आव्हानात्मक संघर्ष करून जीवनात उत्तम यश संपादन करणाऱ्या कथा, कादंबऱ्या ,चरित्रे इत्यादी जुने नवे साहित्य वाचनाचा मला मनस्वी छंद आहे.
आज सौ वर्षा महेंद्र भाबल यांचे आत्म कथेचे ‘जीवनप्रकाश’ हे पुस्तक माझ्या हाती आले आणि त्यांच्या व्यक्तीगत जीवनात आलेले संघर्ष आणि त्यांनी केलेली यशस्वी मात यांचे मला अतिशय अप्रुप आणि प्रेरक दर्शन झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका लहान खेड्यात जन्मलेली वर्षा ही त्या गावातील पहिली मँट्रीक झालेली आणि पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठून जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या मुलीची कथा रंजक वाटली. आपल्या अभ्यासात सातत्याने मदत करणाऱ्या आणि स्वभावाने समंजस संस्कारसंपन्न, विनम्र अशा खिलाडू व्रुत्तीच्या महेंद्राशी उत्कट प्रेमाने प्रारंभात वाटचाल केली.आपल्या पेक्षा तीन वर्षाने लहान असलेल्या मुलाशी प्रेमस्वरूप भावबंधन नकळत जुळविले आणि अगदी धाडसीपणाने सर्वांना बिनधास्तपणे सांगत सहा वर्षे लपून छपून चालू असलेल्या प्रेमाचे रुपांतर अगदी सर्वांचा विरोध असतांना साध्या पध्दतीने लग्न करून आयुष्यभर यशस्वीपणे परस्पर विश्वासावर टिकविले.

अर्थात माहेर सासर यांना हे लग्न मुळीच न आवडल्यामुळे दोन्ही घराचे दरवाजे बंद झाले. उघड्यावर पडलेल्या या वधुवराच्या जीवनाची ही तितकीच नाट्यमय, संघर्षमय जीवन प्रवासाची कहाणी सौ
वर्षा यांनी अतिशय सुबोधपणे कथन केली आहे.
आपल्या बालपणापासूनची समग्र हकिकत त्यांच्या शैलीदार लेखणीतून प्रारंभीच या प्रवासात उतरलेली आहे. खेळकर असे मनोसक्त आनंदी, स्वछंदी जीवन बालपणात त्यांनी उपभोगले. त्यामुळेच विविध खेळातूनच जीवनात संघर्ष करण्याचा एक धडा मिळतो असे त्यांनी नमूद केलं आहे.ग्रामीण जीवनातील काही वर्षे त्यांना खुपसं शिकवून गेली.कष्टाळूपणाचे धडे तिथेच गिरविले.आई ही मुलांची पहिली शाळा असल्याचे त्यांनी अनुभवले.
विवाहानंतरची जोडीदारासह संघर्षमय जीवनप्रवासाची कहाणी त्यांनी खुप मोकळेपणाने,प्रांजळपणे पण तितक्याच परखडपणे शब्दांकित केली आहे.तीचा संपूर्ण परामर्ष घेणे विस्तार भयामुळे शक्य नसल्याने प्रत्यक्षात ही संघर्ष गाथा वाचलीच पाहिजे.
आपल्या जीवनात आलेल्या अनेकविध संघर्षमय घटनांची माहिती देत त्यावर यशस्वीपणे कशी मात केली याचेहि यथार्थ दर्शन सौ वर्षा यांनी अगदी रसाळपणे घडविले आहेच पण त्यांना जीवन प्रवासात भेटलेल्या अनेक लहान वृध्द स्त्रियांची माणसांची,मित्रांची,
मैत्रिणींची आणि आपल्या सख्या,दूरच्या नातलगांची स्वभावचित्रे छान पैकी रंगविली आहेत.

आपल्या जीवनात कविता करण्याचा छंदहि जोपासला त्यामुळे आपल्या लेखणीला
तलवारीची धार मिळाली असे नमूद करुन आपल्या जोडीदारासह सुरु केलेला शिकवणी क्लास व नंतर टेलिफोन खात्यातील नोकरीच्या अनुभवाबरोबरच
आपल्या पतीराजांच्या कर्तृत्वावर अधिक
समर्थपणे लिहिले आहे.त्यांची जगातील सद्यस्थितीत ज्ञान अवगत करण्याच्या
क्षमतेमुळे आपणाला सुरक्षिततेचे कवच मिळाले.आमच्या आलेल्या खडतर प्रसंगात सामोरे जाण्याचे धाडस करून निर्भिड व खंबीरपणे आपल्यापाठीशी ढालीप्रमाणे उभे राहिल्याचे म्हटले आहे.ते सध्याच्या वाढत्या घटस्फोटाला आळा घालण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.
प्रत्येक प्रकरणात आपल्याला आलेल्या अनुभवावर प्रेरक ठरणारी उत्तमोत्तम सुभाषितांची पेरणीहि या जीवनप्रकाशात लेखिकेने केली आहे. त्यामुळे ‘जीवन
प्रवास’हे पुस्तक प्रेरणादायी ठरले आहे.
सौ.अलका देवेंद्र भुजबळ यांनी ‘न्युज स्टोरी टुडे’ या वेब पोर्टलवर क्रमशः प्रकाशित झालेल्या
सौ वर्षा यांच्या मूळ मालिकेचे पुस्तक प्रकाशित करून आपला प्रकाशन व्यवसायात पदार्पण करण्याचा मनोदय केवळ व्यक्तच केला नाही तर अतिशय उत्तम मुखपृष्ठासह उत्तम मुद्रण केलेले पहिले पुस्तक प्रकाशित केले, ते तितकेच सध्याच्या नावाजलेल्या प्रकाशकांच्या पुस्तक निर्मितीच्या तोडीचे आहे.त्यामुळे सौ वर्षा महेंद्र जींच्या पुस्तकाला, त्यांच्या उत्कट लेखणीला पुर्णतः सुयोग्य न्याय मिळाला आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
–सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक