*लातूर जिल्ह्याची ऐतिहासिक सफर*

0
388

लातूर जिल्ह्यातील प्राचीन गुरुकुल….!!

लातूर जिल्ह्याची ऐतिहासिक सफर

(भाग – 4)

 

लातूर जिल्हा म्हणजे बालाघाट डोंगर रांगा संपतात तिथून सुरु झालेला सपाट प्रदेश… मांजरसोंब्याच्या डोंगरातून उगम पावलेली मांजरा आणि तेर मधून उगम पावलेल्या तेरणा नदीच्या काठानी नांदणारा जिल्हा…पक्या टणक बेसाल्टवर बसलेला त्यामुळे फारसे पोटात पाणी न नांदताही काळ्याशार सुपीक जमिनी पण आकाशाकडं बघत खरीप काढणारा आणि थंडीच्या भरोशावर रब्बी पिकवणारा पट्टा म्हणून प्राचीन ओळख….प्राचीन काळापासून राजकीय आणि गुरुकुलाचा इतिहास बाळगुण असलेला प्रदेश… तुम्ही म्हणाल कसे, तर प्राचीन इतिहासाच्या पोटातील पान सांगतात…रट्टाचे लातूर राष्ट्रकूट काळात लत्तलूरपूरवराधीश्वर बिरुद मिरवणारा गोविंदराज यांचा मुलगा राष्ट्रकुट अमोघवर्ष याचे झाले… अर्ध्या भारत वर्षात राष्ट्रकुटाचा ध्वज फडकत असताना तो स्वतः ला लातूरकर ( अर्थात लत्तलूरपूरवराधीश्वर) म्हणून घेत होता… राष्ट्रकूट घराण्याच्या तिसऱ्या गोविंदराजाने ही भूमी जशी राजकीय ठेवली तसे इथे विद्यादान करणारे मोठे गुरुकुल असावे म्हणून त्यांनी झरिका म्हणजेच आजच्या नऊकुंड-झरी आणि शिरसी – लोहारा येथे गुरुकुलासाठी धाराशिव निवासी ऋष्यप्पभट यांना मोठ्या जमिनीसह ग्रामदान दिल्याचे  चार विविध ताम्रपटात उल्लेख असल्याचा संदर्भ ” स्टडीज इन हिस्टॉरिकल अँड कल्चरल जिऑग्राफी ऑफ मराठवाडा ” आढळून येतो.

अगोदरचे प्रशासकीय भाग ” विषय ” म्हणून ओळखले जात होते… झरिका म्हणजे झरी ही पौना  विषयातील ग्राम होते… पौना म्हणजे राजूर आजचे अहमदपूर असल्याचा अंदाजही यात वर्तविला आहे.  आजच्या लातूर जिल्ह्याचा उत्तर आणि ईशान्य भाग पौना विषयात मोडत होता. तर सिरशी लोहारा हे ग्रामदाने मुरूम्ब विषयातले असल्याचे उल्लेख आहेत. यावरून लातूर जिल्ह्याचा नैऋत्य भाग हा मुरूम्ब विषयातला असल्याचे मयूरखंडी येथे सापडलेल्या ताम्रपटातून होतो. चाकूर तालुक्यातील नवकुंड झरी ला असलेले प्राचीन महत्व लक्षात घेऊन ज्या वेळी भेट दिली.. त्यावेळी अनेक गोष्टी लक्षात आल्या… पण गावातल्या लोकांशी विचारपूस केल्यास गुरुकुलाच्या बाबतीत फारशी माहिती नसल्याचे लक्षात आले… अर्वाचीन इतिहासात किंवा धार्मिक पर्यटनात याचा कोणताही उल्लेख नाही. झरीतील मंदिरातील कुंडाचे अस्तित्व आजही आहे… आणि गावाला असलेल्या विस्तीर्ण वट वृक्ष त्याची साक्ष देऊन आजही उभा आहे… झरी गावाच्या दक्षिणेला असलेला डोंगर इथल्या मुबलक पाण्याचे स्रोत आहे.. मी ऑक्टोबर मध्ये गेलो होतो त्यावेळी मोटार न लावता एका बोर मधून पाणी येत होते… हा मुबलक पाण्याचा स्रोत हेच ऋष्यप्पभट यांच्या गुरुकुल काढण्याच्या मुळाशी असावे… आजचे हे धार्मिक पावन क्षेत्र एकेकाळी विद्यादानाचे पवित्र ठिकाण होते… हे कळल्यापासून  लातूर जिल्ह्याच्या सांस्कृतीक, राजकीय आणि शैक्षणिक क्रांतीचे मूळ सापडल्याचा आनंद खूप मोठा आहे.

लातूरच्या महारट्ट कुळातील कान्हरदेव आणि सौंदतीच्या रट्टाचे गाव लातूरच होते. सहाव्या विक्रमादित्याचा महासामंत राणक धाडिदेव आणि दण्डनायक वासुदेव हे दोन्ही लातूरचे होते. एवढेच नाही तर लातूरच्या रट्ट प्रमुखांनी आंध्र प्रदेशातील कुल्पक आणि ओरिसातील संभलपूर येथे राज्य संपादन केल्याचाही उल्लेख आहे… कदाचित ही राजकीय दृष्टी या गुरुकुलामुळे पण असू शकते… तसे संदर्भकुठे सापडत नाहीत पण देशभरातील विविध शासकांकडे लातूरचे ज्ञानी लोक होते म्हणजे आजच्या संदर्भात म्हणायचे झाले तर लातूर पॅटर्नचे प्राचीन जनक नव नऊकुंड झरीत… ही अतिशयोक्ती होईल पण इतिहासाच्या पानात असलेलं हे वैभव मिरविण्याचे स्वातंत्र्य घेऊ या… लातूर जिल्ह्यात बघायला काय आहे म्हणतो तेंव्हा असे वैभवी स्थळ दाखविण्याच्या जागा आहेत.. पर्यटन वाढीच्या आणि जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारा हा प्राचीन इतिहास म्हणून लिहता झालो… या जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून अशी स्थळें पाहताना ऊर भरून येतो…!!

युवराज पाटील

     जिल्हा माहिती अधिकारी,

            लातूर

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here