पोलिसांनी गाडी आडवली यापासून ते पोलीस खात्यासंदर्भातील कोणताही प्रश्न निर्माण होताच मला पोलीस खात्यातील माझे बालमित्र उदय पाठक आठवायचे. उदय पाठक हे लातूरमध्ये ट्राफिक पोलीस एल.सी.बी.,एस.पी.ऑफीस, ग्रामीण पोलीस स्टेशन, गांधी चौक पोलीस स्टेशन अशा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेला पोलीस खात्यातील आपला माणूस. कोणीही व्यक्ती अडचणीत आली, की फोन करताच ते दहा मिनिटांत हजर होत असत व पुढचे सर्व विषय ते मार्गी लावत.

‘संकटाच्या काळी जो धावून येतो तोच खरा मित्र असतो.’
माझ्या ऑफीसच्या बांधकामास शेजा-यांनी न्यायालयीन स्थगिती (स्टे) घेतली. बांधकाम बंद पाडले. आमचे वकील श्री संजयजी पांडे यांनी सूचना केल्याप्रमाणे मी व उदय पाठक यांनी न्यायालयात शेजा-याला तारखेदिवशी तडजोडीमध्ये अडकवून ठेवले. त्यामुळे शेजा-याची स्थगिती (स्टे) पुढे ठेवण्यासाठी अर्ज करण्याचे राहून गेले व बांधकामावरील स्टे उठला. पुढील चार दिवस न्यायालयाच्या सुट्टीत वकिलांच्या सूचनेप्रमाणे ऑफीसचे दोन मजल्याचे दोन स्लॅबसह बांधकाम चार दिवसांत पूर्ण करायचे ठरले. चाळीस पन्नास लेबरच्या मदतीने मी उदय पाठक सह माझे मित्रांनी तेथे प्रत्यक्ष चार दिवस उभारून दोन मजल्याचे ऑफीस बांधकाम पूर्ण केले. चार दिवसांनी आमचे वकील पांडे साहेबांनी बांधकाम पूर्ण झाले असे न्यायालयासमोर लेखी सादर केले. शेजा-याच्या स्टेची हवाच काढून घेतली.

या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मानसिक बळ देण्याचे काम उदय पाठक यांनी केले.बसमध्ये संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग असतो तसा आम्हाला संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग उदय पाठक आहेत.उदय पाठकचे वडिलांचे पोलीस खात्यात सेवेवर असताना त्यांचे दु:खद निधन झाले. त्यामुळे उदय पाठक यांना अनुकंपाखाली पोलीस शिपाई म्हणून नौकरी लागली. शिपाई ते पोलीस सबइन्स्पेक्टर अशी उदय पाठक यांना पदन्नोती मिळत गेली. पाठक मोकळ्या मनाचा, मित्रात रमणारा, चोवीस तास पोलीस खात्यासाठी राबराब राबणारा, प्रसंगी एखाद्यावर भाळला तर स्वत:च्या अंगावरील कपडेही काढून देणारा, मानवता धर्म पाळणारा, सर्वांना अडचणीत मदतीचा हात पुढे करणारा माणूस.अशा माणसासोबत संसार करणे खूप आवघड असते.अशा माणसा सोबत सौ.सुषमा वहिणींनी यशस्वी संसार करून दाखवला. उदय पाठक यांना सौ.सुषमा वहिनीसारखी सुस्वभावी, सालस, सर्वांना समावून घेणारी, मुलांवर संस्कार करणारी धर्मपत्नी मिळाली हे उदय पाठकचे खरे भाग्य! म्हणतातना पोलिसांची मुले चांगल्या वळणाची निघत नाहीत. परंतु उदय पाठकांची दोनही मुले संस्कारित, निर्व्यसनी, उच्चशिक्षित अभियंता आहेत. यापेक्षा अधिक इश्वराने काय द्यावे.

मानवता धर्मासाठी उदय पाठक ह्या वल्लीला चौकटीच्या बाहेर काम करण्याची प्रेरणा कोठून मिळते हे समजतच नाही.
एका प्रसंगामध्ये परळीच्या एका व्यक्तीचा लातूरमध्ये अपघात झाला. मदतीला कोणीच पुढे होत नव्हते. हे पाठकने पाहिले. ताबडतोब पाठकने त्या व्यक्तीला दवाखाण्यात दाखल केले. तो व्यक्ती दोन ते तीन दिवस शुध्दीवर येईपर्यंत पाठकनी त्या व्यक्तीकडे जातीने लक्ष दिले. शुद्धीवर आल्यावर त्याच्या नातेवाईकाला संपर्क केला. “पाठक साहेबांनी मला जीवनदान दिले” असे उद्गार डोळ्यात अश्रू आणत त्या अपघातग्रस्त व्यक्तीने काढले.
“जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही“ असे म्हणत पाठकला त्यांनी आनंदाने मिठी मारली. पुढे परळीच्या वृतपत्रात ” एक पोलीस को देखा तो ऐसा लगा” या शीर्षकाखाली लेख प्रसिद्ध झाला. त्यात सर्व जग पोलिसांना नावे ठेवतात पण मी असा पोलीस पाहिला जो माझ्या ओळखीचाही नव्हता परंता त्यांनी माझे प्राण वाचवले. असा पोलीस देवदूत मी उदय पाठक च्या खाकी वर्दीत पाहिला. अशा प्रतिक्रिया उदय पाठक यांना चांगल्या कामाच्या प्रेरणा देऊन गेल्या.

दुसरा प्रसंग उदय पाठक रात्री पोलीस पेट्रोलिंगवर होते. रेल्वे रेल फेन्सिगला आडकून स्कुटरस्वार रात्री एकच्या दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पेट्रोलिंग सोबतच्या पोलिसांचा विरोध डावलून उदय पाठक यांनी त्या व्यक्तीला दवाखाण्यात दाखल केले. आठ दिवसानंतर कोमातून बाहेर येई पर्यंत त्याची देखभाल शुश्रुशा केली. व्यक्तीला जीवनदान दिले. ह्या सर्व घटनेवर एका पत्रकाराने पोलीस खात्याचे बोध वाक्य ‘खलद्रक्षणाय खलनिग्रहणाय ” या नावाने उदय पाठकवर लेख लिहिला. पोलिसाची प्रतिमा जनमानसात खूप चांगली आहे असे नाही. पोलीस मानवतावादी कामे करत असतील यावर कोणाचा विश्वास बसत नाही पण उदय पाठक पोलीस यास अपवाद ठरले आहेत. उदय पाठकांच्या रूपाने स्कूटरचालकाला देव भेटले ज्यांनी स्कुटरचालकाचे प्राण वाचवले असे लिहिले. चागल्या लोकांचे वाईट लोकांपासून संरक्षण व खल पुरुषाचा नायनाट हे पोलीस खात्याचे ब्रीद उदय पाठक यांनी प्रत्यक्ष खरे करून दाखवले.असे त्या लेखात नमूद केले होते. अशा आमच्या बालमित्राला सॅल्युट!!
आमचे लंगोटीयार, बालमित्र उदय पाठक यांना पी.एस.आय म्हणून पदोन्नति
मिळाल्याबद्दल त्रिवार अभिनंदन!

अतुल ठोंबरे
अभियंता
atulthombare@yahoo.com
09422071641