व्यक्ती विशेष

0
370

पूनम काबरा

गोरीपान, मध्यम उंचीची डोळ्यावर मोठ्या फ्रेमचा चष्मा, कुरळे बॉबकट केलेले केस कसेबसे विंचरलेले , डोक्यात असंख्य विचार, चेह-यावर स्मित हास्य अशी मी पाहिलेली पूनम ४५ वर्षापूर्वीची आजही मला लख्ख आठवते आहे. स्वातन्त्र्यसैनिक आणि कामगार नेते वडील विजयेंद्र काबरा आणि शिक्षण क्षेत्रात धडाडीने काम करणा-या राजकुंवर काबरांची हि चौथी कन्या. आईवडिलांच्या प्रसिद्धीची हिला जराही जाणीव किंवां गर्व नाही. तसे त्यांच्या घरी साधे राहण्याचे संस्कार होते. मारवाडी कुटुंबातील असून पाचही मुलीना उच्च शिक्षण देणा-या या कुटुंबांविषयी मला फार आदर वाटायचा. दोन मुली डॉक्टर, दोन इंजिनियर आणि एक आर्कीटेक्ट.

शाळेत असताना पूनम खूप अभ्यासू होती. तिला इंजिनियर व्हायचे होते. बारावीला चांगले मार्क मिळाल्यावर ती औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकायला गेली. पुढे तिला इलेक्ट्रोनिक्स हा विषय शिकायचा होता. औरंगाबादला हा विषय नव्हता. हा विषय पुण्याच्या सरकारी महाविद्यालयात होता. मी ही गोष्ट सांगते १९७६ सालची. त्यावेळी महाराष्ट्रात फक्त ६ अभियांत्रिकी महाविद्यालये होती. पूनम पुण्यात आली आणि महेश्वरी मुलींच्या वसतिगृहात राहू लागली. औरंगाबादला सर्व शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालेले असल्याने तिला ब-याचा अडचणी येऊ लागल्या. औरंगाबादला दोनतीन मैत्रिणी मिळून अभ्यास करायच्या. इथे तशा मैत्रिणीही मिळाल्या नाहीत. वस्तीगृहातील अडचणी आणि खरे तर मराठवाडा आणि पुणे यातील सांस्कृतिक फरक याचा तिला बराच त्रास झाला. त्यात कॉलेजमध्येही ग्रुप नसल्याने आलेल्या अडचणी कुणाला विचारायच्या हा प्रश्न होताच. त्याचा परिणाम म्हणून ती दोन विषयात नापास झाली. घरी गेल्यावर तिने सांगितले की मला पुण्याला शिकणे अवघड वाटते तेंव्हा तिची आई म्हणाली पुण्याला जाण्याचा निर्णय तुझा होता त्यामुळे तो तुला निभावावा लागेल. ती म्हणाली यावर्षी पुन्हा जर मी काही विषयात नापास झाले तर मात्र परत येईन. दुर्दैवाने ती परत नापास झाली. आईने घरचे दरवाजे बंद केले होते. वडिलांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला पण तत्ववादी आई म्हणाली अशा अडचणीवर मात करून तुला पुढे जाता आलेच पाहिजे. पुण्यात राहण्या शिवाय तिच्याकडे काही पर्याय नव्हता.

