वाढदिवस विशेष
संगीत हे केवळ मनोरंजनाचे नव्हे तर ते परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे.भारतीय संगीत हे कलावंताला मोक्ष प्राप्त करून देणारे आहे. संगीत ही साधना आहे, तपश्चर्या आहे, उपासना आहे या भावनेने कलावंताने तिचे महत्त्व जाणले तर त्याची ही आराधना सफल होईल व जीवन सार्थकी लागेल” 2016साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या “स्वराकाश” या पुस्तकाच्या मलपृष्ठावर डॉ कमलाकर परळीकर सरांनी हे लिहिले आहे.
एका अभ्यासू व मनस्वी कलावंताने संगीताबद्दलची आपली धारणा व्यक्त केली आहे. 1953-54 चा कालावधी! हैदराबाद येथे पं.स.भ.देशपांडे मास्तरांकडे गायनाचे धडे घेण्यासाठी ते दाखल झाले. शाळकरी वय! काहीतरी करून दाखवण्याची उर्मी मनी घेऊन त्यांनी पं.स.भ. मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली स्वरांचे धडे घेण्यास सुरुवात केली. मास्तरांनी (पं. स.भ. देशपांडे) दोन-तीन वर्षांपूर्वीच पुण्याहून हैदराबाद येथे येऊन विवेक वर्धिनी संगीत महाविद्यालयाची स्थापना केली होती. निजामशाही संपुष्टात येऊन काही वर्षे उलटून गेली तरी हैदराबादेतील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात फारसा फरक पडला नव्हता. परंतु देशपांडे मास्तरांच्या आगमनानंतर सांस्कृतिक क्षेत्रात एक प्रसन्न व उभारीचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या परिसस्पर्शामुळे गायन शिकण्याची इच्छा असलेले अनेकजण पुनीत झाले त्यातीलच श्री कमलाकर परळीकर हे एक!

मुळातच सुरेल आवाजाची आणि तल्लख बुद्धीची देणगी असल्यामुळे अल्पावधीत हैदराबाद परिसरात उत्तम गायक कलावंत म्हणून ते ख्यातकीर्त झाले. पाहता पाहता विशारदची परीक्षा ही त्यांनी उत्तमरीत्या पार पाडली. काही वर्षानंतर गुरुआज्ञा शिरसावंद्य मानून परभणी येथे संगीत प्रसार व प्रचार कार्यास सुरुवात केली. येथे आल्यानंतर अल्पावधीतच गायक कलावंत व शिक्षक म्हणून श्री परळीकर सरांचा बोलबाला सुरू झाला. रागदारीची उत्तम समज, सुगम उपशास्त्रीय व इतर गीत प्रकारावरीलही पकड लक्षात घेता अल्पावधीतच अनेक शिष्य मंडळी भारतीय संगीत महाविद्यालयाच्या परिवारात दाखल झाली. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे परभणीकरांना सांगीतिक मेजवानीच मिळत गेली. परभणी येथील जुन्या सांस्कृतिक सभागृहामध्ये (आता बहुतेक पाडले आहे) दरवर्षी साजरी होणारी पंडित पलुस्कर व पंडित भातखंडे पुण्यतिथी निमित्त होणाऱ्या संगीत सभांना रसिक मंडळी वेळेपूर्वी उपस्थित असत. दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमाची त्यास जोड असे. मूळचा मृदु स्वभाव,सर्वांना समजून घेण्याची वृत्ती, सुरेल आवाज, प्रगल्भ गायकी व उत्तम अध्यापन कौशल्य यामुळे आज सर्व शिष्य मंडळी स्वतःस कृतकृतार्थ समजतात. गतपाचसहा दशकांपासून अनेक शिष्य मंडळी मराठवाड्यात व महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्यांचा सांगीतिक वारसा पुढे चालवित आहेत. आज मराठवाड्यात एकही गाव नसावे जेथे श्री परळीकर सरांचे गाणे झाले नाही.

