शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार-आ.संभाजी पाटील निलंगेकर
अन्नत्याग आंदोलनाच्या समारोपाप्रसंगी सरकारला दिला इशारा
छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होत घेतली शपथ
जिल्ह्यातील वयोवृध्द शेतकर्यांच्या हस्ते लिंबूपाणी घेत केली उपोषणाची सांगता
लातूर ः लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची सरसकट नुकसान भरपाई मिळावी याकरिता सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलेले होते. 72 तासाच्या अन्नत्याग आंदोलनाचे लोण महाराष्ट्रात पोहचेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हेक्टरी 10 हजार रूपयांची मदत महाविकास आघाडी सरकारने घोषीत केली आहे. मात्र ही मदत म्हणजे शेतकर्यांच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम असुन ही मदत शेतकर्यांची चेष्टाच आहे असे सांगत जोपर्यंत शेतकर्यांना योग्य न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील असा इशारा माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिला आहे.

लातूर येथील शिवाजी चौकात जिल्ह्यातील 127 शेतकर्यांना सोबत घेवून आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी 72 तासाचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाच्या समारोपाप्रसंगी पाठींबा देण्यासाठी आलेल्या जिल्ह्यातील शेतकर्यांच्या जनसमुदयासमोर आ.निलंगेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा.सुधाकर श्रृंगारे, जिल्हाध्यक्ष आ.रमेश कराड, आ.सुरजितसिंह ठाकूर, आ.मेघना बोर्डीकर, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शैलेश लाहोटी, जयश्रीताई पाटील, जिल्हा चिटणीस किरण उटगे, प्रेरणा होणराव, स्वाती जाधव, मिना भोसले, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, शहर जिल्हाध्यक्ष अजीत पाटील कव्हेकर, मिना भोसले, अॅड.दिग्विजय काथवटे आदिंसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणून घेणारे राज्य सरकार चालवत असून त्या जाणत्या राजाला मराठवाड्यातील शेतकर्यांचे दुःख आणि प्रश्न दिसून येत नाही अशी जोरदार हल्ला चढवत आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी केवळ बारामतीचा विकास करत आपण महाराष्ट्राचा विकास केला आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण खंबीर आहोत असे सांगणार्या या जाणत्या राजाच्या सरकारने आता जी मदत घोषीत केली आहे ती मदत आम्हा शेतकर्यांना मान्य नसून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तर मराठवाडा महाराष्ट्रात आहे की नाही असेच वाटू लागलेले आहे. कदाचितही मराठवाडा हा महाराष्ट्राचा भाग आहे याचा विसर पडला असावा असा प्रश्न उपस्थित करून आ.निलंगेकरांनी सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी मागील काळात शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रूपयांची मदत द्यावी अशी मागणी केली होती मात्र कदाचित आता ती त्यांना आठवत नसावी म्हणूनच त्यांनी केवळ एकरी चार हजार रूपयांची मदत घोषीत करून शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केलेले आहे. मात्र शेतकर्यांवर जो अन्याय या सरकारने केलेला आहे तो अन्याय होवू देणार नाही अशी ग्वाही देवून शेतकर्यांना न्याय मिळेपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील असा इशारा आ.निलंगेकर यांनी यावेळी दिला.
आज अन्नत्याग आंदोलनाची सांगता झाली असली तरी आगामी काळात हा संघर्ष सुरूच राहील मात्र त्याचे आता स्वरूप वेगवेगळे असेल असे सांगून शेतकर्यांना योग्य मदत नाही मिळाल्यास आगामी दिवसामध्ये रास्तारोको आंदोलन, जेलभरो आंदोलन करण्यात येईल असे सांगून आता या आंदोलनाची जबाबदारी शेतकर्यांची नसून ज्या शेतकर्यांच्या आणि जनतेच्या आशिर्वादामुळे व्यासपीठावर बसलेल्या आम्हाला जे पद मिळालेले आहे त्या सर्वांची असेल असा शब्द आ.निलंगेकर यांनी यावेळी उपस्थित शेतकरी जनसमुदयास दिला.

