हर हर महादेवच्या जयघोषात ग्रामदैवत सिद्धेश्वरांच्या यात्रा महोत्सवास प्रारंभमंदीर परिसरात ध्वजारोहण
मानाच्या काठ्यांची मिरवणूक
लातूर/प्रतिनिधी:’हर हर महादेव’च्या जयघोषात लातुरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला.शुक्रवार व शनिवारच्या मध्यरात्री १२ वाजता गवळी समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला. सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मंदिर परिसरात ध्वजारोहण करण्यात आले.मध्यरात्रीपासूनच हजारो भक्तांनी श्री सिद्धेश्वरांच्या दर्शनासाठी गर्दी केली.

लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वराची यात्रा मराठवाड्यात प्रसिद्ध आहे.मागील दोन वर्षात कोविडमुळे यात्रा महोत्सव होऊ शकला नव्हता.पारंपारिक विधी केवळ संपन्न झाले होते.यंदा मात्र भाविक आणि नागरिकांच्या सहभागातून यात्रा महोत्सव संपन्न होत आहे.त्यामुळे सर्वत्र उत्साह ओसंडून वाहत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे मध्यरात्री १२ वाजता गवळी समाजाच्या वतीने श्री सिद्धेश्वरांना दुग्धाभिषेक करण्यात आला.शेकडो वर्षांची ही परंपरा यावर्षीही पालन करण्यात आली.अभिषेकापूर्वीपासूनच हजारो भक्त दर्शनासाठी रांगा लावून थांबलेले होते.अभिषेकानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी यावेळीच ग्रामदैवताचे दर्शन घेतले. सकाळी १० वाजता अप्पर जिल्हाधिकारी अविनाश लोखंडे यांनी श्री सिद्धेश्वरांची सपत्निक महापूजा केली.उपजिल्हाधिकारी जीवन देसाई,प्रशासक सचिन जांबुतकर,तहसीलदार स्वप्निल पवार,विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, अशोक भोसले,श्रीनिवास लाहोटी,नरेश पंड्या, बाबासाहेब कोरे,प्रदीप पाटील खंडापूरकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

अप्पर जिल्हाधिकारी लोखंडे यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. मध्यरात्रीपासूनदेवस्थानचा परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. दर्शनासाठी स्त्री-पुरुष,युवक- युवतींची गर्दी दिसून येत होती. देवस्थानच्या वतीने दर्शनासाठी भक्तांना अडचणी येऊ नयेत याची काळजी घेतली जात आहे.गर्दी नियंत्रित करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.गर्दीमध्ये अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पूजा साहित्याचे स्टॉल रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आले आहेत. यंदाच्या यात्रेत बच्चे कंपनीसाठी आनंदनगरीचे आकर्षण असणार आहे. मनोरंजनाच्या साधनांकडे लहान मुले आणि तरुण आकर्षित होत आहेत.

यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रशासक तथा निरीक्षक सचिन जांबुतकर यांच्यासह विश्वस्त विक्रम गोजमगुंडे,अशोक भोसले,श्रीनिवास लाहोटी, मन्मथप्पा लोखंडे, बाबासाहेब कोरे,अशोक भोसले,नरेशकुमार पंड्या,सुरेश भोसले यांच्यासह विश्वस्त मंडळ परिश्रम घेत आहे. मानाच्या काठ्यांची मिरवणूक… श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेनिमित्त मानाच्या काठ्यांची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांच्या निवासस्थानी मानाच्या काठ्यांचे पूजन केले जाते.दुपारी १ वाजता हा पूजाविधी संपन्न झाला.विक्रम गोजमगुंडे,विशाल गोजमगुंडे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह परिवारातील सदस्यांनी काठ्यांचे पूजन केले.त्यानंतर गौरीशंकर मंदिरापासून काठ्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.वाद्यांच्या गजरात ही शोभायात्रा सायंकाळी देवस्थान परिसरात दाखल झाली.