नाईलाजाने पूनम पुण्यात परत आली. मग मात्र घट्ट पाय रोवून ती वसतीगृहात सर्वांची आवडती झाली. कॉलेजमध्ये तिच्यापेक्षा पुढच्या वर्गात असलेल्या राकेश मेहताशी तिची ओळख झाली. अत्यंत बुद्धिमान असलेल्या राकेशने तिला शिकवले त्याच दरम्यान ती त्याच्या प्रेमात पडली आणि त्यांचे लग्न झाले. पूनमच्या घरचे लोक प्रगतीशील विचारांचे असल्याने त्यांनी पाठींबा दिला. मात्र राकेशच्या घरच्यांनी विरोध केला. दोन खोल्यांच्या छोट्या घरात तिने संसार सुरु केला. ती नोकरी करू लागली. राकेशने स्वत:चा व्यवसाय सुरु केला. मग पूनमनेही नोकरी सोडून व्यवसायात त्याला मदत करणे सुरु केले. टेलिफोन यंत्रातील दोष शोधणारे फॉल्ट-फाईंडर नावाचे यंत्र विकसित केले. त्याला भारत भरातून चांगला प्रतिसाद मिळाला. एखादा व्यवसाय चालवणे सोपे नसते. त्यासाठी अनेक विषयातील कौशल्ये लागतात. पूनमने या काळात अकौंटंसी, मॅनेजमेंट, एक्साईज अशा अनेक विषयांचे अभ्यासक्रम पूर्ण करून त्या त्या विषयातील कौशल्य आत्मसात केले. फ्रान्सच्या जगप्रसिद्ध मर्सिडीज-बेनझ कंपनीची कामेही त्यांना मिळाली.

हे सगळे चालू असतानाच तिची सामाजिक कामेही सुरु होती. तिला लहान मुलांना शिकवायला खूप आवडते. तिच्या लहान मुलीबरोबर अजून एकदोन मुलांचा अभ्यास ती घेत असे. त्यात मेघालयातून आलेला एक मुलगा होता. मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिने मेघालयातून आलेल्या काही मुलांना बोलावले. ती मुले त्यांचा डबा घेऊन आली. पूनमने बघितले त्या डब्यात शिळ्या भाकरी होत्या. तिला फार वाईट वाटले. ती तो डबा घेऊन वस्तीगृहाच्या चालकाकडे गेली आणि म्हणाली, मेघालयातून तुम्ही एवढी छोटी मुले इथे शिकायला आणता आणि त्यांना असे शिळेपाके खायला देता. त्यावर ते चालक म्हणाले आम्हाला इतकेच शक्य आहे. बराच वादविवाद झाला त्यावर ते गृहस्थ म्हणाले, तुम्हाला इतकी काळजी वाटते तर तुम्हीच चालवा हे वस्तीगृह.

पुढे हे वसतिगृह चालवायची जबाबदारी या सध्या मुलीने उचलली. मुलींसाठी वेगळी वसतिगृहेही काढण्यात आली. पुण्याबरोबरच औरंगाबाद परभणी जालना अशा अनेक ठिकाणी वस्तीगृहे निघाली. त्याची सर्व जबाबदारी पुनमने पेलली. त्यातील अनेक मुले मोठमोठ्या पदांवर नोकरीस आहेत. ही सर्व वसतिगृहे संघाने चालवली होती. मेहता कुटुंबीय संघनिष्ठ होते. पूनमच्या माहेरचे लोक स्वातंत्र्यचळवळीतून आलेले असल्याने कोंग्रेसी विचाराचे होते. पूनमने शांतपणे या दोन्ही विचारसरणी पचवून आपली समजासेवा सुरु ठेवली.

तिला शिकवायला खूप आवडायचे हे तिच्या मोठ्या दिराला माहित होते. त्यांनी एकदा तिला सांगितले की त्यांच्या बँक मॅनेजरचा मुलगा थोडा लाडवला आहे. अभ्यास करत नाही. तू त्याचा अभ्यास घेशील का? त्यावेळी तो मुलगा सहाव्या इयत्तेत होता. पूनम त्याला भेटली. थोडी बातचीत झाली त्या मुलाच्या वडिलांनी पूनमला विचारले की तो सहावी पास होईल का? त्यावर ती म्हणाली मुलगा हुशार आहे तो सहावीला पास होईल की नाही ते माहित नाही पण तो खूप पुढे जाईल आणि आयुष्यात मोठा होईल हे नक्की! अभ्यास न करणारा, खोडकर, व्रात्य मुलगा आज आय.आय.टी.मध्ये प्रोफेसर आहे.

