*नाशिक मराठी साहित्य संमेलन*

0
361

नाशिक मराठी साहित्य संमेलन

यशस्वी….सुफळ…सुसंपन्न..!

लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाचे १४ व अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन दि. ३, ४ व ५ डिसेंबर २०२१ रोजी भुजबळ नॉलेज सिटी (आडगांव) येथे उभारण्‍यात आलेल्‍या कुसुमाग्रजनगरी मध्‍ये सुफळ संपन्‍न झाले… मोठ्या दिमाखात संपन्‍न झालेल्‍या या संमेलनाचे एका वाक्‍यात वर्णन करायचे झाल्‍यास ‘सुंदर, सुनियोजित, सुफल संपन्‍न…’!’ असेच करावे लागेल. कोरोनामुळे उद्भवलेली सुरूवातीची स्थिती, नंतर संमेलन स्‍थळात झालेला बदल, स्‍वातंत्र्यवीर सावकर यांच्‍या नावावरुन उद्भवलेला वादविवाह, मानापमान नाट्य, कांहीचा बहिष्‍कार, कोरोनाचा नवा विषाणु आणि एवढं सगळं कमी म्‍हणून की काय ऐनवेळी आलेला पाऊस… यावरुन आयोजकांची झालेली धावपळ …. या सर्वांवर यशस्‍वती मात करुन सुंदर सोहळा संपन्‍न झाला. अवकाळी पावसामुळे संमेलनस्‍थळी अक्षरशः चिखल झाला होता परंतु भुजबळांच्‍या नॉलेज सिटीमधील शेकडो कर्मचा-यांनी, आयोजकांनी अहोरात्र मेहन घेवुन संकटावर मात करीत अतिशय भव्‍य, देखना मंडप उभा केला. यासाठी हजारो हात झटले या परिश्रमाला सलाम!
साहित्यिकांची मांदियाळी आणि सारस्‍वतांचा मेळा असलेल्‍या अ.भा.मराठी साहित्‍य संमेलनाचा उद्घाटन सोहळा एका विशेष्‍ज्ञ कारणाने गाजला. संमलनाध्‍यक्षांपासुन ते प्रमुख पाहुण्‍यांच्‍या उपस्थितीची अनिश्चितता आणि मानापमान नाटयाचं सावट होतं. विशेष म्‍हणजे स्‍वागताध्‍यक्ष छनन भुजबळांनी नाराजी दुरू करण्‍याचा प्रयत्‍न करुनही महापौर सतिष कुलकर्णी या सोहळ्याला अनुपस्थित राहिल्‍याने भाजपने या संमेलनावर बहिष्‍कार टाकला. संमलेनाध्‍यक्ष नारळीकरांच्‍या उपस्थितीबाबत आदल्‍या दिवसापर्यंत अनिश्चितता होती. शेवटी ते आलेच नाहीत. उद्घाटन सोहळ्याला मावळते अध्‍यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे हे दोघेही प्रकृती अस्‍वास्‍थामुळे अनुपस्थित राहिले. हा अपवाद वगळता उद्घाटन सोहळा दिमाखदार झाला असेच म्‍हणावे लागेल. प्रमुख वक्‍त्‍यांची लांबलेली भाषणे आणि उशीराने सुरु झालेला हा सोहळा कंटाळवाणा झाला. हिंदी साहित्‍य, संवाद पटकथाकार आणि जेष्‍ठ लेखक कवी जावेद अख्‍तर यांच्‍या भाषणाने थोडी रंगत आली होती. परंतु खूपच लांबत गेलेल्‍या या उद्घाटन सोहळ्यात मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई भाषणे सुरू झाले त्‍यावेळी अनेक श्रोत्‍यांनी मुख्‍य मंडपातून काढता पाय घेतला.


लक्षवेधी ग्रंथदिंडी
आल्‍हाददायक वातावरणात टाळमृदंगाच्‍या गजरात कविवर्य कुसूमाग्रजांच्‍या आणि स्‍वातंत्र्यवीर सावरकरांच्‍या स्‍मृतीस वंदन करुन अत्‍यंत जल्‍लोषात निघालेल्‍या ग्रंथदिंडीने मराठीच्‍या उत्‍सवाच्‍या जागराचा प्रारंभ केला. पावसाने दिलेलीख्‍ वसंत, धुकेही फीटल्‍याने आनंदित, हर्षोल्‍हासित वातावरणात, शालेय विद्यार्थ्‍यांचे चित्ररथ आणि पारंपारिक वेषांतील महिला, युवतींचा ढोलपथकांचा व लेझीमचा उत्‍साह अशा भारावलेल्‍या वातावरणात निघालेल्‍या ग्रंथदिंडीचे ठिकठिकाणी पुष्‍प वर्षावाने स्‍वागत केले गेले. टिळकवाडीतील कवी कुसुमाग्रज यांच्‍या निवासस्‍थांनी ग्रंथपूजनानंतर सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडी निघाली. त्‍यात साहितय मंडळाचे अध्‍यक्ष प्राचार्य कौतिकराव ढाले-पाटील, महामंडळाचे कार्याध्‍यक्ष दादा गोरे, संमेलनाचे स्‍वागताध्‍यक्ष छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, नाशिकचे महापौर सतिष कुलकर्णी, खासदार श्रीनिवास पाटील, विधानसभेचे उप‍सभापती नरहरी झिरवळ यांच्‍यासह इतर प्रमुख, साहित्यिक, कवी, विद्यार्थी सहभागी झाले होते.
