लातूर/प्रतिनिधी शंकरराव मोरगे व परिवाराच्यावतीने शुक्रवार दि.१ जुलै रोजी पानचिंचोली येथील मोरगे फार्म येथे शिवलिंग व वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची यांच्या मूर्तीची स्थापना व कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे. गुरुवार दि.३०जून व शुक्रवार दि.१ जुलै असे दोन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.श्री श्री श्री १००८ जगद्गुरु प्रसन्न रेणुक डॉ.वीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामी,रंभापुरी पीठ यांच्या हस्ते मूर्ती स्थापना होणार आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता एक दिवसीय ग्रंथराज परमरहस्य अखंड पारायणास सुरुवात होणार आहे.सायंकाळी ५ वाजता जगद्गुरुंचे आगमन व स्वागताचा कार्यक्रम होणार आहे.सायंकाळी ७:३०वाजता राजाभाऊ वाघमारे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

शुक्रवार दि.१ जुलै रोजी सकाळी ६ वाजता जगद्गुरु प्रसन्न रेणुक डॉ.वीर सोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांची मूर्ती व शिवलिंगाची स्थापना होणार आहे.सकाळी ११ वाजता कलशारोहण व ११:३० वाजता धर्मसभा होणार आहे. या कार्यक्रमास सद्गुरु सोमलिंग शिवाचार्य महाराज, बिचकुंदा,सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरा,शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर,करबसव शिवाचार्य महाराज वसमत,शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपाळ, डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड,दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत,महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरी,काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरी, विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मानूर,शिवलिंग शिवाचार्य महाराज टाकळी,गहिनीनाथ महाराज औसेकर,राजूर येथील वीर मठाचे उत्तराधिकारी राजशेखर स्वामी,हडोळती येथील बुद्धीस्वामी मठाचे उत्तराधिकारी अभिषेक स्वामी,तळेगावचे बालयोगी भगवान महाराज आदी गुरुवर्य व मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सद्गुरू शिवलिंग धाम,मोरगे फार्म,पानचिंचोली येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शंकरराव मोरगे व परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.