६ डिसेंबर… तसाही – असाही
६ डिसेंबर १९९२, कृषी महाविद्यालयात शिकत असताना शैक्षणिक सहलीसाठी सोलापूर मार्गे आम्ही सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापक, सकाळी हैदराबाद येथे येऊन पोहोचलो. इयत्ता अकरावी- बारावीच्या चाकोरीबद्ध, अभ्यासमय जोखडातून बाहेर पडून, कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतरची आमची ही पहिलीच शैक्षणिक सहल. तेव्हा आनंद, उत्साह, वागण्या बोलण्यातला मोकळेपणा, नवीन मित्र, नवनवीन विषय यामुळे आमच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आलेले होते.
हैदराबाद येथे दिवसभर भटकंती, खरेदी, खाऊगिरी असा भरगच्च कार्यक्रम आखलेला. चारमिनार, सालारजंग म्युजियम, बिर्ला मंदिर, प्लँनेटोरियम वगैरे ‘हेचि देही हेचि डोळा’ पाहून सायंकाळी आम्ही रेल्वे स्थानकावर आलो. तेव्हा मोबाईल वगैरे सोबत असण्याचे कारण नव्हतेच. शिवाय दररोज घरी फोन करून बोलणे वगैरे हा प्रकारही नव्हता. आम्ही सगळेच मुक्त पंछी होऊन या सहलीला निघालो होतो.
रेल्वेस्थानकावर मित्रा मित्रांचे घोळके तयार झाले, सोबत असलेले चिवडा, लाडू, शंकरपाळी यांचा फडशा पाडला गेला. थोड्याच वेळात बेंगलोरला जाणाऱ्या रेल्वेत बसलो. काहींना खिडकी हवी होती, काहींना वरचे बर्थ, काहीजण तारूण्यसुलभ भावनेतून, त्यांना हवे ते सहप्रवासी शोधण्यात गुंग होते. काहींनी पूर्व नियोजनानुसार दोन्ही बर्थच्या मध्ये आपापल्या सूटकेस एकावर एक रचून त्यावर लुंगी किंवा चादर अंथरून पत्त्यांचे डाव मांडले. आम्हाला कोणालाही बाह्य जगाची फिकीर नव्हती.

रेल्वे बेंगलोरकडे निघाली, हळूहळू एकेकजण आपापल्या जागांवर स्थिरावले. काहीजण खिडक्यांतून बाहेर पसरलेले अफाट हैदराबाद शहर, वस्त्या पहात होते. गाडी हळूहळू आपला वेग वाढवत होती, दिशा तांबूस लाल रंगल्या होत्या. पश्चिमेचा गार वारा सर्वांगाला स्पर्शून जात होता. तेवढ्यात अचानक बाहेरून खिडकीच्या गजावर एक दगड जोरात येऊन आदळला. ‘खण्ण’ असा जोरात आवाज डब्यातील सगळ्यांना ऐकू आला. सगळ्यांची आपापली तंद्री भंग पावली. जो तो बाहेर पाहू लागला. गाडी तेवढ्यात पुढे गेली होती. नेमकं काय झालं ते कुणाच्या लक्षात आलं नाही. आमच्यातील काहींनी सावधपणे खिडकीच्या काचा खाली ओढल्या.
काही क्षणात बाहेरून आणखी काही दगडं खिडक्यांवर येऊन आदळली. सुदैवानं एकही दगड आत आला नाही. बाहेर काही ठिकाणी तरुणांचा जमाव दिसत होता. आमच्या रेल्वेवर दगडफेक करायचा प्रयत्न झाला. आता गाडी भरधाव धावत होती, शहर मागं पडलं होतं. आम्हाला सुरुवातीला विशेष काही वाटलं नाही पण नंतर एकंदरीत तणाव जाणवायला लागला, क्षणभर मनात विचार आला, जर आपण हैदराबाद वेळेत सोडले नसते तर…? गाडी धावत होती, आम्ही सकाळी बेंगलोरला पोहोचणार होतो. सोबत असलेले खाऊन आम्ही आपापल्या बर्थवर सैल झालो. वाचन, गप्पा, गाण्याच्या भेंड्या वगैरे सुरू झाले. पत्त्यांचे डावही रंगात आलेले होते.

७ डिसेंबर १९९२ – सकाळी लवकरच रेल्वे बेंगलोरला पोहोचली. एका मित्राने स्टेशनवर असलेल्या स्टॉलवरून एक इंग्रजी वृत्तपत्र घेतले.
