महाराष्ट्राचा ‘दादा’ हरपला: अजित पवार यांच्या निधनाने राज्य शोकाकुल; संजय बनसोडे, बाबासाहेब पाटील आणि विक्रम काळे यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
लातूर/प्रतिनिधी:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. प्रशासनावरील पकड आणि अफाट लोकसंग्रह असलेला एक करारी नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या दुःखद प्रसंगी माजी मंत्री संजय बनसोडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि आमदार विक्रम काळे यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली.
‘शेतकरी पुत्राला संधी देणारा नेता गमावला’ – संजय बनसोडे

माजी मंत्री संजय बनसोडे यांनी अत्यंत भावूक होत आपल्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “माझ्यासारख्या एका सामान्य शेतकरी पुत्राला मंत्रिपदाची संधी देऊन अजितदादांनी आपले मोठेपण आणि दानत दाखवून दिली होती. त्यांच्या जाण्याने केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. आम्हाला सर्वांनाच वाटत होते की, एक दिवस अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करतील; मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते.” अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.

‘माझे दादा गेले…’ – बाबासाहेब पाटील यांना अश्रू अनावर
अजितदादांचे खंबीर सहकारी आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना आपल्या नेत्याच्या निधनाची बातमी समजताच अश्रू अनावर झाले. “माझे दादा गेले…” असे म्हणत त्यांनी टाहो फोडला. दादांशी असलेले त्यांचे ऋणानुबंध अत्यंत जवळचे होते, त्यामुळे या धक्क्यातून सावरणे त्यांना कठीण जात होते.विक्रम काळे झाले भावूकआमदार विक्रम काळे यांना देखील आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आलेले अनुभव सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांनी शांतपणे आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत श्रद्धांजली वाहिली.अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. ठिकठिकाणी त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते शोक व्यक्त करत आहेत.




