*’दिलधा’ गेले…*

0
715

भावपूर्ण श्रद्धांजली

आपल्या खूप मोठ्या गोतावळ्यात ‘दिलधा’ नावाने प्रिय असलेले ज्येष्ठ पत्रकार, माझे ज्येष्ठ मित्र आणि राज्याचे माजी मुख्य माहिती आयुक्त श्री. दिलीप धारूरकर आज काळाला शरण गेले. गतवर्षी झालेला कोरोना आणि त्यानंतर बळावलेले आजारपण अखेर त्यांना आपल्यातून क्रूरपणे काढून नेणारे ठरले. आज 1 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले.

साक्षेपी संपादक, विचक्षण पत्रकार, शैलीदार लेखक, प्रभावी वक्ता, समर्पित कार्यकर्ता असे सगळे गुण एका ठायी असलेला हा माणूस एक चांगला मित्र व मार्गदर्शकही होता.

फडणवीस यांच्या मागील कार्यकाळात राज्यात विविध महत्वाच्या स्थानी संघ परिवारातील अनेक कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या झाल्या. त्यातील मोजक्या सार्थक नियुक्त्यांत दिलीपरावांच्या मुख्य माहिती आयुक्तपदी झालेल्या नियुक्तीचा समावेश होता.

सामाजिक भान जागृत असलेला, निःस्पृह पत्रकारितेचा वारसा जपणारा माणूस या पदावर कार्यरत असतो तेव्हा कायद्याचे यथोचित पालन करीत घटनाकारांना अभिप्रेत असलेला सामाजिक न्याय, समता, बंधुता यांचा संदेश त्यांनी आचरणातून घालून दिला. त्यांनी दिलेले अनेक निकाल दिशादर्शक आणि क्रांतिकारक ठरले.

त्यांनी दिलेले निकाल व त्यामागील त्यांचा सामाजिक दृष्टिकोन यावर आमची सोदाहरण 3 वेळा चर्चा झाली. पहिली चर्चा 2017 मध्ये दिल्ली विमानतळावर रंगली होती! हे सगळे विषय त्यांनी लिहून काढले पाहिजेत, जेणेकरून ते या विषयाचे महत्वाचे documentation ठरेल असे मी प्रत्येक वेळी सुचविले आणि त्यांनीही लिहिण्याचे मान्य केले.

त्यांच्या तब्येतीची कळल्यानंतर परवा 5 जून रोजीच घरी जाऊन त्यांना भेटलो होतो. त्या स्थितीतही ते सक्रिय होते. जणू लेखन, अभिव्यक्ती हेच त्यांच्या जगण्याचे इंधन होते. त्यांची जिद्द पहाता आजचा हा प्रसंग एवढ्या लवकर ओढवेल असे वाटले नव्हते. पण काळासमोर काही बोलता येत नाही.

संघानेच दिलेल्या संस्कारानुसार –
‘कार्यमग्नता जीवन व्हावे
मृत्यू ही विश्रांती’ हा आदर्श जगणाऱ्या आमच्या ‘दिलधां’ना मानाचा मुजरा. श्रद्धांजली.

आज त्यांना अखेरचा निरोप देण्याच्या प्रसंगी मी मात्र प्रवासात आहे. अखेरच्या दर्शनाची संधीही मला मिळत नाहीय. दुःखद आहे, नाईलाजही आहे. संगीता वहिनी व मुलांना हे दुःख पेलण्याची ताकद ईश्वराने द्यावी, हीच मागणी.

  • दत्ता जोशी, छत्रपती संभाजीनगर.
  • ( लेखक हे जेष्ठ पत्रकार व लेखक आहेत )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here