पहिल्याच पानावर बाबरी मस्जिद पाडली गेल्याची बातमी होती. आम्हाला लगेच आमच्या राहण्याच्या ठिकाणी जायचे होते तिकडे निघालो. निवासाचे ठिकाण जवळच होते. शहरात वर्दळ फार दिसत नव्हती. सकाळ असल्यामुळे असेल कदाचित असा आम्ही विचार केला. निवासस्थानी पोहोचल्यावर सोबत असलेल्या प्राध्यापकांनी आम्हाला एका तासात तयार व्हायला सांगितले. आज दिवसभर आम्ही बेंगलोर दर्शन करणार होतो.
आम्ही सगळे तयार होत होतो, अचानक बाहेर रस्त्यावर गोंगाट सुरू झालेला ऐकायला आला. बाहेर जाऊन पहातो तर बरीच गर्दी दिसली. काही जण घोळक्याने उभे होते, त्यांच्यात काहीतरी चर्चा सुरू होती. थोड्या वेळा नंतर आम्हाला कळले की एका रिक्षावाल्यावर एका जमावाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. शहरात सगळीकडे तणाव वाढत चाललेला दिसला. बाबरी मज्जिद पाडल्यामुळे दोन धर्मातील समाजामध्ये तणाव निर्माण झालेला दिसत होता. थोड्याच वेळात पोलिसांच्या गाड्या रस्त्यावरून धावताना दिसू लागल्या, चौकाचौकात पोलीस बंदोबस्त सुरू झाला. आमच्या सोबत असलेल्या प्राध्यापकांनी परिस्थितीचा आढावा घेऊन कुठेही बाहेर न जाण्याचा निर्णय घेतला आम्ही कानावर येणाऱ्या बातम्यांमुळे जरा धास्तावलेलेच होतो. दिवसभर खोल्यांमध्ये बसून राहिलो, सुदैवाने जेवणाची व्यवस्था तिथेच असल्यामुळे आम्हाला बाहेर जायची गरजही पडली नाही. पोलिसांनी बेंगलोर शहरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवलेली होतीच चारच्या सुमारास आम्ही पोलीस बंदोबस्तात स्टेशनवर पोहोचलो. आजचा दिवस नाही म्हणायला रिकामाच गेलेला होता. आता इथून पुढचा प्रवास म्हैसूरकडे होणार होता. रात्री मैसूरला पोहोचलो. निवासस्थानाची व्यवस्था अगोदरच केलेली असल्यामुळे थेट निवासस्थानी पोहोचलो. शहरात वर्दळ कमी होती, पण शांतता होती. बेंगलोरसारखा तणाव इथे आढळला नाही, पण मध्ये मध्ये पोलिसांची गाडी स्पीकरवर काहीतरी सूचना देत फिरत होती. अर्थात सूचना कन्नडमध्ये दिल्या जात असल्यामुळे आम्हाला त्याचा अर्थ काही कळला नाही. केवळ सावधतेचा इशारा असावा म्हणून या सूचनांचा आम्ही अधिक विचार केला नाही. आमचे निवासस्थान शहराच्या मध्यभागीच होते. प्रवासात प्रत्येक ठिकाणी चोल्ट्री किंवा धर्मशाळा सदृश अशा सामुदायिक निवासस्थानात आमची व्यवस्था केलेली असायची. आम्ही उतरलो होतो ती मध्यभागी मोकळी जागा आणि तिन्ही बाजूंनी खोल्या आणि हॉल असे बांधकाम केलेली वास्तू होती. आमच्या सारखेच इतर काही यात्रेकरू तिथे थांबले होते. त्यात अय्यप्पा स्वामींचे भक्तही होते, कदाचित ते शबरीमला येथे दर्शनासाठी जात असावेत. संपूर्ण काळा वेश परिधान केलेले, दाढी, मिशा आणि केस वाढलेले हे भक्त आमच्यासाठी नवीनच. सायंकाळी त्यांनी सामुदायिक आरती केली, आम्हीही मग त्या आरतीत सामील झालो. भाषा कळत नसल्यामुळे आम्हाला केवळ टाळ्या वाजवून सहभाग नोंदवता आला. आम्हाला पाहून त्यांनाही आनंद वाटला असावा. थोड्या वेळात आमच्या गप्पा सुरु झाल्या. मैसूर मध्ये संचारबंदी लागू केलेली आहे आणि सर्व दुकाने रेस्टॉरंट्स सगळेच आता बंद राहणार आहेत हे त्यांच्या बोलण्यातून कळले. आम्ही हे ऐकले मात्र आणि आमच्या पोटात गोळा आला. कारण आता सायंकाळच्या जेवणाची व्यवस्था कुठे करायची हा मोठा यक्ष प्रश्न होता. आम्ही चोल्ट्रीच्या बाहेर अंदाज घ्यायचा प्रयत्न केला आणि लक्षात आलं