दिमाखदार सोहळ्यातून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे भव्य उदघाटन
मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे, लेखकाच्या स्वातंत्र्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याचा पहिला विरोध करणारा मी असेल – स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी आपले मत मांडले.
मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन..

यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई,कृषी मंत्री दादाजी भुसे, प्रमुख पाहुणे जावेद अख्तर, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील,उदघाटक विश्वास पाटील,डॉ.दादा गोऱ्हे,रामचंद्र साळुंखे, खासदार श्रीनिवास पाटील,शुभांगीणीराजे गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले, सदानंद मोरे, उत्तम कांबळे, लक्ष्मीकांत देशमुख,श्रीपाल सबनीस,हेमंत टकले,समीर भुजबळ,पंकज भुजबळ,जयप्रकाश जातेगावकर,विश्वास ठाकूर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, मिलिंद कुलकर्णी,प्राचार्य प्रशांत पाटील, संजय करंजकर, दिलीप साळवेकर, स्वानंद बेदरकर यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
.
नाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ – ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील

मराठी साहित्यासाठी काम करताना या गोदेच्या काठावर अधिक सुंदर लिहीण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले आहे. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नाॅलेज सिटी नाशिक येथे उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील म्हणाले की, साहित्य संमेलन मला एका चमत्कारा सारखे वाटते. पावसाचा व्यत्यय असतांना वाघासारखे पुढे येऊन छगन भुजबळ यांनी दिवस रात्र काम करून हे सर्व संमेलन स्थळ उभं केलं. यामागे कुसुमाग्रज, वसंत कानेटकरांच्या भूमीची प्रेरणा आहे. नाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ आहे तात्यासाहेब यांचे घर हे माझ्यासाठी अजिंठा तर कानेटकरांचे घर हे वेरूळ असल्याचे सांगत यामध्ये पानिपत ही कादंबरी महत्वाची आहे असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात अनेक कवी लेखकांचे दुःखद निधन झाले याच दुःख वाटते. शिवरायांच्या स्मृती आपल्याला जतन करायला हव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्रासाठी, मराठीमाती साठी अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे शाहीर, अनेक साहित्यिक, लेखक यांनी रस्त्यावर येऊन जो संघर्ष उभा केला होता त्याची आठवण देखील संमेलनाचे उद्घाटक विश्वास पाटील यांनी यावेळी मांडली.
यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, साहित्य संमेलन घ्यावे की नाही यावर प्रत्येक वर्षी प्रश्न उपस्थित केले जातात. जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, राजकीय पक्षांच्या नावावर, भोंदू बाबांच्या नावावर जर लोक एकत्र येत असतील तर मराठी भाषेसाठी एकत्र आले तर काय हरकत आहे असा सवाल देखील यावेळी विश्वास पाटील यांनी उपस्थित केला.
जो बात कहते डरते है सब तु वो बात लिख इतनी अंधेरी न थी रात पहले लिख- जावेद अख्तर
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असलेले जावेद अख्तर म्हणाले की, मराठी साहित्याच्या दरबारात येण्याची संधी मिळाली ही अतिशय आनंदाची बाब असून या मातीला मी प्रणाम करतो. मातृभाषा आपल्याला भूतकाळातून वर्तमानात आनते असे मत देखील त्यांनी यावेळी मांडले
यावेळी ते म्हणाले की, लेखक जेव्हा सर्वसामान्य नागरिकाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही बाब समाजातील काही लोकांना रुचत नाही हे योग्य नाही. आपलं परखड मत समाजापुढे मांडल्यावर पूर्वी काही लोक दोषी मानत होते. आता तर देशद्रोही ठरविले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केले.साहित्य आणि राजकारण याच नातं काय हा प्रश्न नेहमीच उभा राहतो. मात्र साहित्य आणि राजकारण याच घनिष्ठ नातं आहे.


पुढे प्रमुख पाहुणे जावेद अख्तर म्हणाले की लोकशाही व्यवस्थेसाठी कुठलाही बंधनात न वावरनारे अतिशय महत्वाचे असुन साहित्यिकांनी राजकारणाच्या दबावाला बळी पडू नये. त्यांनी मुक्तपणे साहित्य लिहावे असे मत त्यांनी व्यक्त केले. कुठल्याही कवि लेखककावर अन्याय होत असेल तर सर्व लेखकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.