तिची मुळशीला एक छोटी शाळा आहे. मुलींसाठीचे एक वस्तीगृह आहे. एकदा ती तिथल्या काही तक्रारी असल्याने बघायला गेली. तिथल्या व्यवस्थापकाला काढून टाकले. नवीन मिळेपर्यंत एखादा आठवडा तिथेच रहायचे ठरवले आणि अचानक कोविडमुळे टाळेबंदी लागली आणि ती तिथे ४ महिने अडकून पडली. शेतात काही फारशा सोई नसलेल्या जागेत तिला रहावे लागले पण ती खूप आनंदात राहिली. झाडे लावली. नदीवर जावून कपडे धुतले. मुलीना शिकवले आणि नवा अनुभव घेऊन परतली.

आयुष्यात तिला अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला पण तिने धीराने सर्व प्रसंगांना तोंड दिले हार मानली नाही आणि आपले काम सुरु ठेवले. आज ती अनेक संस्थांशी संबधित आहे. अनेक मुले तिच्याकडे सकाळी शिकायला येतात. गेल्या तीस वर्षात तिने अनेक मुलांचे पालकत्व स्वीकारले. त्यांच्या सुखदु:खाची करीयरची, सगळी जबाबदारी ती समर्थपणे पेलत असते.

एकदा मी काही कामानिमित पुण्याला गेले होते. माझे काम संपवून रात्री मुंबईला जायचे होते. मी तिला होस्टेलला फोन केला ती मला भेटायला आली. म्हणाली अग सकाळी जा. आपण गप्पा मारुया. आम्ही दोघी पूर्ण रात्रभर गप्पा मारत होतो. सकाळी तिने मला स्टेशनवर सिह्गड एक्स्प्रेस मध्ये बसवले. म्हटले आज तू सुट्टी काढून झोप घे. ती म्हणाली गप्पा मारून मी फ्रेश झाली आहे. आता सरळ कामावर जाईन.

एकदा ती मला मुंबईत भेटली. तिचे मंत्रालयात काही काम होते. उद्योग मंत्र्यांकडे तिची बैठक होती. ती संपल्यावर आम्ही दोघी घरी जाणार होतो. मी तिथे गेले तिची मिटिंग संपली होती. मी म्हटले चल ग जाऊ या का ? ती म्हणाली हो. एवढे कागद देऊन येते. इत्क्यात सचिवानी मला बोलावले आणि म्हटले अहो त्या एवढ्या मोठ्या उद्योगपती मादाम आहेत आणि तुम्ही त्यांना चक्क अरेतुरे करता ? म्हटले अहो ती माझी बालमैत्रीण आहे. म्हणाले अहो फ्रांस च्या डेलीगेट बरोबर त्यांनी आत्ता मोठा करार केला आहे . मी अवाक झाले

गेल्या ४५ वर्षांची आमची मैत्री आहे.. कधी नेहमी बेत होते तर कधी वर्षानुवर्षे भेट होत नाही. पण कधी मैत्रीत अंतराय येत नाही. हि मुलगी कायम नवे काहीतरी करण्याच्या विचारात असते. आता तिला नोकरी करणा-या मुलींसाठी होस्टेल सुरु करायाचें आहे. दिवसभर तिचा धबडगा चालू असतो. कुण्या मुलाचा कॉलेजमध्ये प्रवेश करायचा असतो. कुणाची राहायची सोय करायची असते. कुणाचा वाढदिवस असतो तर कुणासाठी दवाखान्यात भेटायला जायचे असते. ती इतकी सतत कामात असते कि रात्री झोपेतही ती काम करत असावी असे वाटते.इतके सारे असूनही निरागस मनाच्या साध्या मैत्री नीचे मला फार कौतुक वाटते.

लेखन  : ‌श्रद्धा बेलसरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here