छत्रपती संभाजीनगर, दि.१४ : सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भरीव योगदानासह असंख्यांच्या जीवनाला आकार देणारे महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाची दखल घेऊन सकल जैन समाजाच्यावतीने त्यांचा सन्मानपत्र देऊन आज विद्यापीठात सपत्नीक सत्कार करण्यात आला.
वीरशासन जयंतीनिमित्त डॉ. संजय मोहड, मेधा लखपति आणि कलावंतांच्या संचाने एमजीएममध्ये भगवान महावीर यांच्या विचारांनी ओत-प्रोत असलेली ‘वीतराग’ ही जैन तत्वज्ञानावर आधारित विशेष संगीत मैफील उदंड प्रतिसादात सादर केली. ही मैफील साकार करण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका कुलपती अंकुशराव कदम यांनी निभावली आहे. आज सकल जैन समाजाच्यावतीने अंकुशराव कदम व सौ. अनुराधाताई कदम यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सहृदय सत्कार केला. चंदन – अक्षत, माला, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन संपूर्ण जैन पद्धतीने अत्यंत कृतज्ञतापूर्वक हा सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभास सकल जैन समाजातर्फे राजेंद्र पगारिया, पं.गुलाबचंद बोराळकर, नीलेश सावळकर, प्रा. सुधाकर लखपति, अमोल पुर्णेकर, सौ. शीतल पगारिया, सौ. मंगल लखपति यांची उपस्थिती होती. याशिवाय ‘वीतराग’ संगीत मैफलीचे निर्माते डॉ. संजय मोहड, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, प्रा. शिव कदम व सर्व संबंधित उपस्थित होते.

याप्रसंगी पं.गुलाबचंद बोराळकर यांनी वीरशासन जयंतीचे महत्व विषद करून सन्मानपत्राचे वाचन केले. भगवान महावीरांचे विचार समाजापर्यंत पोचविण्यासाठी कुलपती अंकुशराव कदम व एमजीएम विद्यापीठ यांचेकडून सातत्यपूर्वक आणि निष्ठेने होत असलेल्या प्रयत्नांचे सकल जैन समाजाने यावेळी कौतुक केले.
—