जो बात कहते डरते है सब तु वो बात लिख
जो बात कहते डरते है सब तु वो बात लिख
इतनी अंधेरी न थी रात पहले लिख- जावेद अख्तर असे म्हणत जावेद अख्तर यांनी लेखकांना निर्भीडपणे लिहीण्यासाठी साद घातली.
मराठी साहित्य संमेलनात होणारे वाद टाळून, संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे- प्रा. कौतिकराव ठाले-पाटील
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर येऊ शकले नाही याची उणीव भासत आहे. साहित्य महामंडळाने संहिता बदलली त्यातून नवीन अध्यक्ष निवडण्यात आले. या संमेलनात अध्यक्ष हजर राहू शकले यांनी यामुळे संमेलनास वेगळी किनार लाभली. त्यामुळे यापुढे अध्यक्ष निवडीबाबत विचार करावा लागणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, तरुण साहित्यिकांना बोलत करणं हा साहित्य संमेलनाचा प्रयत्न आहे.समाज स्थितीशील राहिला नाही गतिशील झाला आहे. हळुवार का होईना बदल होत आहे हा बदल समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.साहित्य संमेलनाच्या साहित्यिक मेजवाणीचा लाभ नागरिकांना घ्यावा विविध कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच नाशिकचं संमेलन इतकं वेठीस धरलं गेलं त्याचा मला खेद वाटतो. आपल्याला असलेल्या प्रश्नांची उत्तरे चर्चेतून मिळू शकतात. त्यामुळे वादविवाद टाळावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत गाजली. डॉ. चंद्रकांत पाटील व दिलीप माजगावकर या मुलाखतकारांनी चांगले प्रश्न विचारुन मुलाखत रंगवली.
पुढच्‍या पिढीसाठी संमेलन गरजेचे
संमेलनाचे उद्घाटक प्रख्‍यात लेखक पानीपतकार विश्‍वास पाटील यांचेही प्रभावी भाषण झाले. ‘अलीकडच्‍या काळात साहित्‍य संमेलने व्‍हावीत की नाही, साहित्‍य समंलनांची खरंच गरज आहे का? असे प्रश्‍न उपस्थित केले जातात. मात्र, आपल्‍याकडे जाती, धर्म, मंडळे, संघटना आणि राजकीय कारणांसाठी मोठे मोठे मेळावे आणि अधिवेशने घेतली जातात. त्‍यासाठी वारेमाप खर्चही केला जातो. तर साहित्यिकांचा गोतावळा देवाण-घेवाण करण्‍यासाठी आणि महत्‍तवाचे म्‍हणजे पुढच्‍या पिढीच्‍या दिशादर्शनासाठी साहित्‍य संमेलने का होऊ नयेत असा प्रश्‍न उपस्थित करुन साहित्‍य संमेलने झालीच पाहिजेत असे प्रतिपादनही विश्‍वासरावांनी केले ते रास्‍त असेच आहे. तसेच जगात सर्वांत जास्‍त ज्‍या दहा भाषा बोलल्‍या जातात. त्‍यात आमची माय मराठी आहे. त्‍या भाषेचे सेक्‍सपिअर वि.वा.शिरवाडकर हे होते. त्‍यांचे विशाखा हे महाकाव्‍य होते. तात्‍यासाहेब हे माझे अजिंठा होते तर, कानेटकर हे वेरुळ होते. असेही संमेलनाध्‍यक्ष डॉ.जयंत नारळीकर म्‍हणाले.
इंग्रजी मराठी भाषेपेक्षा अधिक समृध्‍द
संमेलनाध्‍यक्ष डॉ.जयंत नारळीकर संमेलनास आले नाहीत परंतू त्‍यांचे लिखित भाषण सर्वत्र वितरीत करण्‍यात आले. या भाषणाचा संक्षिप्‍त गोषवारा मांडण्‍याचा प्रयत्‍न करतो आहे. ‘सामाजिक’ घडामोडीचे संपुर्ण प्रतिबिंब साहित्‍यात उमटले. एखादी भाषा पुष्‍कळ विकसित असेल तर समाजाचे बहुतेक पैलू त्‍यात उमटतात. परंतु काही महत्‍वाचे पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले तर त्‍या बाबतीत तिला असमृध्‍द समजले पाहिजे. अशा मापदंडाद्वारे आपण असे म्‍हणू शकतो की इंग्रजी भाषा मराठी भाषेपेक्षा अधिक समृध्‍द आहे. असे वादग्रस्‍त विधान संमेलनाध्‍यक्षांनी आपलया लिखित भाषणात केले आहे. काही समीक्षक अशी तक्रार करतात की, माझया कथेतील पात्रे खुपदा इंग्रजी शब्‍दांचा वापर करतात. या समीक्षकांना माझे उत्‍तर असे आहे की, इंग्रजी शब्‍दांचा उच्‍चार न करता त्‍यांनी दिवसभर मराठी बोलून दाखवावे. त्‍यांना कळेले की, काही इंग्रजी शब्‍द भाषांमधील शब्‍द आपल्‍या भाषेत आल्‍यामुळे भाषा विकसित होते, समृध्‍द होते असे बहुधा नारळीकरांना सुचवायचे असेल असो!