परभणी येथे आल्यानंतर पंडित स.भ.देशपांडे मास्तरांच्या आग्रहापोटी संगीत अलंकार व संगीत प्रवीण ची परीक्षा उत्तमरीत्या उत्तीर्ण होऊन आपल्या गायकीचा व अभ्यासाचा ठसा उमटविला. एक कलावंत म्हणून संगीत क्षेत्रात मान्यता असताना संगीत प्रसार व प्रचाराचे कार्य अतिशय नेटाने त्यांनी पुढे चालू ठेवले आहे. संगीत प्रवीण परीक्षेसाठी श्री परळीकर सरांनी “समर्थांचे सांगीतिक चिंतन”या विषयावर प्रबंध सादर केला होता. संगीताबरोबरच अध्यात्माच्या सखोल चिंतनामुळे हा प्रबंध खूपच अभ्यासपूर्ण ठरला. अनेक विद्वज्जनांच्या आग्रहामुळे त्यात अधिक भर घालून त्याच शीर्षकाने एक ग्रंथ प्रकाशित झाला आहे. अनेक नामवंत साहित्यिक, कलावंत व अध्यात्मावर प्रभुत्व असणाऱ्या अनेक अभ्यासकांनी यास नावाजले आहे. माणसे जोडणे हा श्री परळीकर सरांच्या स्थायीभाव आहे त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेकांचे व्यक्तिचित्रण त्यांनी केले आहे. भलेही त्यातील अनेक व्यक्तींना जनमान्यता नसेल परंतु सामान्यातील असामान्यत्व ओळखण्याची खरी पारख श्री परळीकरसरांनी केली आहे. त्यांच्या सहज,ओघवती व कुठेही अतिरंजीतपणा नसलेल्या त्या चित्रणात ती व्यक्ती आपल्या जवळची वाटू लागते.अर्थात या सर्वांमध्ये संगीत हा महत्त्वाचा दुवा आहे. या व्यक्तीचित्रणाची “स्वराकाश” व “स्वरांकित” ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.उत्तम बंदिशकार म्हणूनही श्री परळीकरसरांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी स्वतः निर्माण केलेले राग चित्तमोहिनी, मनकर्णिका व विष्णूकंस यातून त्यांच्या उत्तम सांगीतिक दृष्टिकोन, कलात्मकता व रंजकतेचा सुंदर मिलाफ घडल्याची अनुभूती येते. तसेच अनेक बंदिशींना स्वरबद्ध करून “चित्तमोहिनी” या नावाने तो संग्रह प्रकाशित झाला आहे. उत्तम व्याख्याता म्हणूनही प्रसिद्ध असलेले पंडित सूरमणी कमलाकर परळीकर हे त्यांचे गायन व लिखाणाप्रमाणेच ओघवती व आपली वाटणारी सहज मनाला भिडणारी त्यांची भाषा त्या विषयास जिवंतपणा आणतात. विविध संतांच्या अभंगांना स्वतंत्र व सुमधुर चाली लावून त्यांचे मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी कार्यक्रम केले. या कार्यक्रमास श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

याबरोबरच गीत रामायणाचे सादरीकरण यावरही त्यांचे प्रभुत्व होते. प्रत्यक्ष बाबूजी स्व.सुधीर फडके व पं.प्रभाकर जोग यांचा खूप जवळून संपर्क आल्यामुळे त्यात अधिक जिवंतपणा येत असे. पूर्णवाद तत्त्वज्ञानातून सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे कार्य पूर्णवाद संप्रदाय करीत असतो.पूर्णवादाचे प्रणेते पपू रामचंद्र महाराज पारनेरकर यांना संगीताचा व्यासंग होता पं.परळीकरसरांवर त्यांचा विशेष अनुग्रह होता. पारनेरकर व पूर्णवाद संप्रदायाच्या विशाल कुटुंबात परळीकर कुटुंबीय सामावून गेले आहे.प.पू.विष्णू महाराजांचा ही त्यांच्यावर विशेष लोभ आहे. आदरणीय परळीकर सरांचा ज्येष्ठ शिष्य या नात्याने अनेक संस्मरणीय घटना व कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली यास्तव मी स्वतःच भाग्यवान समजतो. यानिमित्ताने खरे तर आदरणीय सरांबद्दल अत्यंत त्रोटक शब्दात वर्णन केले आहे. वास्तविक पाहता त्यांच्या जीवनकार्यावर एका मोठ्या ग्रंथाचीच निर्मिती होऊ शकते.गुरुवर्य पंडित सूरमणी श्री कमलाकर परळीकर सर आज त्यांच्या वयाची 86 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांना दीर्घायुरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.!शुभम भवतु*

*किरणभावठाणकर*,लातूर
(लेखक हे रागशास्त्राचे अभ्यासक असून श्री कमलाकर परळीकर यांचे ज्येष्ठ शिष्य आहेत.९४२३०४५०७५)




