पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास प्रत्येकांसाठी प्रेरणादायी-अजित पाटील कव्हेकर
लातूर/प्रतिनिधीः- गुजरामधील वडनगर सारख्या छोट्याशा गावातून आपल्या जीवनप्रवासाची सुरुवात करणारे नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी कठोर परिश्रम, ध्येयवेडेपणा आणि प्रामाणिकतेच्या बळावर देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहचविला आहे. पंतप्रधान मोदी यांचा जीवनप्रवास म्हणजे अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते हे दाखवून देणारा असून देशासाठी आणि समाजासाठी सततचा विचार करणारे पंतप्रधान मोदी यांचा हा जीवनप्रवास देशातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे मत भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केले.

लातूर येथील पिव्हीआर सिनेमागृहात दि. 18 सप्टेंबर पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील माहितीपट मोफत दाखविण्यात येत आहे. या माहितीपटाच्या शुभारंभाच्या प्रसंगी अजित पाटील कव्हेकर बोलत होते. यावेळी सेवा पंधरवाडा अभियानाचे संयोजक अमोल गिते, सहसंयोजक संजय गिर, रविशंकर लवटे, महिला मोर्चा अध्यक्षा रागिणी यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरात मधील वडनगर सारख्या एका छोट्याशा गावात झाला असल्याचे सांगून अजित पाटील कव्हेकर म्हणाले की, मोदी यांना लहानपणापासूनच शिस्त आणि स्वाभिमान याची जाणीव होती. विशेष म्हणजे एका चहाविक्रेत्याचा मुलगा असुन सुद्धा त्यांनी अतिशय मोठा विचार करत आपण समाज आणि देशासाठी कांहीतरी देणे लागतो याची जाणीव ठेवत आपला जीवनप्रवास सुरु ठेवला होता. दुसर्यासाठी जगणे हा विचार डोळ्यासमोर ठेऊन राज्य आणि देशाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. लहापणापासूनच समाजसेवेचे व्रत अंगीकरुन त्यांनी अनेकांसाठी त्यावेळीही मदतीचा हात पुढे केला असल्याचे या माहितीपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर आले असल्याचे कव्हेकर म्हणाले.

ध्येयवेडेपणा आणि परिश्रम करुन त्याला प्रामाणिकतेची जोड दिल्यानंतर अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते हे त्याना ज्ञात असल्यानेच त्यांनी गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रीपदासह देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत झेप घेतली असल्याचे अजित पाटील कव्हेकर यांनी सांगितले. सत्ता हे सेवेचे साधान आहे ही संकल्पना प्रत्यक्षात राबवून आज देशाची प्रतिमा अंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविण्याचे कामही त्यांच्या माध्यमातून झालेले आहे. त्यांच्या या जीवनप्रवासातील अनेक चढउतार आणि खडतर प्रंसग या माहितीपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेले असून त्यांचा हा जीवनप्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांची समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि देशप्रेम हे गुण आपण सर्वांनी अंगीकारावे असे आवाहन अजित पाटील कव्हेकर यांनी यावेळी केले.

पिव्हीआर सिनेमागृहात दाखविण्यात येणारा हा माहितीपट दि. 24 सप्टेंबर पर्यंत लातूरकरांसाठी मोफत उपलब्ध राहणार असून लातूर शहरासह परिसरातील नागरीक, विद्यार्थी यांनी याचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. माहितीपटाच्या सुरुवातीला भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मंडल अध्यक्ष सुरेश जाधव यांनी केले. सदर माहितीपट पाहण्यासाठी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरीक व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन मोठी गर्दी केली होती.



 