भुजबळांची नाराजी
स्‍वागताध्‍यक्षीय भाषणामध्‍ये छगन भुजबळ यांनी व्‍यक्‍त केलेली नाराजी रास्‍त आहे की ती राजकीय हेतूने प्ररित होती यावर नंतर सविस्‍तरपणे विश्‍लेषण करता येईल. मराठी ही भाषा अभिजात भाषा आहे. तिला २२५० वर्षाचा इतिहास असल्‍याने शिलालेख ताम्रपट इस्‍तालिखित पोथ्‍यांचे शेकडो पुरावे आपल्‍या संगमनेरचे प्रा.रंगनाथ पठारे यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीने त्‍यांच्‍या अहवालात दिलेले आहेत. हा अहवाल भारत सरकारने नेमलेल्‍या सर्व भाषातंज्‍ज्ञांनी तपासला आणि एकमताने तो उचलून धरला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही त्‍यांची राजकीय शिफारस गेली सात वर्षे केंद्र सरकारकडे पडून आहे. आपले मुख्‍यमंत्री व उपमुख्‍यमंत्री यांनी समक्ष भेटून पंतप्रधानांकडे तशी मागणी केलेली असुनही तिला मान्‍यता मिळालेली नाही, अशा शब्‍दात त्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या कार्यप्रध्‍दतीवर नाराजी व्‍यक्‍त केली. ‘राजकरण आणि संमेलन याविषयी वेळोवेळी चर्चा होत आली आहे. मात्र साहित्‍य संमेलनाची आखणी करताना आपल्‍याला राजाश्रय हवा असतो. शासनाने तो दिला पाहिजे. तुम्‍ही मंडळी राजकीय पार्श्‍वभुमी लक्षात घेऊन कथा कांदबचया रचत असता. वात्रटिकांसाठी राजकीय पुढा-या इतका मसाला कोणी पुरवत नाही. तरी सुध्‍दा संमेलनाच्‍या मंचावर राजकीय नेत्‍यांने असू नये हा सुर योग्‍य नाही. ‘राजा तू चुकतो आहे. हे साहित्यिकांचे स्‍वातंत्र्य अबाधित रहावे हीच भूमिका असे स्‍पष्‍ट मत भुजबळ यांनी नोंदवले.
ठाले-पाटलांचा टोला
संमेलनाच्‍या उद्घाटन सोहळ्यात महामंडळाचे अध्‍यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी आयोजनाच्‍या वादावरुन नाशिकच संमेलन इतकं वेठीस धरलं गेलं त्‍याचा मला खेद वाटतो. आपल्‍याला असलेल्‍या प्रश्‍नांची उत्‍तरे चर्चेतून मिळू शकतात. त्‍यामुळे यापुढील काळातही वादविवाद टाळणे तितकेच महत्‍वाचे आहे अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. तसेच संपूर्ण व्‍यवस्‍था केलेली असतानाही संमेलनाध्‍यक्ष डॉ.नारळीकर अनुपस्थित राहिले असे सांगत त्‍यांनी संमेलनाचा उद्देश सफळ करायचा असेल तर हिंडता-फीरता अध्‍यक्ष निवडला जावा, अशा शब्‍दात आयोजकांना टोला लगावला. कोरोनामुळे आधीच वर्षभर रखडलेल्‍या साहित्‍य संमेलनास आणि आयोजकांनी हेलिकॉप्‍टरची व्‍यवस्‍था केलेली असतानाही डॉ.नारळीकर आले असते तर बरे झाले असते. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे महामंडळ अध्‍यक्ष निवडीची घटना अडचणीत झाली आहे. त्‍यामुळे यापुढे संमेलनाध्‍यक्ष निवडीबाबत विचारा करावा लागणार आहे असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केल्‍यामुळे नवीन वर्षात उदगीर ये‍थे होणा-या ९५ व्‍या साहित्‍य संमेलनात योग्‍य अशा साहित्यिकांची संमेलाध्‍यक्षपदी निवड होईल अशी अपेक्षा धरायला काही हारकत नाही.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या जीवन प्रवास ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या जीवन पर गौरवाच्या ५० ग्रंथांचे प्रकाशन संपन्न झाले. हा सोहळा राजमाता शुभांगी राजे गायकवाड यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी प्रकाशन संस्थेचे संपादक बाबा भांड यांनी साहित्यही राष्ट्राची संपत्ती असून ही जपण्याचे काम राष्ट्राच्या राजाचे असते आणि ते काम महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी केले. सन १९८२ मध्ये गायकवाड यांनी स्वखर्चाने अस्पृश्य लोकांना शिकवण्यासाठी काम हाती घेतले. तसेच त्यांनी महिलांसाठी शिक्षण सक्तीचे केले.
