अमर…. दिलीपकुमार

0
374

सिनेमागली’वरून साभार. 

 

‘अमर’, ‘आझाद’, ‘कोहिनूर’ …. दिलीपकुमार

– प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, लातूर

 

हा दिवस कधीतरी येणारच होता. … आणि तो कधीही आला असता, तरी तो असाच झाला असता. उदासही… पण असंख्य आठवणींनी भावज्जड. आज प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही ह्ललेच. ज्यांना कशाचा गंध नाही, त्यांचाही आयुष्यात काही न काही डचमळलेच.

दिलीपकुमार राहिला नाही. काही माणसं एकेरी संबोधनानेच आदराचे मानकरी असतात. सचिन, शाहरुख, अमीर, लतादीदी…. आणि दिलीपकुमार.

अनेकवेळा मृत्युच्या दारातून दिमाखानं परत आला, तो आज जाण्यासाठी. … आणि खरे तर आपल्या आयुष्यातली होणारी घालमेल त्याने अनेकदा असे मृत्युच्या दारातून परत येवून वाचवली. आज मात्र ते शक्य झालं नाही. शेवटी सर्वांनाच जावे लागते. पण कधीही गेले, तरी तेवढीच घालमेल होणार होती. ती झालीच. असे वाटत होते, अजून काही दिवस मिळावेत. वेळ नाहीये मला त्याच्यावर लिहायला. खूप लिहायचं होतं. एकेका चित्रपटावर लिहायचं होतं. अभिनयशैलीवर, एकेका अदेवर, दिलीपकुमारने साकारलेल्या एकेका व्यक्तिरेखेवर. पण अनेकदा घडून तो ‘अचानक’ आणि धक्का देवूनच गेला असे वाटले. ज्याच्यातून सावरता येणार नाही असा धक्का. इथून पुढे सतत बसत राहील असा. आता त्याचा प्रत्येक चित्रपट पाहताना मनाची काय अवस्था असेल, ह्याची कल्पना करवत नाही. ‘स्वर्गीय’ दिलीपकुमार वाचावे लागेल. खरे तर तो एका फार चांगल्या अर्थाने ह्यात असताना ‘स्वर्गीय’ होता. त्याने दिलेला अनुभव स्वर्गीय वर्णावा असाच तर होता. अगदी परवापरवापर्यंत – म्हणजे ‘शक्ती’, ‘मशाल’ हे काही दशकांपूर्वी – तर तो चांगला होता की … असे वाटून गेले. इतका जिवंत, इतका लोभस, इतका आपला होता. आज ‘आपला’ म्हणावे तर तो नाहीच, अशी अवस्था झाली आहे. त्याच्याबाबतीत संवेदनशील असलेल्या प्रत्येकाला, आपल्या घरातले कुणी आता राहिले नाही, अशी मनोवस्था झाली आहे. तसा तो कित्येकांच्या जन्माआधीच ‘अमर’ झालेला ‘कोहिनूर’ होता. असा एक ‘आदमी’ होता, ज्याचा ‘पैगाम’ म्हणजे त्याचा अभिनय होता.

