उद्धव ठाकरेंनी लातूर मतदार संघाचा सौदा करून शिवसैनिकांचा गळा कापला-अँड बळवंत जाधव
सत्तेचा गैरवापर करून कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातत्याने छळ
महायुतीकडून सर्वसामान्य माणसाच्या हिताचे अनेक निर्णय
लातूर (माध्यम वृत्तसेवा)राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी लातूर ग्रामीण मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आ रमेशआप्पा कराड विजय होणे गरजेचे असून रमेशआप्पांच्या विजयासाठी शिवसैनिकांनी जिद्दीने जोमाने कामाला लागावे असे आव्हान जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अँड बळवंत जाधव यांनी केले.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या समन्वयासाठी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यात शिवसेना पदाधिकारी आणि प्रमुख शिवसैनिकांची बैठक झाली या बैठकीस महायुतीचे उमेदवार आ रमेशआप्पा कराड, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अँड बळवंत जाधव, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, जिल्हा प्रमुख सचिन दाणे, भाजपा पंचायतराज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, शिवसेना जिल्हा युवा प्रमुख कुलदीप सूर्यवंशी, शिवसेना महिला आघाडीच्या सौ. बावगेताई, राधिका पाटील, वळसे महाराज यांच्यासह इतर अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी लातूर मतदार संघाचा सौदा करून शिवसैनिकाचा गळा कापला असल्याचे सांगून अँड बळवंत जाधव म्हणाले की, या मतदारसंघात स्वाभिमानाची लढाई आहे. आपल्याच घरात सत्ता ठेवण्याचे षडयंत्र सातत्याने यशस्वी करणाऱ्या देशमुखांनी सत्तेचा गैरवापर करून कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातत्याने छळ केला. कोणत्याही परिस्थितीत लातूर ग्रामीण मतदार संघातून रमेशआप्पा कराड यांचा विजय होणे काळाची गरज आहे आप्पांना मत म्हणजे एकनाथजी शिंदेंना मत आहे तेव्हा ही लढाई जिंकण्यासाठी हातात पडेल त्या साधनाचा वापर करून काँग्रेसला चारी मुंड्याचित करण्यासाठी शिवसैनिकांनी जिद्दीने जोमाने कामाला लागावे असे आवाहन केले.

गेल्या वीस वर्षापासून गोरगरीब सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लातूर ग्रामीण मतदारसंघात प्रस्थापिता विरुद्ध सातत्याने संघर्ष करीत आहे धनदांडग्याविरुद्ध लढत आहे. शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला मला मिळालेल्या आमदारकीच्या माध्यमातून गावागावात विकास कामांना कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून आणला अनेक कामांना गती दिली असे सांगून महायुतीचे उमेदवार आ रमेशआप्पा कराड म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कार्यक्षम महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले असून शिंदे साहेबांना पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसविण्यासाठी शिवसैनिकांनी जिद्दीने काम करून लातूर ग्रामीण मतदार संघात महायुतीच्या विजयासाठी जिकरीचे प्रयत्न करावेत. आपला विश्वास निश्चितपणे येणाऱ्या काळात सार्थक ठरेल असे बोलून दाखविले.
प्रारंभी जिल्हाप्रमुख सचिन दाणे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकविण्यासाठी आमदार रमेश आप्पा कराड निवडून येणे खूप गरजेचे आहे असे सांगून त्यांच्या विजयात शिवसैनिकांचे निश्चितपणे मोठे योगदान राहील असे बोलून दाखविले.
यावेळी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आणि विविध आघाडीचे प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.