राजमाता शुभांगी राजे गायकवाड यांनी आज सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याचा नवीन परिचय करून दिला. महाराज सयाजीराव गायकवाड यांचा पुस्तक प्रकाशन सोहळा आज माझ्या हाती संपन्न झाला हे माझे भाग्यच आहे. सयाजीराव गायकवाड यांनी मुलींसाठी पहिली व्यायाम शाळा सुरू केली. त्याचप्रमाणे वारसाहक्काने स्रियांना मालमत्तेमध्ये स्थान छान देणारे बडोदा सरकार हे पहिले होते असे सांगितले.
यावेळी प्रकाशन संस्थेचे संपादक बाबा भांड, पालकमंत्री छगन भुजबळ, शिक्षण समितीचे प्रमुख माने सर तसेच यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही ऑनलाइन स्वरूपात संवाद साधला.
बाल कलाकारांची मैफल
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालकुमार साहित्य मेळाव्याचे उदघाटन होऊन मेळाव्याला सुरुवात झाली. यात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, सर्वश्री उपासनी, शिवांजली पोरजे आदी. मान्यवरांच्या उपस्थितीत जेष्ठ अभिनेते व बाल साहित्यिक दिलीप प्रभावळकरांच्या हस्ते झाली.
उदघाटन समारंभानंतर राजेंद्र आढाव या इयत्ता ५ वी तील बाल चित्रकाराने मा. छगन भुजबळ व दिलीप प्रभावळकरांचे साकारलेले स्केच त्यांना भेट दिले.
गणरायला आवाहन करत ओमकार कानेटकर याने जय गांगुर्डे याच्या साथीने गणनायकाय गाण्याने बालमैफल रंगवली.
तसेच श्रुष्टी पगारे हिने ‘जय शारदे वागेश्वरी’ या भक्तीगीतचे सादरीकरण केले.
दिलीप प्रभावळकर मुलांशी संवाद साधत असतानाच एकीकडे बाल चित्रकारांचे काम सुरु होते. यात अवघ्या ३ वर्षाची ओजस्वी कांगणे हिचे रेखाटन सुरु होते. तसेच राजवर्धन (शहादा), अनिकेत नन्नावरे, तलहा शेख, जानव्ही कोते (श्रीरामपुर), प्रसाद आव्हड (पास्ते), अभिजीत लांडगे (ठाणगाव), किर्ती ठाकरे (त्र्यंबकेश्वर), तानज पवार( हरसू), मयुरेश आढाव( नाशिक), प्रणव आव्हड(दापुर), अभिषेक निकम, अनुराग गौड, शुभम सांगळे, यश महाजन (रा. सिन्नर) या बाल चित्रकारांनी निसर्गचित्रे, व्यक्तीचित्रे रेखाटली.
वेदांत पाटिल व अक्षय कुलकर्णी या बाल लेखकांच्या पुस्तकाचे प्रकाशन दिलीप प्रभावळकरांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना नंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार विषयावर परिसंवाद
कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटी येथे सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोरोना नंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार या विषयावर परिसंवादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या परिसंवादात कोरोना काळात कोरोना काळात देशाचेच नव्हे तर, जगाचे अर्थचक्र कशाप्रकारे थांबले होते, त्याचा परिणाम हा देशावर आणि देशाच्या नागरिकांवर कसा झाला, याची अनेक उदाहरणे देत माहिती देण्यात आली. कोरोना काळात बेरोजगारी, बेकारी, दरिद्री कशी वाढत गेली, आणि त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा झाला. “अर्थकारण म्हणजेच संपूर्ण जीवन” माहिती आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आलेल्या संकटांचे व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारे करता येईल याची नियोजन बद्धता वाढली. संकटही येत असतात त्यातूनच आपण संधी शोधली पाहिजे आणि त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. त्यातून आपला उत्कर्ष साधता आला पाहिजे असं आशुतोष रारावीकर यांनी सांगितलं.
परिसंवाद :- शेतकऱ्यांची दुःस्थिती, आंदोलने, राजसत्तेचा निर्दयीपणा ,लेखक ,कलावंतांचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका…
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये शेतकऱ्यांची दुःस्थिती, आंदोलने, राजसत्तेचा निर्दयीपणा ,लेखक ,कलावंतांचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका या परिसंवादाचा कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. अध्यक्षस्थानी लेखक शेषराव मोहिते हे होते. याप्रसंगी प्राध्यापक हरी नरके ,विलास शिंदे, रमेश जाधव, शैलेंद्र तनपुरे ,संजय आवटे उपस्थित होते .”लष्करी तोयबा पेक्षा लष्करी होयबा” हा जास्त घातक असल्याचे विधान मांडण्यात आले. शेतकरी कायदे हे कोणतीही चर्चा, विचारविनिमय न करता देशावर लादले गेले आणि कोणतीही चर्चा न करता मागे घेण्यात आले. साहित्यिकांनी व कलाकारांनी सरकारला प्रश्न विचारणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचे विधान सर्वांना उद्देशून व्यक्त करण्यात आले. निशिकांत भालेराव यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये १८ टक्के योगदान आहे असे मत व्यक्त केले. “स्केल ऑफ फायनान्स”, “स्केल ग्राफ” हा शेती व्यवस्थेमधील महत्त्वाचा विषय असल्याचे मत मांडण्यात आले. याप्रसंगी सह्याद्री फार्म चे संचालक विलास शिंदे उपस्थित होते. हे शेती व्यवस्थेमध्ये २३ हजार हेक्‍टरवर ‍सध्या काम करत आहे.याप्रसंगी “शेतकरी खामोश आहे पण तू गप्प बसणार नाही “हे वक्तव्य करण्यात आले .प्रेक्षक वर्ग आणि रसिकप्रेमिकांप्रेमी कडून या विधानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ऑनलाईन वाचन काळाची गरज ” परिसंवादामध्ये सर्वांचा सूर
नाशिक: येथे कुसुमाग्रजनगरीत होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ” ऑनलाईन वाचन वाड:मय विकासाला तारक की मारक?” परिसंवाद झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.दिलीप धोंडगे हे होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिलीप पवार यांनी केले. या परिसंवादात प्रा. श्रृतीश्री वडगबाळकर, डॉ.विलास साळुंके,मयुर देवकर,मंदार भांरदे या मान्यवरांनी सहभाग घेतला होता.
