या माणसाकडून मला जगण्याचं, लिहिण्याचं आणि विचाराचं बाळकडू मिळालं त्या माझ्या अण्णांवर मी लिहिलं नाही तर माझ्या इतर लिखाणाला आणि असण्याला सुद्धा शून्य अर्थ उरेल असं मला वाटलं .. आणि मग प्रवीण बर्दापूरकर काकाने संपादन केलेल्या ” कैवल्यज्ञानी” – पत्रमहर्षि अनंत भालेराव स्मरणग्रंथात अण्णांच्या सर्वच नातवंड्याच्या वतीने एक लेख मी लिहिला. अण्णांची नात या ओळखीने लिहिता आलं याचा अभिमान आणि कृतज्ञता मनात आहे आणि म्हणून अभंग प्रकाशनाच्या या स्मरणग्रंथातील काही भाग इथे देते आहे. माझ्याकडून माझ्या अण्णांसाठी आणि त्यांच्यावर आजही प्रचंड प्रेम करणाऱ्या लहान मोठ्या सर्वांसाठी कृतज्ञता पूर्वअशी एक छोटीशी भेट. प्रवीण काका तुझ्यामुळे माझ्या सारख्या लिंबू टिंबूला अण्णांच्या स्मरणग्रंथाचा एक भाग बनता आलं..त्यासाठी अनंतरावांची ही नात तुझ्या कायम ऋणात राहील. या पुस्तकाचे मुखपृष्ठ सरदार जाधव यांनी अत्यंत सुरेख केलं आहे. माझे आजोबा फार देखणे दिसत आहेत सो त्यांना मनःपूर्वक धन्यवाद.
‘अनंतराव भालेराव’ यांची तू नात आहेस का? असं आजही जेव्हा लोक मला विचारतात तेव्हा आण्णांची पुण्याई अजूनही आपल्या बरोबर आहे याची खात्री पटते. मी साधारण सात एक वर्षांची असताना अण्णा गेले. पण अगदी लहान पणापासून माझं बालपण हे अण्णा आणि त्यांच्या आठवणींच्या भोवती गुंफल्या गेलं. त्यामुळे अण्णांच्या आठवणी हेच त्याचं माझ्या आयुष्यातलं असणं आहे असं मला कायम वाटत आलं आहे.

अण्णा म्हणजे कोणीतरी मोठा माणूस असं मला कधीच वाटलं नाही. अण्णांकडे खूप लोकं येतात, अण्णा सतत त्यांच्याशी काहीबाही चर्चा करत असतात, अण्णा काहीतरी लिहीत असतात नाहीतर वाचत असतात बस्स.. इतकंच काय ते मला ठाऊक. तर एक दिवस असं अण्णांकडे काही लोकं आली होती. सगळे जाणं बैठकीत बसले होते. काही दिवसांपूर्वी बाबांनी मला एक छानशी छोटी डायरी आणली होती आणि म्हणाले होते अण्णांकडे खूप मोठी आणि विद्वान लोकं येतात त्यांची सही आणि संदेश तू घेत जा या वहीत. झालं.. मला आठवलं ते. मग काय, आमची स्वारी थेट पोहोचली बैठकीत. आणि सगळ्यांच्या समोर बुलुंद आवाजात मी अण्णांना विचारलं, ” अण्णा, हे सही घेण्यासारखे आहेत का?” आणि हातात ती वही आणि पेन होताच माझ्या! क्षणभर एकदम शांतता.. अण्णा मोठ्याने हसले आणि त्यांच्या बाजूला बसलेले आजोबा आणि इतर लोकं सुद्धा. अण्णांनी मला प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणाले.. अर्थात.. मग त्या आजोबांनी सुद्धा.. अनंतराव नातं हुशार आहे तुमची असं माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं आणि सही व संदेश दिला. मी खोलीच्या बाहेर येऊन नाव वाचलं.. मनात म्हटलं, चला सही घेण्यासारखं आज कितीतरी मिळालं.. नाव होतं.. मधु दंडवते!
मला आठवतंय तेंव्हा पासून अण्णांनी मला खूप श्लोक, कविता शिकवल्या. त्यांचे मित्र- मंडळी घरी आली की अण्णा मला हमखास काही ना काही म्हणायला लावायचे. ताकापुरतं रामायण तर मी असंख्य वेळा म्हणून दाखवलं असेल पण तरीही अण्णा आणि त्यांचे मित्र रसाळ आजोबा, चपळगांवकर आजोबा, भगवंतराव आजोबा, तू.शं . आजोबा, चारठाणकर आजोबा, बोरीकर आजोबा हे सगळे जणू काही पहिल्यांदाच ऐकता आहेत या अविर्भावात ऐकायचे.

