22.3 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeमहाराष्ट्रअनिल अवचट गेले!

अनिल अवचट गेले!

बाबा (अनिल अवचट)” थांबले.

काही माणसे ही कित्येकदा भेटण्याआधीच आपली आहेत असे वाटत असते. त्यातलेच एक म्हणजे ‘बाबा’ !! लातूरला ते आले होते तेव्हा त्यांचा लेखक म्हणून जो काही थोडा वेळ सहवास लाभला तो अनेक पटींनी समृद्ध करून गेला.

त्यांच्या पुस्तकांमधून ते आधीही भेटत होते नंतरही भेटत राहिले. परिसस्पर्शाप्रमाणे विचारांना सोन्याचा मुलामा देत गेले. अशी अफलातून माणसे फक्त जगत नाहीत तर ती प्रत्येक क्षणाचे, जगण्याचे उत्सव करत सर्वांना कैक पटीने आनंद देत जातात.

बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली …

(थांबण्याबद्दलचा हा लेख मला स्वतःला फार मोलाचा वाटतो).

थांबणे..!

कुठे..?
केव्हा..?
कसे थांबावे..?
ही एक कला आहे.
ती सर्व कलांमध्ये लागू होते..!

कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते.

माझ्याभोवती तरुणपणी अलौकिक माणसे होती. त्यांच्यामुळेच ही जाणीव मला होत गेली. विंदा करंदीकर माझे शेजारी आणि प्रतिभावंत कवी. एकदा त्यांनी ठणकावले की, आता मी लिखाण बंद करतो आहे आणि त्यांनी शब्द पाळला.

स्वत:शी प्रामाणिक राहून या निर्णयापर्यंत यावयास धारिष्ट्य तर लागतेच; पण विसर्जनाची बूजही लागते. तसेच तात्या माडगूळकरही होते. तेही माझे मित्र होते. आयुष्याच्या उताराला लागले तेव्हा या उमद्या लेखक, चित्रकार, शिकारी आणि प्रवासी माणसाने हाच मार्ग अवलंबला. ते म्हणायचे, ‘गड्या, जगण्याची आतून उमेद राहिली नाही..!’

विंदा शेवटपर्यंत प्रसन्न राहिले. भाजी, मासे आणायला आम्ही सोबतीने जात असू. मासेवाल्या बाईशी घासाघीस करायला त्यांना मजा येत असे. तेव्हा त्यांच्यातला कवी बहुदा त्यांच्या पिशवीत त्यांनी लपवून ठेवलेला असे. तितक्याच आत्मीयतेने ते संगीतात रमत. तसेच तात्या होते. संध्याकाळी आम्ही गप्पा मारीत फेरफटका मारीत असू. तेव्हा त्यांच्यातल्या अद्भुत लेखकाची सावली कुठेही त्यांच्याबरोबर चालत नसे. उरलेले जीवन एखाद्या कवितेसारखे गुणगुणत ही माणसे कुठलेही आविर्भाव न घेता जगले.

पु. ल. देशपांडे यांनीही वेळेनुसार आवराआवर केली. देणग्या देऊन, पुस्तके/ पुस्तकांचे हक्क त्यांनी वाटून टाकून ते मुक्त झाले आणि उरलेले आयुष्य एक गिफ्ट मिळाल्यासारखे हसत जगले.

‘जोपर्यंत लोकांना वाटते आपण अजून खेळावे, तीच थांबण्याची योग्य वेळ असते…!,’ हे सुनील गावस्करचे वाक्य तंतोतंत यात बसते. कोठे थांबावे हाच संयम त्यात आहे.

विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे आमचे आबा. त्यांचा व्यासंग, प्रभुत्व, त्यांची जाण, अभ्यास, समाज सुधारण्यासाठीचे त्यांचे दीर्घ कार्य सर्वानाच ठाऊक आहे. त्यांच्या सहवासात मला हेच जाणवते. या प्रचंड ज्ञानाच्या ग्रंथसंग्रहालयातून ते अचानक जुन्या महाबळेश्वरच्या घरी गेले. ड्रायव्हरला सांगितले, ‘सकाळी काही घाई नाही.’ ड्रायव्हर जेव्हा आत आला तेव्हा छातीवर हात ठेवून आबांचे विसर्जन झाले होते.

ज्ञानी आणि भक्कम जीवनाचा अर्थ कळलेले हे ऋषीच म्हणावे लागतील. साहित्य सहवासात संध्याकाळी फिरताना गंगाधर गाडगीळ एकदा भेटले. गाडगीळ हे ब्रिटिश शिस्तीतले होते. सगळं नीटनेटके, वेळेवर असायचे, जसे त्यांचे वाड:मय आणि आयुष्य होते. त्या संध्याकाळी त्यांचा ड्रेसदेखील इस्त्री केलेला, तंतोतंत होता. त्यांच्या मदतीला बरोबर नोकरही होता. मला त्यांनी थांबवले आणि म्हणाले, ‘मिस्टर अवचट, बरे झाले आत्ताच भेट झाली..! आता पुढे भेट शक्य नाही.’

