अरुंद रस्ते…
युधिष्ठिराला यक्षाने जे प्रश्न विचारले होते त्यातला एक प्रश्न म्हणजे, ‘वाऱ्यापेक्षाही चंचल काय आहे?’ युधिष्ठिराने त्यावर उत्तर दिलं होतं की, ‘वाऱ्यापेक्षा चंचल मन आहे.’ खरंय, मन हे चंचल असतं, मनाचा, विचारांचा वेग प्रचंड असतो, त्यांच्या धावण्याला दिशांचं, स्थळ-काळाचंही बंधन नसतं. आपणास पावलोपावली याचा अनुभव येतो.
अमेरिकन तत्ववेत्ता, लेखक, फ्रेडरिक जेमेसन म्हणतो की, ‘आजकाल आपण भूतकाळाशी असलेली नाळंच तोडून टाकलेली आहे, आपण आता भूतकाळापेक्षा, वर्तमानातच अधिक रमतो, जगतो. अवकाशानं, विचारांच्या कक्षेनं, काळावर मात केलेली आहे.’ पण मला मात्र तसं वाटत नाही. कारण काही अंशी हे जरी खरं असलं तरी; जेव्हा केव्हा मनाचा बंध सैल होतो, तेव्हा मन भूतकाळात मागे मागे धावायला लागतं. भूतकाळातल्या रम्य आठवणीत आपण रमतो. बऱ्याच वेळा गतकाळातील हरवलेल्या क्षणांच्या विचारात हरवून जातो, एक वेगळीच भावविवशता अनुभवतो.

आज बऱ्याच दिवसांनी मी गावी गेलो होतो. होय माझ्या जन्मगावी… जिथे मी खेळलो, वाढलो, घडलो त्याच गावी… त्याच गल्या, तेच रस्ते, तीच घरं, झाडं पहात गावातून फेरफटका मारताना मनाचा बंध सैल होत होता. माझ्या चालण्याच्या वेगापेक्षाही कितीतरी पटीने माझं मन भूतकाळात गेलं आणि माझं बालपण… या गावातलं माझं बालपण मला आठवायला लागलं.
काळानुरूप याही गावात बरेच बदल झालेले आहेत. काही प्रमाणात शहरीकरणाचा वारा आमच्याही गावाला लागलेला. बैलगाडी, लाकडी नांगर जाऊन शेतात ट्रॅक्टर्स, लोखंडी नांगर आले आहेत. विहिरीवरची मोट जाऊन विजेवर चालणारे पंप आले आहेत. विहिरींसोबतच बोअरवेल खोदले गेले आहेत. ज्वारी, बाजरीच्या पिकांऐवजी, आता सोयाबीन, भाजीपाला अशा नगदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे.घरात पाण्यासाठी आडांऐवजी नळ आलेले आहेत. प्रत्येक घरात रेडिओ ऐवजी टीव्ही, स्वयंपाकासाठी चुली ऐवजी गॅस कनेक्शन्स असेही बदल दिसून येत आहेत. पूर्वी गावात जिल्हा परिषदेची एकच शाळा होती. आता या शाळेसोबतंच आणखीन दोन शिक्षण संस्था उभ्या आहेत. कदाचित गावात राहणाऱ्या व्यक्तीस सभोवताली होत असलेले हे बदल तितकेसे जाणवत नसले, तरी खूप दिवसानंतर गावात येणाऱ्यांना मात्र ते जाणवतात. माझ्याही बाबतीत असंच काहीसं होत आहे.