आदौ राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनं
वैदेही हरणं, जटायु मरणं, सुग्रीव संभाषणं
बाली निर्दलं, समुन्द्र तरणं, लंकापुरी दाहनं
पश्चाद्रावण-कुम्भकरण हननं, एतद्धि रामायणं
हे अण्णांनी शिकावलेलं ताकापुरतं रामायण. मला या इवल्याश्या श्लोकातून रामायणातले केवळ नऊ मुद्दे सांगून संपूर्ण रामायण अण्णा सांगून गेले. आज विचार केला तर वाटतं की कदाचित त्यांना आयुष्य किती लांबलचक आहे यापेक्षा त्यात ठळक गोष्टी कोणत्या हे उमजून जगण्याचं सार शोधून काढ असं तर मला सांगायचं नसेल ना? तो काळ वेगळा होता असं आता वाटतं. घराची आणि मनाची दारं तेंव्हा सतत उघडी असायची. सिंक मध्ये साचलेल्या चहाच्या कपांचा डोंगर हे भरभराटीचं लक्षण मानलं जायचं.. हा काळ तेंव्हाचा होता!

अण्णांची अजून एक आठवण माझ्या मनात फार स्पष्ट आहे ती म्हणजे एक दिवस मी जेवत असताना असताना पानात वाढलेली भाजी मला आवडली आंही कारण त्यात मीठ नव्हतं. मी पहिला घास खाताच मी आईला म्हणाले “भाजी आवडली नाही, त्यात मीठच नाहीये”. आईने कपाळाला हात मारला आणि लगेच मीठ घेऊन आली. अण्णांचं जेवण झालं होतं. आई म्हणाली, “अगं बाई, अण्णांना बिना मिठाचंच खावं लागलं आज”. मला फार आश्चर्य वाटलं. मी जेवण झाल्यावर त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं, “अण्णा तुम्ही बिना मिठाचं का खाल्लं? ती भाजी किती घाण लागली असेल तशी!” त्यावर अण्णा म्हणाले, “पानांत जे काही वाढलं असेल तर छान आहे असं म्हणूनच खावं. अन्नपूर्णेला नेहेमी समाधानी ठेवायला हवं कारण ती आपल्यासाठी एवढं करते. अन्नाला कधीही नावं ठेऊ नये.” कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण त्या दिवसानंतर मी नेहेमी जेवण झाल्यावर आज ‘अमुक एक छान झालं होतं’ असं हमखास सांगायचे. अगदी आजही मी जे पानात आहे ते समाधानाने खाते आणि तशी पोचपावती देते. मला वाटतं अण्णांनी फार मोठी गोष्ट अगदी अजाणत्या वयात माझ्या लक्षात आणून दिली होती.
अशा शेकडो आठवणी अण्णांच्या असल्या तरी मागच्या महिन्यात बाबांकडे असलेल्या अण्णांच्या काही नोट्स वाचत असताना त्यांनी लिहिलेले काही उर्दू शेर, जिन्हांवरची टिप्पण दिसली. त्यावरून हात फिरवताना जाणवलं की अण्णांचा काही वर्ष जर अजून सहवास मिळाला असता तर त्यांच्याशी फैज, मीर यांच्याबद्दल छान गप्पा मारल्या असत्या, जिन्हांबद्दल जी मी पुस्तकं वाचली, किंवा माझ्या आवडत्या मुराकामी, काफ्का या लेखकांबद्दल चर्चा करता आली असती. किती आणि काय काय शिकता आलं असतं. लहानपणी माझ्या नकळत जे काही अण्णा शिकवून गेले त्याचं मोल मात्र जसं जसं अनंत भालेराव हा माणूस काय होता हे उमजत गेलं तसं तसं वाढत गेलं.
