आझादी का अमृत महोत्सवानिमित्य डॉ.संदीपान जगदाळे करणार ७५ व्याख्यानातून राष्ट्रभक्तीचा जागर
-नववर्षाचा संकल्प
लातूर दि.३१ नववर्षाचा संकल्प म्हणून आझादी का अमृत महोत्सवानिमित्य “स्वातंत्र्याची ७५ वर्षे: उपलब्धी आणि आव्हाने” या विषयावर ७५ व्याख्याने देऊन राष्ट्रभक्तीचा जागर करण्याचा संकल्प राज्य मंडळ सदस्य डॉ.संदीपान जगदाळे यांनी केला आहे.
या व्याख्यानात आपला देश किती वैभवशाली होता,विविध धर्म,जाती,वंश परंपरा असतानाही आपल्या देशाने विविधतेत एकतेचा संदेश कसा दिला,भारताने जगाला दिलेल्या देणग्या कोणत्या आहेत, त्यामुळे आपला देश कधीकाळी कसा विश्वगुरू होता याचे दर्शन डॉ.जगदाळे हे पाँवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्था,शहराबरोबरच ग्रामीण भागात जाऊन निशुल्क स्वरूपात करणार आहेत. ते या व्याख्यानातून आपल्या देशाचा देदीप्यमान व वैभवशाली इतिहास उलगडून सांगणार आहेत.

मोगलांचे आगमन,त्यांनी केलेली भारताची लूट,त्यानंतर इंग्रजांचे आक्रमण,त्यांनी केलेला अन्याय अत्याचार, स्वातंत्र्याचा लढा, त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळालेले देशाचे स्वातंत्र याबद्दल ते व्याख्यानातून माहिती देणार आहेत. स्वातंत्र्यानंतर कृषी,अर्थव्यवस्था,शिक्षण,स्त्री शक्ती,आरोग्य,संगणक,संगीत,चित्रपट,क्रीडा,तंत्रज्ञान आदी दहा क्षेत्रात देशाची स्थिती कशी होती व स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर आपण कोठे पोहोचलो आहोत? या ७५ वर्षात आपल्या देशाने केलेली देदीप्यमान प्रगती याविषयी माहिती सांगून भारत महासत्तेच्या दिशेने कशी वाटचाल करतो आहे याविषयी ते व्याख्यानातून माहिती देणार आहेत.
दयानंद कला महाविद्यालयात संगीत विषयाच्या अध्यपणाचे कार्य करणारे डॉ. संदीपान जगदाळे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे लातूर विभागीय समन्वयक म्हणून कार्यरत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून व राष्ट्रभक्तीची बीजे तरुणांच्या अंतर्मनातून रुजावीत यासाठी मानधन न घेता निशुल्क स्वरूपात ही व्याख्याने ते देणार आहेत. या मोफत व्याख्यानासाठी ८२७५४५४६९६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ.जगदाळे यांनी केले आहे.
या स्तुत्य व राष्ट्रहितार्थ केलेल्या संकल्पबद्दल डॉ.जगदाळे यांचे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सरचिटणीस रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन,प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड,उपप्राचार्य अनिलकुमार माळी,पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे,कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव यांनी अभिनंदन केले आहे.
—–