गाव सोडून आता जवळजवळ २५ पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. नोकरीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागलं, कामाच्या व्यापात गावाकडे जाणं येणं कमी होत गेलं. त्यात गावाकडच्या आमच्या घरी कोणीच रहात नसल्यामुळे तसाही गावात नेहमी जाण्याचा प्रश्न उरलेला नाही.
आजकाल गावात गेल्यावर वरील बदलांसोबतंच काही गोष्टी मात्र मला प्रकर्षाने जाणवतात. लहानपणी घरासमोरील गल्ली, रस्ते हे आमच्या हक्काचे खेळण्याचे ठिकाण. तिथे दिवस दिवस विटीदांडू, भोवरे, लगोरी, गोट्या, उन्हाळ्यात अंब्याच्या कोया, लपंडाव हे खेळ चालायचे. त्याच गल्ल्यांमध्ये भाड्याने घेतलेल्या सायकलवर आमच्या फेऱ्या सुरू असायच्या. कुणाच्याही पायऱ्यांवर, ओट्यांवर गप्पागोष्टी करताना वेळेचं भान नसायचं. थंडीत दारासमोर शेकोटी पेटवून मित्रांसोबत गप्पा चालायच्या, नंतर होळीही तिथेच पेटायची, टिपऱ्यांचा खेळही तिथेच रंगायचा. डोळे, मेंदू आणि अंतरंगात तो सभोवताल, त्या छोट्या छोट्या गोष्टी, त्या स्थळाचा नकाशा हे सगळं पक्कं बसलेलं आहे.
आज मात्र त्याच माझ्या गावात मी जेव्हा जातो तेव्हा, तेच रस्ते, त्याच गल्ल्या मला अगदी अरुंद वाटायला लागतात. जागोजागी लपायच्या लपंडावातल्या जागाही दिसत नाहीत किंवा दिसल्या तरी त्या अपुऱ्या वाटायला लागतात. गल्लीतले खोल असलेले रस्ते आता त्यावर भर टाकली गेल्यामुळे वर आलेले आहेत, त्यामुळे घरांसमोरील दोन तीन पायऱ्या बुजल्या गेल्या आहेत, बसायचे ओटे, पार रस्ता रुंदीकरणासाठी काढले गेले आहेत. रस्त्यांचे रुंदीकरण करूनही तेच बालपणीचे रस्ते मात्र डोळ्यांना अरुंद वाटायला लागतात. हाच गाव, ह्याच गल्ल्या सगळं सगळं आता डोळ्यांना छोटं वाटायला लागतं.
याचबरोबर आणखीही काहीतरी बदललंय, हरवलंय अशी जाणीव होत राहते. गल्लीतल्या राम मंदिरात दिवसभर मुलांच्या खेळण्याचा गोंगाट आता कानावर पडत नाही. मंदिरात असलेल्या राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत यांना आमच्या आवाजाची, खेळण्याची, भांडणाची सवय झाली होती, पण आज तेच मंदिर मुलांविना शांत शांत आहे. मंदिरातल्या देवांनाही आता एकटं एकटं वाटतं असावं.
हे सगळं पाहताना, आपणंच आपल्या गावात परके वाटू लागतो. हे असं का वाटतं कळत नाही. खूप दिवसांनी गावात आलो म्हणून असं वाटत असेल का? की आपण आता मोठे झालो, शरीराने वाढलो म्हणून हे असं वाटत असेल? शरीरासोबत मनाची विचारांची, इतर बाह्य अनुभवांची वाढ त्यास कारणीभूत आहे काय? मोठ्या शहरांमध्ये राहिल्यामुळे आपले डोळे आणि मेंदूच्या कक्षा बदलल्या आहेत काय? का नियमित होणारी पायपीट, सायकलचा सराव जाऊन आता गाड्यांमधून प्रवास होतोय, सभोवताली वाहनं, रहदारी कितीतरी पटीने वाढलेली आहे याचा हा परिणाम असावा का? असे कितीतरी प्रश्न मनात उपस्थित होतात

नुकताच पाऊस पडून गेला होता. सगळीकडे पाणीच पाणी साचलं होतं. झाडांची पानं पावसात न्हाऊन तजेलदार झाली होती. पक्षी घरट्यातून बाहेर पडून पंख फडफडत, पंखांवरचं पाणी झटकायचा प्रयत्न करत होते. सगळीकडे वातावरण उल्हासित पण तितकंच कुंद वाटत होतं. सूर्य मावळतीकडे कलला होता…
सगळीकडे शांतता… आजूबाजूला कोणतेही आवाज ऐकू येत नव्हते. वाटेवर पाणी साचल्यामुळे चालताना पायाचा ‘पचक पचक’ असा आवाज तेवढा येत होता…. पायात स्लीपर घातलेल्या, चालताना टाच वर उचलली जायची आणि टाचेकडचा स्लीपरचा भाग आणि टाच यांमध्ये पाणी शिरून ‘पचक पचक’ असा आवाज येत होता. खूप दिवसानंतर गावाकडे आलो होतो. लेदरचे शूज पाण्यातून, चिखलातून चालताना खराब होतील म्हणून काढून ठेवले होते आणि पायात स्लीपर घातली होती. लहानपणी पाण्यातून उड्या मारत, मुद्दाम वेगवेगळे आवाज करत चालताना, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवताना किती मजा वाटायची. आज मात्र त्याच माझ्या गावातून अंग चोरून, पाण्यातून चालताना; पायातील स्लीपरमुळे होणारा ‘पचक, पचक’ असा आवाज कानाला आणि मनाला का खटकतोय?…
ज्या गावात माझं बालपण सुरम्य झालं होतं, त्याच गावातून आज मी चालतोय. चालताना महादेवाच्या मंदिरातलती घंटा कानावर आली. गावाच्या उत्तरेला जुन्या हेमाडपंथी शिवालयाचा जीर्णोद्धार होऊन मंदिराचं नवीन बांधकाम झालेलं. मंदिरासमोर दगडी बांधकाम असलेलं पाण्याचं तीर्थ (कुंड), नवीन बांधकामात मात्र जमिनीखाली गाडलं गेलंय. आता केवळ २’×२’ च्या जाळीतून खाली वाकून झाकलेलं तीर्थ पहायचं आणि तीर्थातलं पाणी किती खोलवर गेलंय हे शोधायचं. पूर्वी बारा महिने या तीर्थातलं पाणी आटत नसे. त्या तीर्थातील पाण्याने हातपाय धुवून आम्ही देवदर्शनासाठी मंदिरात जात असू. याच तीर्थात कधीकाळी सगळी मुलं पोहत असंत. आता हे सगळंच बंदिस्त झालंय. हातपाय धुण्यासाठी आता तिथे नळ बसवले आहेत.
मंदिराच्या बाजूने एक छोटी नदी वाहायची. वर्षातले जवळजवळ ६-७ महिने या नदीचं वाहतं स्वच्छ पाणी आज मात्र पावसाळ्यात काही दिवसांतच लुप्त होतं.
नुकताच पाऊस पडल्यामुळे आज नदीला पाणी आलं होतं. काही काळासाठी का होईना, आज माझ्या बालस्मृतीतली तीच नदी खळाळत, मला दर्शन देत होती. कदाचित… इतक्या वर्षांनी… मला पहायची तिलाही तितकीच ओढ असावी…

– व्यंकटेश कुलकर्णी- हैदराबाद