अभिनयाचं कुठलंही तंत्र नव्हतं, मुळात ते असतं हेही माहीत नव्हतं, तेव्हा आणि अभिनय म्हणजे जेव्हा व्यक्तिरेखेत थेट परकायाप्रवेश करून ती जगणं, जिवंत करणं, तिच्यात सामावून जाणं किंवा त्या व्यक्तिरेखेलाच स्वत:त भिनवून घेणं होतं – त्या काळातला अभिनयसंस्कार ज्यांनी कालातीत केला, त्यात सर्वात अग्रस्थानी नाव दिलीपकुमारचेच. म्हणूनच तर मीनाकुमारी शोकसम्राज्ञी आणि दिलीपकुमार शोकसम्राट झाला. इतका, की त्या ‘देवदास’च्या भूमिकेतील पराकोटीच्या शोकाच्या झंझावातातून बाहेर पडण्यासाठी मनोचिकित्सकाकडे त्याला जावे लागले. मनात भिनलेल्या व्यक्तिरेखेवर डॉक्टर काय औषध देणार ? तो रोग थोडाच होता ? तो तर गुण होता. ह्या गुणावर एकच औषध होते, ते पुन्हा ‘होमिओपॅथी’प्रमाणे तो रोगसदृश्यतेने दुसरीकडून वाढवण्याचे. म्हणून मग ‘आझाद’ सारखी व्यक्तिरेखा पुन्हा एकदा ‘अमर’ झाली. ‘कोहिनूर’ही साकारला गेला. गंमत म्हणजे या दोन्ही चित्रपटांत या दोन्ही चित्रपटांत ह्या शोकसम्राज्ञी मीनाकुमारी आणि शोकसम्राट दिलीपकुमार यांनीच मिळून काम केले. हे दोन्ही चित्रपट ज्यांनी पाहिले नसतील, त्यांनी अवश्य पहावेत. त्यांना अभिनयाची खरी जादू काय असते कळून येईल. विशेषत: ‘देवदास’च्या भूमिकेला फक्त ‘रडका’ अशी नतद्रष्ट व्याख्या दिली असेल, त्यांनी तर पहावेतच. खरे तर अशा चित्रपटांच्या कथानकापेक्षा त्यातील जिवंतपणा, खेळकरपणा, प्रसन्नताच पाहण्याची दृष्टी ठेवली पाहिजे. पण विषय तो नाही. विषय हा आहे, कि अभिनयाच्या वैविध्य आणि व्याप्तीची नेमकी जाण ही कशी कलावंताला कशी समर्थ करते याची उदाहरणे म्हणून दिलीपकुमारला ‘चौकटी’त बसवणाऱ्या रसिकांनी (आणि तथाकथित समीक्षकांनी) अवश्य तपासावीत. ‘दिल्लगी’, ‘उडन खटोला’, ‘पैगाम’ अशा प्राथमिक अवस्थांच्या काळातील चित्रपटांचे तर सोडाच, पण पुढेही ‘मधुमती’, ‘यहुदी’ यांतीलही उमदेपणा अवश्य पहावा. ‘आदमी’ सारख्या उथळ कथानकाच्या चित्रपटातील साकारलेला ‘मनोरुग्ण’, ‘राम और श्याम’ पेक्षाही ‘दास्तान’मधील दुहेरी भूमिकेतील टोकाचा विरोधाभास सहज होताना पहावा. ‘दास्तान’मधील, एकाच रूपातील दोन वेगवेगळ्या व्यवसायांतील व्यक्तिरेखा समोरासमोर बसून पत्ते खेळत असतानाचा एक प्रसंग पहावा. त्यातले चापल्य आणि हुबेहूबता कशी असते ते तर पाहण्यासारखे आहे. अभिनय आणि त्याची समीक्षाही शिकणाऱ्या रसिक आणि कलावंतांनी पाहण्यासारखा हा प्रसंग आहे. ‘आदमी’मधला हसता हसता रडणारा आणि रडता रडता हसणारा, काळजाच्या खोल अंतरात वसलेल्या दु:खाला विसरण्यासाठी आयुष्यभर कारणाच्या शोधात कासावीस झालेला संवेदनशील मनोरुग्ण आठवला तर आजही मनात घालमेल होते.