‘परदेशी चाललाय का..?,’ मी विचारले. ‘नाही. आत्ता सारे थांबवले आहे. लिखाण आणि इतर गोष्टी व्यवस्थित आवरल्या आहेत. औषधे बंद केली आहेत. आता एकेक मित्रांना भेटतो आहे. थँक्यू, तुमचा सहवास लाभला..!’

ते शांतपणे नोकराबरोबर फाटकापाशी चालत गेले. त्याच आठवड्यात ते गेल्याचा निरोप आला. या लोकांनी हे विसर्जन किती समजूतदार आणि अलिप्तपणे स्वीकारले होते.

ओशोंनीही अत्यंत वेगळ्या संदर्भाने विसर्जनावर लिहिले आहे. Abandoning करणे, सोडून देणे अशी सारी अंगे या विसर्जनात येतात. ओशोंनी शेवटी सांगितले, ‘माझ्या गळ्यात घातलेल्या माळा फेकून द्या. संन्याशी भगवे कपडे काढून टाका. स्वत:चा संन्यास स्वत: शोधा. जे मौनात विसर्जित होते तेच चांगले संगीत..! त्यांच्या या वाक्यातच जीवनाच्या संगीताचे अर्थ सामावले आहेत.

जगण्याच्या या शर्यतीत प्रत्येक जण निराळे मार्ग शोधतो. बहुतेकांना ते आयते हवे असतात. कोणाच्या तरी खांद्याची, दैवताची डोके ठेवण्याची त्यांची गरज असते. पण विसर्जन हा तुमच्या बौद्धिक पातळीचा, मनाचा एक भाग आतल्या आत असतो; जो भाग एखादा गुरू प्रसाद म्हणून तुमच्या हातात देत नाही.

वयाप्रमाणे जीवनाशी सामील होणे यातच खरी ग्रेस आहे. अंगणात उन्हात तांदूळ निवडत बसलेल्या, साईसारखी त्वचा झालेल्या प्रेमळ आजीमध्ये ती ग्रेस असते.

कोऱ्या हॅण्डमेड पेपरवर रंगाचा पहिला ठिपका टाकल्यावर तो हळुवार पसरत जातो. पुन्हा अनेक रंगांत तो मिसळत जातो. त्याच्या कंट्रोल्ड ओघळांनी किंवा छटांनी एक चित्र बनते. कधी ते देखणे दिसते, कधी जमत नाही. हे महत्त्वाचे नाही. ती प्रोसेसच दैवी असते. त्या कागदावरच्या रंगाच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.. बदलत राहतात. विघटन हे अलौकिक अ‍ॅबस्ट्रॅक्ट नॅचरल चराचरातील मौनच असते.

समतया वसुवृष्टि विसर्जनै

जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते. हत्तीला कळते आपले दिवस संपायला आलेत. कळपातून तो अपरात्री गुपचूप पाय न वाजवता निघतो आणि पूर्वीच शोधलेल्या गुप्त ठिकाणाकडे तो चालत राहतो. तो तेथे पोहोचतो आणि स्थिर उभा राहतो. त्याचा एवढा प्रचंड बलवान देह हळूहळू काही दिवसांत संपतो आणि मातीशी एकरूप होतो..!

हे विसर्जन..!

झाडाचे पिकले पिवळे पान फांदीवरून निसटते. हवेत तरंगत मौनाच्या प्रार्थनेसारखे जमिनीवर अलगद टेकते आणि विसर्जित होते. अगदी हळुवारपणे. विसर्जन ही मौलिक गिफ्ट आहे.

आजकाल लोकाना कुठे थांबावे हेच समजत नाही. जीव संपला तरी हावरटपणा जात नाही. छाती फुटेपर्यंत लोक धावत असतात मागे वळून बघत नाही. स्वत:ची पर्वा नसते का..? तर जेवढे कमवता येईल तवढे पदरात पाडून घ्यायचे पण एक दिवस सर्व असुनही सर्व संपल्यासारखे दिवस येतात तेव्हा हातात फक्त निराशा आणि अंधारच दिसतो.ऐश्वर्य येते पण ते भोगायची मनस्थिती नसते. मग जीवनभर एवढे पळून काय उपयोग झाला. शेवटी हे सगळे मायाजाल न संपणारे आहेत. त्यातून आपणच ठरवून विरक्त होणे केव्हाही चांगलेच..!

विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण तेवढा पण वेळ आपल्याला नाही..!

  • सुभाष अवचट

(साभार :फेसबुक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]