उद्घाटन समयी बोलताना प्रा.श्रृतिश्री वडगबाळकर म्हणाल्या की,कोरोना काळात ऑनलाईन वाचन तारक ठरलंय आणि ही आता काळाची गरज आहे.तर ‘काळ हा सर्वात मोठा गुरू आहे,त्यापुढे नमावे लागते.येणाऱ्या काळात ऑनलाईन वाचन स्वीकारावे लागेल’ असे मत डॉ.विलास साळुंके यांनी मांडले.सहभागी मयुर देवकर यांनी ‘ ऑनलाईन वाचन वाड:मयाला लगेच दोष देणे अयोग्य;वेळ द्यावे लागेल’ असे सांगितले.तसेच मंदार भांरदे यांनी ऑनलाईन वाड:मय व्यावहारिक दृष्ट्या योग्य आहे असे ठाम सांगितले.अध्यक्षीय भाषण करताना प्रा.धोंडगे म्हणाले की ‘ऑनलाईन वाचन हे घाईने केले जात आहे,त्यामध्ये सलगता असणे गरजेचे आहे’.शेवटी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता झाली.
गाजलेले परिसंवाद
‘शेतक-यांची दुःस्थिती, आंदोलने, राजसत्‍तेचा निर्दयपणा लेखक, कलावंताचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका !’ या विषयावरील परिसंवाद खुपच गाजला. भास्‍कर चंदनशिव यांच्‍या अध्‍यक्षतेखाली होणा-या या परिसंवादात चंदनशिव यांच्‍यासह ना.बच्‍चू कडू, रमेश जाधव हे अनुपस्थित राहिले. परंतु संजय आवटे, निशिकांत भालेराव शैलेंद्र तनपुरे, श्रीमंत माने या जेष्‍ठ पत्रकारांनी अभ्‍यासपुर्ण व दमदार बॅटिंग करुन उपस्थितांची मने जिंकली. विलास शिंदे, डॉ.हरी नरके आ‍णि शेषराव मोहिते यांनीही विषयाची चांगली मांडणी केली. ‘वृत्‍तमाध्‍यमांचे मनोरंजनीकरण’ हा परिसंवादपण गाजला. गिरीश कुबेर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झालेल्‍या या परिसंवादात जयदेव डोळे, विश्‍वंभर चौधरी, अपर्णा वेलणकर, डॉ.हरी नरके यांनी सहभाग नोंदवला. प्रसिध्‍द निवेदक प्रसन्‍न जोशी यांनी खमासदार शैलीत सुत्र संचालन केली. या दोन्‍ही परिसंवादास श्रोत्‍यांची गर्दी होती.
निमंत्रिकांचे कविसंमेलन गझलमंच, बालकुमार साहित्‍य मेळावा, जय जय माय मराठी हा सांस्‍कृतिक कार्यक्रम आणि कथाकथन तसेच ‘मराठी नाटक – एक पाऊल पुढे, दोन पावलं मांगे’ ‘भाषा लेखक आणि लोकशाही’ ‘कोरोना नंतरचे अर्थकारण व मराठी साहित्‍य व्‍यवहार’ ‘गोदातीरीच्‍या संतांचे योगदान!’ ‘नाशिक जिल्‍ह्याची निर्मिती – १५१ वर्षातील वाटचाल विकास आणि संकल्‍प’ ‘ऑनलाईन वाचन – वाड.मय विकासाला तारक की मारक?’ ‘साहित्‍य निर्मितीच्‍या कार्यशाळाः गरज की थोतांड’ या परिसंवादासही श्रोत्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला. एका परिसंवादात पत्रकार करुन नरेंद्र मोदीवर जहरी टीका केली. असो !
