लातूर येथे नुकतीच सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेली, सिनेअभिनेते, दिग्दर्शक व निर्माते, लेखक, कवी अशा बहुआयामी राजेश देशपांडे (मुंबई) यांच्या ‘सृजन दि क्रियेशन’ संस्थेची नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. नाट्य प्रशिक्षण केवळ रंगभूमीवर अभिनय करणाऱ्यासाठीच नसून, दैनंदिन जीवनात भाषा, आचार, विचार, सादरीकरण, समाजाची समज, विशिष्ट परिस्थिती व मानसिकतांचा अदमास, व्यक्तिरेखांचा अभ्यास अशा विविध अंगांनी नाट्यकला व्यक्तिमत्वाचा परिपोष व विकास घडवत असते. त्या दृष्टीने निवळ पुस्तकी आख्यान व व्याख्यानबाजी न करता प्रत्यक्ष कृतिशीलतेतून नाटकाचा व त्यायोगे भावभावना आणि विचारांचा आविष्कार कसा घडत जातो, असा अत्यंत आनंददायी कृतिशील अनुभव या ३० एप्रिल व १ मे रोजी संपन्न झालेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत प्रशिक्षणार्थ्यांनी घेतला.

सुरुवातीला अशा कार्यशाळांची ग्रामीण आणि दुर्गम भागात तर गरज आहेच, पण नाट्य संस्कृतीचा वारसा लाभलेल्या लातूरसारख्या शहरातील उमेदीच्या प्रतिभावंत कलाकारांनी व हौशी रंगकर्मींनी नव्या परिप्रेक्ष्यातील नाट्य चळवळीचा अभ्यास करण्यासाठी अशा संधीचा लाभ घेतला पाहिजे, असे मत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे लातूर येथील अध्यक्ष व सुप्रसिद्ध नाटककार रंगकर्मी श्री. शैलेश गोजमगुंडे यांनी या कार्यशाळेचे उद्घाटन करताना स्पष्ट केले. ‘सृजन दि क्रिएशन’चे संस्थापक व ‘धुडगूस’, ‘गंगूबाई …’ इ. कलाकृतींचे निर्माते दिग्दर्शक व सिनेनाट्य अभिनेते राजेश देशपांडे यांनी कोरोना काळातील १६ ऑनलाईन कार्यशाळा व मुंबई, रत्नागिरी, नाशिक भागातील प्रत्यक्ष कार्यशाळांनंतर लातूर येथील या कार्यशाळेच्या आयोजनाचे स्वागत केले. नाट्यस्पंदन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शहरातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ बाल रोग तज्ज्ञ डॉ. अशोक आरदवाड यांनी उद्घाटनाच्या अध्यक्षीय समारोपात कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानचे कौतुक केले.

या कार्यशाळेत नाट्याभिनयासाठी आवश्यक असलेल्या भाषा, उच्चार, रंगमंचावरील वावर व हालचाली, भावभावनांचा नवरसांच्या माध्यमातून आविष्कार, श्वास व आवाजावरील नियंत्रण व समर्पक आवाजाचा वापर करण्यासाठी आवश्यक व्यायाम व स्वरयंत्राच्या कार्यकृती अशा विविध कलाघटकांसह रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, संगीत यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन स्वत: राजेश देशपांडे व त्यांच्या सहाय्यक उमेदीच्या कलाकार वनमाला वेंदे यांनी केले. याशिवाय, लघुनाट्य, लघुपट यांसह नाट्यसंहिता, मालिका व चित्रपट लिखाणाची तत्वे समजावत, दिग्दर्शनाच्या विविध पैलूंची माहिती सप्रयोग देण्यात आली. लघुपटासाठी चित्रदर्शीचा (कॅमेऱ्याचा) वापर व विविध दृश्यांचे चलचित्रण करून दाखवण्यात आले. सर्वात महत्वाचे म्हणजे या प्रशिक्षणाच्या अत्यल्प काळातही विशिष्ट कथाबीजांचा कलाकृतीत विकास करण्याचा वस्तुपाठ देण्यात आला.