आपण कोणत्या घराण्यात जन्माला येणार हे आपण निवडतो का? काही वर्षांपूर्वी या प्रश्नाचं उत्तर शोधताना फार इंट्रेस्टिंग रिसर्च हाती लागला होता. यावर खूप साऱ्या थिअरीज आहेत पण मला असं वाटतं की आडनाव लावल्याने किंवा एखाद्या घराण्यात फक्त जन्मल्याने आपण त्या घराण्याचे किंवा त्या कुटुंबाचा एक भाग असतोच असं नाही. ते आडनाव किंवा ती विचारधारा सार्थकी लावली किंवा आपण ती वाट, ते विचार यांना अनुसरून वागलो तरच ते आडनाव लावण्यात किंवा वारसदार असं स्वतःला म्हणवून घेण्यात अर्थ असतो असं मला वाटतं. मग असं असल्यास लहान वयापर्यंत ठीक आहे पण आज या घडीला अण्णांच्या विचारधारेवर, मूल्यांवर किती टक्के मी खरी उतरते यावर दरवर्षी मी विचार करते आणि त्यांची नात असं म्हणवून घेण्यास किंवा भालेराव हे अडनाव लावण्यास मी सार्थ आहे का याचा विचार करते. विचाराअंती आणि भरपूर रेट्रोस्पेक्शन अंती एक वाचक म्हणून, एक माणूस म्हणून, त्यांच्या विचारांवर , कामावर, कर्तृत्वावर, साधेपणावर अमाप प्रेम करणारी व्यक्ती म्हणून शेकडो लोकांच्या गर्दीतली एक म्हणून राहायला जास्त आवडेल असं मला वाटतं.
वयाच्या सातव्या वर्षी अण्णांनी मला कुसुमाग्रजांची अखेर कमाई ही कविता समजावून सांगितली होती. मला वाटतं माझ्या आयुष्यातल्या साक्षात्कार वगैरे च्या काही क्षणांपैकी हा एक क्षण.. आपलं नावं खूप झालं, लोकप्रियता वाढली, आपण एका विशिष्ट मुक्काम स्थळी पोहोचलो तरीही आपले पाय जमिनीवर राहणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं.. आणि हेच मला अण्णा तेंव्हा या कवितेद्वारे सांगू पाहत होते. जिथे लोकं गांधींना विसरले तिथे आपलं काय असं अण्णा म्हणायचे, ते का आणि ते किती खरं होतं हे सुद्धा कालांतराने उमजत गेलं. त्यामुळे या लेखाचा शेवट त्या कवितेने जिच्यामुळे माझ्या आयुष्यातली कित्येक ‘मीपणाची झापडं’ गळून पडली आणि नवीन कवाडं उघडल्या गेली.
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती!
– कुसुमाग्रज
हा या लेखातील छोटा भाग आहे खरंतर.. हा लेख लिहीत असतांना प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे अण्णा आपल्यात नाहीयेत असं मला आजही वाटत नाही. आता हे स्पुकी टाईप वाटेल पण आपण स्वतःला जसे पाहतो तसेच दिसतो असं मी मानते आणि मला स्वतःमध्ये अजूनही पाच सन्मित्र कॉलनीमधल्या आमच्या घरात अण्णांच्या मागे मागे करणाऱ्या भोकऱ्याच दिसतो. अण्णा गेल्यावर आमच्या औरंगाबादच्या घरी, बाहेर व्हरांड्यात त्यांचा एक फोटो लावला होता. मी अगदी काहीही असो म्हणजे साधी तोंडी परीक्षा वगैरे जरी असली तरी आधी आजीला नमस्कार करायचे. मग एक खुर्ची ओढून, त्यावर चढून अण्णांच्या फोटोसमोर उभी राहायचे. नमस्कार करायचे, फोटोला हलकेच हात लावायचे आणि मग शाळेत जायचे. मी जेंव्हा अण्णांना नमस्कार करायचे तेंव्हा आजी तिच्या स्टूलवर कोपऱ्यात बसून हे पहायची. एका पदराने हलकेच डोळे पुसून मंद हसायची आणि मी जाताना तिला टाटा करायचे तेंव्हा बोळकं पसरून हसायची. तेंव्हा आजी रडते आणि तरीही हसते का असा प्रश्न मला नेहेमी पडायचा. आज विचार करते तेव्हा वाटतं की डोळ्यात आसू आणि ओठावर हसू येण्याचे आयुष्यात फार म्हणजे फार दुर्मिळ क्षण येतात. ते अनमोल क्षण असतात … हा आयुष्याचा ठेवा. अगदी आजही मी जेव्हा जेव्हा काही महत्वाचं करायचं असलं की अण्णांच्या फोटोला नमस्कार करते. आजी आता नसली तरी आज मात्र माझ्या डोळ्यात पाणी आणि ओठावर हसू येतं.

©सानिया भालेराव
२४/१२/२०२१
(* कैवल्यज्ञानी : पत्रमहर्षि अनंत भालेराव स्मरणग्रंथ या पुस्तकातील “त्यांचं आयुष्यातील असणं ” या लेखामधून)
अभंग प्रकाशन.