समारोप
उद्घाटन सोहळा जसा थाटात संपन्‍न झाला तसाच या संमेलनाचा समारोप देखील तेवढाच दिमाखदार झाला. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष खा.शरद पवार, न्‍यायमुर्ती नरेंद्र चपळगांवकर, स्‍वागताध्‍यक्ष छगन भुजबळ, विधानसभा अध्‍यक्ष नरहरी झिरवळ महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार हेमंत गोडसे, श्रीनिवास पाटील, महामंडळाचे कार्याध्‍यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि इतर मान्‍यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शरद पवार यांनी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या त्‍यागाविषयी चर्चाच होऊ शकत नाही, असे प्रारंभीच स्‍पष्‍ट करुन वादावर पडदा टाकण्‍याचा प्रयत्‍न केला. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच एक आगळं-वेगळं व्‍यक्तिमत्‍व होत. मला एका गोष्‍टीचा खुप आनंद होतो आहे की, यावेळचे संमेलनाध्‍यक्ष डॉ.जयंत नारळीकर आहेत. विज्ञानवादाचा पुरस्‍कार त्‍यांनी या साहित्‍य संमेलनात केला. माझ्या वाचनात जे जुने साहित्यिक आहेत आणि त्‍यांच लिखाण ज्‍यावेळी मी आठवतो त्‍यावेळी मला सावरकर आठवतात.
वीर सावरकर हे विज्ञानवादी होते. ते नाही त्‍या गोष्‍टीचा पुरस्‍कार कधीही करत नव्‍हते. त्‍यांच योगदान आपण कधीही विसरु शकत नाही. तसंच सावरकरांच्‍या नावावरुन जो वाद झाला तो दुदैवी आहे असंही वक्‍तव्‍य शरद पवारांनी केल. त्‍यांना विरोध असण्‍याच काही कारणच नाही असंही ते म्‍हणाले.
पाठ्यपुस्‍तकांच्‍या रचनेत आधुनिकता आणता येईल का? याकडे लक्ष देणे व आधुनिकता आणण्‍यासाठी सातत्‍याने काम करणे अत्‍यावश्‍यक आहे. नाहीतर माहितीच्‍या वेगवान जगात मराठी खूप मागे पडेल. तसेच पदवी-पदव्‍युत्‍तर लिखाणात मराठी भाषा कमी होत चालली आहे. यशवंतराव चव्‍हाणांना मराठी भाषेची वैज्ञानिक प्रांतात वृध्‍दी व्‍हावी अशी कळकळ होती. दहावी पर्यंत विज्ञानात मराठी भाषा आहे. परंतू पदवी व नंतरच्‍या अध्‍यापनात मराठी दिसत नाही. मराठी भाषेची पिछेहाट होण्‍यामागे हे एक महत्‍त्‍वाचे कारण आहे. असे ते म्‍हणाले. साहित्‍य संमेलनाच्‍या व्‍यासपीठावर राज्‍यकर्त्‍यांनी व नेत मंडळीनी कशा प्रकारचे भाषण करावे याचा वस्‍तुपाठच शरद पवार या मुत्‍सधी नेत्‍याने घालून दिला आहे. त्‍यांचे हे अराजकीय भाषण अनेकांना भावले असेच म्‍हणावे लागेल.
मराठी भाषेचा स्वाभिमान जपायला हवा : शरद पवार
९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप
कुसुमाग्रजनगरी (भुजबळ नॉलेज सिटी) नाशिक :- ‘मराठी भाषेचा स्वाभिमान आपण जपायला हवा. त्यासाठी मराठी मन घडवावे, भाषा संपली तर आपली अस्मिता देखील नष्ट होईल!’असा इशारा ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी विशेष अतिथी म्हणून बोलताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिला. गेल्या तीन दिवसांपासून भरगच्च गर्दी आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रम व उपक्रम यांनी गजबजलेल्या संमेलनाची दिमाखदार सांगता झाली.
नाशिकचे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहित्य कर्तृत्वाचा उल्लेख करून त्यांनी गौरव केला व कुसुमाग्रज यांचे नाव साहित्य नगरीस दिले हे योग्यच असल्याचे स्पष्ट केले. समाजमाध्यमांत मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करण्याचे आवाहन करून शालेय शिक्षणासाठी इंग्रजीला प्रधान्य दिले जाते, महाविद्यालयिन शिक्षणात देखील मराठीतून शिक्षण देण्याचा विचार व्हावा. पाठ्यपुस्तकांच्या रचनेत आधुनिकता आणण्यासाठी सातत्याने काम करणं आवश्यक आहे. बहुजनांच्या भाषेला बोली भाषेला साहित्यात व मराठी कोशात अधिक स्थान द्यायला हवे. प्रमाण भाषेबद्दल दुराग्रह सोडून सर्व शैलींना स्थान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
तर लोकशाही संपेल :न्या.चपळगांवकर
न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी लोकव्यवहारात मराठीचा करायला हवा असे सांगून कन्नड, बंगाली भाषेत बोलण्याचा जसा आग्रह धरला जातो तसे मराठीत होत नाही, मुंबईत मराठी लोक हिंदीत बोलतात अशी खंत व्यक्त केली. सिव्हिल सोसायटी राज्यकर्त्यांना देखिल सूचना करते असे सांगून पंडित नेहरू यांच्या काळातील विविध उदाहरणे सांगितली. लेखकांनी आपले स्वातंत्र्य जपावे, राज्यकर्त्यांच्या आहारी जाऊ नये! त्यामुळे राष्ट्र तेजस्वी बनेल असे सूचित केले. मी म्हणतो तेच खरे असे म्हटले तर लोकशाही संपेल असा इशारा त्यांनी दिला.
