“आनंदाचा शिधा” — अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांच्या दारी दिवाळीचा उजेड
लातूर | साई फाउंडेशन तर्फे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी व नागरिकांसाठी “आनंदाचा शिधा” हा उपक्रम आज राबविण्यात आला. दिवाळीच्या मुहूर्तावर संकटग्रस्त कुटुंबांच्या जीवनात पुन्हा प्रकाश पेरण्याचा, आनंद पोहोचवण्याचा हा संवेदनशील प्रयत्न आज करण्यात आला.

अतिवृष्टीमुळे लातूर शहर मतदारसंघातील अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले, पिकांचे नुकसान झाले आणि दिवाळीसारखा सण दु:खात बुडाला. या पार्श्वभूमीवर अर्चना ताई पाटील चाकूरकर यांनी स्वतः पुढाकार घेत साई फाउंडेशनच्या माध्यमातून “आनंदाचा शिधा” या उपक्रमाद्वारे गरजूंना अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचे वाटप केले.या प्रसंगी ताई म्हणाल्या —“ही मदत नव्हे, हे आमचं कर्तव्य आहे. या मातीत वाढलो, या माणसांनीच आपल्याला ओळख दिली; म्हणून त्यांच्या संकटात उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे.

दिवाळी म्हणजे केवळ आपल्या घरातच नाही, तर समाजातील प्रत्येक घरात आनंदाचा दिवा पेटवण्याची संधी आहे.”ताईंच्या या कृतीतून त्यांची संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि लोकांप्रती असलेली खरी आपुलकी पुन्हा अधोरेखित झाली.अतिवृष्टीच्या सावटात हरवलेल्या हसऱ्या चेहऱ्यांवर पुन्हा उजेड फुलवणाऱ्या या उपक्रमाचं समाजातील सर्व स्तरातून मन:पूर्वक कौतुक होत आहे.