की, सगळीकडे सामसूम झालेली होती, सगळी बाजारपेठ, दुकाने बंद झालेले होते, रस्त्यावर कोणीही दिसत नव्हते. याचा अर्थ आता आम्हाला बाहेर भोजनासाठी जाता येणे शक्य नव्हते आणि राहत होतो त्या ठिकाणीही तशी काही व्यवस्था नव्हती. आम्ही शेवटी तसेच थोडाफार चिवडा चकल्या खाऊन झोपी गेलो. सकाळी उठल्यावरही बाहेर सगळीकडे सामसूमच होते. याचा अर्थ शहरात संचारबंदी सुरू झालेली होती. आता इथून बाहेर पडणेही शक्य नव्हते आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी काही मदतही मिळण्याची शक्यता नव्हती. मग आमच्यातील काही जणांनी स्वामींना आमची अडचण सांगितली. आय्यप्पा स्वामींचे ते सगळे भक्त, त्यांनी मग आमच्यासाठीही जास्तीचा भात आणि सांबार बनवले. खरं तर आमची संख्या खूप होती पण त्यांचाही ग्रुप मोठा असल्यामुळे त्यांनी एकत्रितपणे 3 – 4 भांड्यांमध्ये भात आणि सांबर बनवून आम्हाला खायला दिले. आम्ही कसेबसे जेवण केले आणि स्वामींना धन्यवाद दिले. दुपारच्या जेवणाची तर व्यवस्था झाली, पण संध्याकाळचं काय? स्वामींचा हा ग्रुप आम्हाला तरी असा किती खाऊ घालणार होता? शेवटी आम्ही सोबत असलेल्या चिवडा शंकरपाळी, धपाटे यांवरच निभावून न्यायचे ठरवले. नाही म्हटलं तरी आता आमच्या मनावर ताण येत होता. आम्ही परप्रांतात खूप दूरवर येऊन अडकलेला होतो आणि बाहेरील परिस्थिती अशी बिकट. घरच्यांना आमची काळजी लागलेली असावी. त्यांना संपर्क करण्याचं काही साधनही आमच्या समोर दिसत नव्हतं. सहल कॅन्सल करून महाराष्ट्रात परत जावं का याबाबतही आमच्यामध्ये आता चर्चा सुरू झाली. काही जणांना असं वाटत होतं की, आता पुढे रिस्क न घेता, आहे तिथून सुखरूप परत जाणे हेच योग्य राहील. पण आमच्यापैकी काही जणांनी धाडस दाखवले. आहे त्या प्रसंगाला तोंड देणे योग्य राहील, शिवाय आपण पंचवीस जण आहोत त्यामुळे आपल्याला घाबरण्याची तशी गरज नाही. शेवटी प्राध्यापकांना आम्ही समजावले आणि सहल पुढे कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतला. मग आमच्या प्राध्यापकांनी सी एफ टी आर आय येथील शास्त्रज्ञांशी संपर्क साधला आणि त्यांना आमची अडचण सांगितली. त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की ही परिस्थिती जास्तीत जास्त आणखी एक दिवस राहील.
मैसूर मधील तिसरा दिवसही आम्ही तसाच बसून, चिवडा, चकल्यांवर काढला. सुदैवाने त्या दिवशी परिस्थिती पूर्वपदावर येण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आणि एकदाची संचारबंदी उठवली गेली. तारुण्यात शरीर आणि मनाचा उत्साह खरंच खूप जास्त असतो. आम्ही पुन्हा एकदा एकमेकांना धीर देत, पुढच्या प्रवासाच्या तयारीला लागलो. मैसूर मध्ये सी एफ टी आर आय ला भेट दिली. तेथील कँटीनमध्ये मनसोक्त इडली, दोस्यांवर ताव मारला. तिथल्या विविध उपक्रमांची माहिती करून घेतली. आमच्यासाठी खरंच हा एक चांगला अनुभव होता.
मग पुढे कोयंबतूर च्या दिशेने आम्ही प्रयाण केले. तमिळनाडू बॉर्डर वर आम्हाला अडवण्यात आले, वाहनाची, आम्हा सगळ्यांची कसून तपासणी केल्यानंतर आम्हाला तामिळनाडूच्या हद्दीत प्रवेश देण्यात आला. आता निलगिरीच्या झाडांच्या पानांचा मंद सुवास वाऱ्याबरोबर आमच्या नाकात जात होता आणि हळूहळू आमच्या मनावरील ताण कमी होत होता.
जवळ जवळ चार दिवसानंतर आज आम्ही मोकळा श्वास घेत होतो.

✍🏻 व्यंकटेश कुलकर्णी,हैदराबाद











