हैदराबाद मुक्ती लढ्यातील संघर्ष योद्धा राजा हरिश्चंद्र जाधव यांच्या पुतळ्याचे अनावरण
‘संघर्ष योद्धा’ पुस्तिकेचे प्रकाशन; स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास पाठ्यपुस्तकात आणण्यासाठी प्रयत्न करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील
मातृऋण, पितृऋण आणि समाजऋण फेडण्याचा आदर्श पायंडा अॅड. बळवंतराव जाधव यांनी नव्या पिढीसमोर ठेवला
माध्यम वृत्तसेवा | लातूर, दि. १७ :
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, कृषी व सहकार क्षेत्राचे अभ्यासक तथा संघर्ष योद्धा राजा हरिश्चंद्र जाधव यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी दिंडेगाव येथील अॅड. बळवंतराव जाधव यांच्या फार्म हाऊसवर उभारण्यात आलेल्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण गुरुवारी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘संघर्ष योद्धा’ या पुस्तिकेचे प्रकाशन लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, त्र्यंबक नाना भिसे, तुळशीराम कराड, ऋषिकेश कराड, बसवराज पाटील नागराळकर, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, मोहन माने, अॅड. वैभव सूर्यवंशी, अॅड. व्यंकटराव बेंद्रे, जयप्रकाश दगडे, श्रीहरी कांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास पाठ्यपुस्तकात आणण्यासाठी पाठपुरावा
हैदराबाद मुक्तिसंग्रामात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. या संघर्षाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे हैदराबाद मुक्तिलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करून पाठपुरावा करणार असल्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनीही या विषयावर शासनदरबारी आवाज उठविण्याचे आश्वासन दिले. लातूर जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे एकत्रित स्मारक उभारण्यासाठी खासदार निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली. यासाठी एखाद्या संस्था किंवा व्यक्तीने पुढाकार घेतल्यास आवश्यक ती मदत करण्याचे अभिवचनही त्यांनी दिले.

‘राजा हरिश्चंद्र’ ही पदवी समाजाने दिली
अॅड. व्यंकटराव बेंद्रे यांनी आपल्या भाषणात राजा हरिश्चंद्र जाधव यांच्या कार्याचा गौरव केला. ‘राजा हरिश्चंद्र जाधव’ ही पदवी समाजानेच त्यांना बहाल केली, असे सांगताना त्यांनी आर्य समाज चळवळीच्या उभारणीत जाधव यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे नमूद केले. तसेच दलित समाजाच्या उद्धारासाठी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उभारणीसाठी त्यांनी केलेले कार्यही उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, अॅड. वैभव सूर्यवंशी, प्रा. अॅड. बी. व्ही. मोतीपवळे, अॅड. कालिदासराव देशपांडे, जयप्रकाश दगडे, श्रीहरी कांबळे आदींनीही यावेळी मनोगत व्यक्त करून राजा हरिश्चंद्र जाधव यांच्या कार्याला उजाळा दिला.
मातृऋण, पितृऋण आणि समाजऋण फेडण्याचा आदर्श

कार्यक्रमाच्या प्रारंभी अॅड. बळवंतराव जाधव, अॅड. आकाश जाधव, अॅड. दैविक जाधव, अंकुश जाधव व जाधव परिवारातील सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पहार, शाल व पुस्तक भेट देऊन स्वागत केले.
अॅड. बळवंतराव जाधव यांनी प्रास्ताविकातून पुतळा उभारण्यामागील भूमिका स्पष्ट केली. त्यांचे वडील राजा हरिश्चंद्र जाधव यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत निःस्वार्थ भावनेने समाजसेवा केली. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उर्वरित आयुष्य समाजासाठी समर्पित करण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या ट्रस्टच्या माध्यमातून दिंडेगाव येथील फार्म हाऊसवर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“आपण शंभर जन्म घेतले तरी आई-वडिलांच्या ऋणातून मुक्त होता येत नाही,” असे भावपूर्ण उद्गार काढत त्यांनी मातृऋण, पितृऋण आणि समाजऋण फेडण्याचा प्रयत्न आपल्या कार्यातून सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.
शिल्पकार व पुस्तिका निर्मिती करणाऱ्यांचा सत्कार

राजा हरिश्चंद्र जाधव यांचा अर्धाकृती पुतळा साकारणारे शिल्पकार प्रा. सुधाकर सूर्यवंशी तसेच ‘संघर्ष योद्धा’ पुस्तिकेचे मुखपृष्ठ, अक्षरजुळणी व अंतर्गत सजावट करणारे के. के. ग्राफिकचे संचालक किरण कुलकर्णी यांचा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मंदोदरी जाधव व मुद्रिकाबाई जाधव यांची अनुक्रमे साडी तुला व मिठाई तुला करण्यात आली. तुलाभारातील साड्यांचे उपस्थित महिलांना वाटप करण्यात आले, तर मिठाईचेही सर्वांना वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे व अॅड. महेंद्रसिंह चव्हाण यांनी केले. अॅड. बाबासाहेब गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.