साडेतीन लाख लोकांनी संमेलन पाहिले…..
ना. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात नाशिक संमेलनाचा गौरव करताना तीन लाख ४०हजार लोकांनी हे संमेलन ऑनलाईन पाहिल्याचे सांगितले. नाशिक ही संतांची भूमी आहे प्राजक्त देशमुख यांच्या रूपाने नवी पिढी साहित्य नाट्यक्षेत्रात पुढे येत आहे. संतांच्या परंपरा राज्य घटनेत आल्या. स्वातंत्र्य म्हणजे भीक म्हणणे चुकीचे आहे. यावर कोणताही साहित्यिक काही बोलला नाही याचे वाईट वाटते. अशी खंत ना. थोरात यांनी व्यक्त केली. दुर्गा भागवत यांच्या विचारांचा उल्लेख करून विरोधी विचार असूनही यशवंतराव चव्हाण यानी त्यांचे राजकीय व्यासपीठावर स्वागत असल्याचे सांगितले, अशी माहिती थोरात यांनी दिली. लेखणीत मोठी ताकद असून भारतात चुकीचे घडत असेल तर साहित्यिकांनी आवाज उठवावा असे आवाहन त्यांनी केले. अमेरिकेत व तुर्कस्थानात विचारवंत जागृत आहेत,असे ते म्हणाले. देश, राज्यघटना संकटात येईल त्या त्या वेळेस आम्हाला सहित्यिकांची गरज आहेअसे त्यानी सांगितले.
मराठीला अभिजात दर्जा द्या
अ. भा. साहित्य महामंडळाच्या वतीने विविध ठराव मांडण्यात आले. प्रथम दिवंगत साहित्यिक व विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने देण्यात यावा, मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू नयेत म्हणून राज्य शासनाने प्रयत्न करावे असे ठराव मंजूर करण्यात आले. कर्नाटकातील मराठी भाषेची गळचेपी होत असल्याबद्दल कर्नाटक सरकारचा सरकारचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राचे पुनरुज्जीवन करावे व तेथे मराठी माणसांची नेमणूक करावी, भारत सरकारच्या खात्यात ळ वर्ण वापरण्यात यावा, ग्रंथालय कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन देण्यात यावे, न्या रानडे यांचे निफाड येथे स्मारक तसेच नाशिक येथे वामनदादा कर्डक व बाबुराव बागुल यांच्या स्मारकाच्या कामास गती द्यावी हेही ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले.
न्या.नरेंद्र चपळगावकर, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, ना. नरहरी झिरवाळ, खा.हेमंत गोडसे,खा.श्रीनिवास पाटील,माजी खासदार समीर भुजबळ, आ. माणिकराव कोकाटे, पंकज भुजबळ, मुख्य
समन्वयक विश्वास ठाकूर,लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, मुकुंद कुलकर्णी, सार्वजनिक वाचनालयाचे प्रा.शंकर बोऱ्हाडे आदींसह साहित्य महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्राचार्य प्रशांत पाटील यांनी स्वागत केले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना.भारती पवार यांचा शुभेच्छा संदेश सूत्रसंचालक यांनी वाचून दाखवला.
एकुणात हे साहित्‍य संमेलन सुनियोजित, सुफळ संपन्‍न झाले असेच म्‍हणावे लागेल. निवास व भोजन व्‍यवस्‍था उत्‍तमच होती. स्‍टॉलधारकांच्‍या दृष्‍टीकोनातून साहित्‍य संमेलन दशकातले सर्वोकृष्‍ठ व्‍यवस्‍थान होते. या संमेलनात सर्वात यशस्‍वी ठरलेला विभाग म्‍हणजे गझलकट्टा. सगळेच मुशायरे ऐकायला श्रोत्‍यांनी एवढी तुफान गर्दी केली की हॉलच्‍या आत जाणंसुध्‍दा अशक्‍य होऊन बसलं होत आणि श्रोत्‍यांच्‍या प्रतिसादाबद्दल तर काय बोलांव? सगळ्याच कार्यक्रमांना श्रोत्‍यांनी गर्दी केली होती. अतिशय दिमाखदार पध्‍दतीने यशस्‍वी झालेले हे संमेलन असेच या साहित्‍य संमेलनाचे वर्णन करावे लागेल एवढे मात्र खरे !

गोपाळ कुळकर्णी

संपादक 9422071166

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here