कोरोना जागर उपक्रम

0
282

लक्षणांच्या वर्गीकरणानुसार कोविडवरील उपचारनीती श्रेयस्कर – डॉ. अरुण मोरे    

सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषदेतर्फे कोरोना जागर उपक्रम 

 

लातूर – 

कोविडची पहिली लाट आली तेव्हा सामान्य जनतेप्रमाणेच जगभरातील वैद्यकीय विश्व  गोंधळले होते. मात्र, वेगवेगळ्या पातळ्यांवर रुग्णसेवा करत असताना डॉक्टरांनी केलेल्या अधिकाधिक सूक्ष्म व वैविध्यपूर्ण पातळीवरील लक्षणांच्या निरीक्षणानुसार अनुसरलेल्या उपचारप्रणालीतून नियोजनाचे सूत्र तयार झाले, असे मनोगत डॉ. अरुण मोरे यांनी व्यक्त केले.  पानगाव येथील सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व त्याअंतर्गत असलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या पानगाव विभागातर्फे आयोजित ‘कोरोना जागर’ दूरसंपर्क परिसंवादाच्या तिसऱ्या सत्रात ते बोलत होते.  

सौम्य, तीव्र, अतिदक्षतापात्र अशा लक्षणांच्या अवस्थांवर काटेकोर लक्ष ठेवणे अत्यंत महत्वाचे असून घाबरून न जाता कोविडची प्राथमिक लक्षणे कोणती व ती असतील तर नेमकी कोणती काळजी घ्यावी, या लक्षणांचे संसर्गाच्या स्थितीशी कोणते अन्वयार्थ असतात, डॉक्टरांकडे कधी गेले पाहिजे, डॉक्टरांच्या सल्ल्याचा व दिलेल्या उपचारांसह सूचनांचे पालन कसे करावे यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. वैयक्तिक पातळीवर लक्षणांच्या खाणाखुणा कशा ओळखाव्यात व त्यावर कोणती शारीरिक व मानसिक तयारी ठेवली पाहिजे आणि घरगुती अलगीकरणाच्या मर्यादा काय आहेत त्याबद्दल मार्गदर्शन केले व उपचारांबाबत डॉक्टरांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन याप्रसंगी डॉ. अरुण मोरे यांनी केले. याप्रसंगी डॉ. शिरीष पाटील व डॉ. सुनिता पाटील यांनीही कोविडच्या उपचाराच्या  संकल्पना  स्पष्ट केल्या व नागरिकांनी गैरसमज दूर करून घ्यावेत यासाठी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. 

या कार्यक्रमात श्रोत्यांच्या अनेक शंका व प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. कार्यक्रमात मराठी विज्ञान परिषदेच्या मध्यवर्ती विभागाचे कार्यवाह श्री. दिलीप हेर्लेकर, किशोर कुलकर्णी (मुंबई), एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. बसवेश्वर नागोबा, शैलेश गोजमगुंडे, अॅड. रजनी गिरवलकर, प्रा. राजेश कटके, प्रा. मनोहर कबाडे, माजी अधिष्ठाता डॉ. जे.जे. देशपांडे, डॉ. सदानंद कुलकर्णी अशा मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर श्रोत्यांची हजेरी होती. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मुकुंद भिसे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. 

सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानतर्फे दूरस्थ संवाद पद्धतीने परिसंवाद मालिकेचे नि:शुल्क आयोजन करण्यात येत असून दर रविवारी संध्याकाळी ५ वाजता राज्यभरातील वैद्यकीय, संशोधन व प्रशासन तसेच शिक्षण, सामाजिक व साहित्य क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांच्या व्याख्यानांचा समावेश आहे. पुढील रविवारी ‘कोविड १९ काय आहे ? आजार,लक्षणे व उपचारप्रणाली’ या विषयाच्या दुसऱ्या भागावर डॉ. सुनिता पाटील, डॉ. शिरीष पाटील, डॉ. अरुण मोरे या तज्ज्ञांचे परिसंवादात्मक व्याख्यान होणार असून कोविडच्या तीव्र लक्षणांवर प्रकाश टाकण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचिव डॉ. संतोष कुलकर्णी यांनी दिली. विद्यार्थी, तरुण वर्ग व सामान्य नागरिकांसाठी दूरसंपर्क पद्धतीने चाचणी परीक्षेचे  आयोजन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. नागरीक, विद्यार्थी, शिक्षक व सुजाण नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here