समारोपात प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणाचा वापर करून चार लघुनाटिका अल्पावधीत विकसित करून प्रत्यक्ष सादर केल्या व उपस्थित मान्यवरांची मने जिंकून चकित केले. समारोपाचे अध्यक्ष गझलकार व कालिदासाच्या ‘मेघदूत’चे नाट्यरुपांतर करणारे साहित्यिक अजय पांडे यांनी संस्कृती संवर्धन व सामाजिक सलोखा यासाठी नाट्यमाध्यमाचे महत्व विशद करून नाट्यसंस्कृतीच्या योगदानावर भाष्य केले. प्रमुख पाहुणे ‘नाट्यस्पंदन प्रतिष्ठान’चे सचिव डॉ. मुकुंद भिसे यांनी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व यापुढील कार्यशाळा अधिक सहभागसंख्येने होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. राजेश देशपांडे यांनी लातूरकरांच्या उत्साहाबद्दल आनंद व्यक्त केला व ‘सृजन दि क्रिएशन’च्या नाट्य व अनुषंगिक उपक्रमात लातुरातील कलावंतांना समाविष्ट करून संयुक्त उपक्रमांच्या आयोजनाचे आवाहन केले. यावेळी राजेश देशपांडे यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी शहरातील मान्यवर सिनेनाट्य कलावंत अनिल कांबळे, शिरीष पोफळे, श्रुतिकांत ठाकूर, रोहित कुलकर्णी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नवाब जमादार, डॉ. बसवराज नागोबा, शिरीष कुलकर्णी, डॉ. अमित उटीकर, पत्रकार अनिल पुरी, प्रा. नंदकिशोर कुलकर्णी, विजयकुमार वर्मा आदी उपस्थित होते.

प्रशिक्षणात डॉ. अशोक आरदवाड, डॉ.ऋजुता अयाचित, डॉ. वर्षा पाटील, डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ. विनया बनशेळकीकर, शुभदा रेड्डी, मृणाल कुलकर्णी, सुवर्णा बुरांडे, रवी आघाव या ज्येष्ठ रंगकर्मींसह राही पवार, स्वरा उटीकर, वरदा बनशेळकीकर, विश्वास पाटील (औसा), डॉ. संदीप सहाने, अर्जुन पाटील, गौरी जावळीकर, वैष्णवी वांगे (पानगाव), भावना गोजमगुंडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वांनी नवपरिचित कलावंतांसह सामूहिक सांघिक कला सादर केल्या व प्रत्यक्ष राजेश देशपांडे यांच्या सहवासात राहून मार्गदर्शन घेताना आलेल्या अनुभवांबद्दल हृद्य मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया नोंदवल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम भांगे यांनी व आभारप्रदर्शन प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. संतोष कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. मनोहर कबाडे, अविनाश कुलकर्णी (उदगीर), संजय अयाचित, सौ. वृषाली कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. दोन दिवस लातुरात असूनही नाट्यविश्वाच्या अद्भुत नगरीत रममाण झालेल्या ज्येष्ठ आणि उमेदीच्या प्रशिक्षणार्थी भावी कलाकारांनी शेवटी सद्गदित मनाने ‘सृजन दि क्रिएशन’च्या ‘फार फार तर काय होईल, सुपरहिट होईल’ या अफलातून प्रेरक व आत्मविश्वासवर्धक अशा उद्घोषाने कार्यशाळेची सांगता केली.
अशा कार्यशाळा दरवर्षी व सातत्याने आयोजित केल्या जातील, मात्र लातूर व परिसरातील विशेषत: तरुण कलावंतांनी त्याला प्रतिसाद द्यायला हवा, असे मनोगत प्रतिष्ठानतर्फे व्यक्त करण्यात आले.