सत्तेसाठी तीन दिशेकडे तीघांची तोंडे असलेली पक्ष एकत्रीत आलेली असून या पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षात शेतकर्यांना नागविण्याचे काम केले असल्याची टिका करत आ.सुरजितसिंह ठाकूर यांनी शेतकर्यांना न्याय देण्यासाठी लातूरमध्ये जे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आहे त्याचे लोण केवळ मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नेण्याची जबाबदारी आता विरोधी पक्ष म्हणून भाजपाची आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
जिल्हाध्यक्ष आ.रमेश कराड यांनी जिल्ह्यातील साखर कारखानदारी आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्यांना सुखी आणि समाधानी ठेवण्याचे काम केले असल्याचे सांगणार्या काँग्रेसच्या नेतेमंडळींनी असे सांगणे म्हणजे शेतकर्यांची घोर फसवणूक असल्याची टिका केली. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी केवळ शेतकर्यांचा गळाच घोटण्याचे काम केले असून आगामी काळात मदत मिळवून देण्यासह त्यांच्या हक्काची एफआरपीची रक्कम व हक्काच्या बँकेतून योग्य कर्जपुरवठा करण्यासाठी भाजपा बांधील असून त्याकरिता जिल्हा बँकेची निवडणूक पुर्ण ताकदीनीशी लढवित सहकार क्षेत्राचे पावित्र्य जपण्याचे काम आम्ही करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आ.मेघना बोर्डीकर यांनी लातूरने जे अन्नत्याग आंदोलन सुरू करून शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी जो संघर्ष उभा केला आहे तो संघर्ष आगामी दिवसांमध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये उभा करण्यात येईल असे सांगून याची सुरूवात परभणी जिल्ह्यातून करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी खा.सुधाकर श्रृंगारे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख यांनी आंदोलनास पाठिंबा देण्यात आलेल्या शेतकर्यांना संबोधीत केले. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, डॉ.भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आ.आशिष शेलार, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांनी ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून बोलून संदेश दिला. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

अन्नत्याग आंदोलनात सहभागी झालेल्या 127 शेतकर्यांपैकी 14 शेतकर्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंदोलनाची सांगता जिल्ह्यातील वयोवृध्द शेतकर्यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत लिंबूपाणी देवून करण्यात आली. यानंतर माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह मान्यवर आणि आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या चरणी नतमस्तक होवून शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील शंभर पेक्षा अधिक सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि आपल्या समर्थनाचे पत्र दिले.
मराठवाड्यातील मंत्र्यांचे तोंडावर बोट हाताची घडी
राज्य सरकारमध्ये मराठवाड्यातील कांहीजण मंत्री म्हणून काम करत आहेत. मात्र हे मंत्री केवळ आपली खुर्ची सांभाळण्यात व्यस्त असून त्यांना जनतेच्या आणि शेतकर्यांच्या प्रश्नाशी कांहीच देणे-घेणे नसल्याचे वारंवार स्पष्ट झालेले आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजा मोठ्या संकटात सापडलेला असतांना त्यांना सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करून त्यांनी सरकारला भाग पाडणे क्रमप्राप्त होते. या सर्वच मंत्र्यांचे तोंडावर बोट आणि हाताची घडी अशी स्थिती असून या मंत्र्यांकडून आता कोणतीच अपेक्षा ठेवू नये असे आवाहन करून या मंत्र्यांच्या हाती आता भोपळा देण्याची वेळ आली असल्याचेही आ.निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकारविरोधात संतापाची लाट ः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात लातूरात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या समारोपाप्रसंगी आपला पाठींबा दर्शविण्यासाठी विरोधीपक्ष नेते तथा माजीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून आपला संदेश देतांना राज्यसरकारच्या विरोधात जनतेसह शेतकर्यांमध्ये संतापाची लाट पसरलेली असून अडचणीत असलेल्या राज्यातील शेतकर्यांना वेठीस धरण्याचे काम या महाविकास आघाडी सरकारने केले आहे. राज्य सरकारने आज जाहीर केलेली तोकडी मदत शेतकर्यांची चेष्टा असल्याचे सांगितले. आगामी काळात शेतकर्यांना न्याय देण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही असा इशारा देत लातूरात सुरू झालेल्या आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.