पण अशी किती उदाहरणं देणार ? तरीही, दिलीपकुमारच्या विशिष्ट अंगभूत वैशिष्ट्याच्या उल्लेखासाठी हे सारे लिहिणे ही केवळ प्रस्तावनाच आहे. भलेही दिलीपकुमार श्रीमंत व्यक्तिरेखांत राजबिंडा, सुकुमार दिसत असला (आठवा – ‘यहुदी’, ‘विधाता’, ‘मुगले आजम’ इ. खरेतर ‘धरमअधिकारी’ हेही उदाहरण द्यावे – पण तो चित्रपट इतका थिल्लर होता, की त्याच्या समर्थ अभिनयाकडेही दुर्लक्षच केलेले बरे.) आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या व्यथा-वेदनेने व्याकूळ झालेला पाहताना आपल्याही अंत:करणात कालवाकालव करून टाकत असला (‘मधुमती’मधले ‘टूटे हुये ख्वाबो ने’, ‘दिल दिया दर्द लिया’ मधील ‘कोई सागर दिल को बहलाता नही’, ‘यहुदी’ मधले ‘मै तो इक ख्वाब हुं’ ‘दास्तान’मधील ‘न तू जमी के लिये, है न आसमां के लिये’ अशा असंख्य गाण्यांतील आणि ‘मशाल’मधील पत्नीवियोगाने आक्रोश दर्शवणारा अभिनय), भावभक्तीने आणि श्रद्धेत विलीन झाल्यावर आपल्याही चित्च्छक्तीत जीवनाचे तत्वज्ञान सांगत असला (‘गोपी’मधले ‘सुख के सब साथी’, ‘नया दौर’मधील ‘इन्साफ का मंदिर है ये’, ‘आदमी’मधील ‘आज पुराणी राहोंसे’ इ.), भारतीय चित्रसृष्टीत यशस्वी दुहेरी भूमिकेचा अबाधित विक्रम करणाऱ्या त्याच्या अभिनयाने आपल्याला चकित केलेले असले (‘राम और श्याम’, ‘दास्तान’; याशिवाय – ‘बैराग’ मधली तिहेरी भूमिका आणि एकाच चित्रपटात दोन व्यक्तिरेखा यशस्वी करणारे ‘कोहिनूर’, ‘आझाद’, ‘अमर’ अशांसारखे अनेक चित्रपट), आणि ‘शक्ती’मधील पोलीस अधिकारी व ‘मशाल’ मधला पत्रकार अशा आधुनिक कर्तव्यदक्ष व्यक्तिरेखा अत्यंत बेमालूम सत्यप्रत करत असला – तरीही, ग्रामीण जीवनातील रांगड्या, भाबड्या, आडदांड, अडाणी पण सच्च्या दिलाच्या लढाऊ आणि प्रांजळ, स्वच्छ ग्रामस्थाच्या, तळागाळातील माणसाच्या भूमिका दिलीपकुमारइतक्या कुणीही जिवंत केलेल्या नाहीत, असे माझे स्पष्ट आग्रही मत आहे. मी त्यासाठी चर्चेचे एखादे आव्हानही घ्यायला तयार आहे. त्यासाठी असंख्य उदाहरणे आहेत. मला तर असे वाटते, की दिलीपकुमार खरा खुलायचा तो याच भूमिकांत. त्यासाठी आवर्जून पहावेत असे – ‘गोपी’, ‘गंगा-जमना’ हे तर चित्रपट आहेतच. या चित्रपटांतील त्याच्या व्यक्तिरेखांचे बारकावे, थोडे तरी ग्रामीण जीवन जवळून म्हणा किंवा दुरूनसुद्धा ज्यांनी पाहिले आहे त्यांना तर कळूच शकतील; पण ज्यांना ते जीवन दुरूनही पाहता आले नाही, त्यांनी ते माहीत करून घ्यायचे असेल, तर त्या भूमिका पाहिल्या तरी त्यांचा ग्रामीण मानसिकतेचा अभ्यास परिपूर्ण व्हायला मदत होईल, असा माझा स्पष्ट दावा आहे. याशिवाय, त्याचे भाबडे रांगडेपण, जीवनानुभवाचा साहजिक थेटपणा आणि जीवनव्यवहाराचे साहजिक साधेपण ज्यांना समजून घ्यायचे असेल, त्यांनी ध्येयधुंद (खरे म्हणजे ध्येयअंध) कम्युनिस्ट विचारसरणीच्या भारतीय जीवनातील फोलपणा दाखवणारा ‘सगीना’ पहावा. (या विषयावरील ‘परख’, ‘बहारों के सपने’ हे चित्रपट आहेतच. त्यातही ‘सगीना’ अधिक स्पष्ट.) ‘फिर कब मिलोगी’ मधली छोटीशीच, पण विलक्षण प्रभावी भूमिका पहावी. या चित्रपटात तर दिलीपकुमार आल्यावर पडदाच कसा भारदस्त होतो त्याचे दर्शन होते. (विश्वजित आणि माला सिन्हा ह्यांचा अक्षरश: विसर पडतो.) छोट्याशा भूमिकेतीलही त्याच्यातल्या ग्रामीण भागातील दरोडेखोराच्या साध्या सवालांनी आपण विचारमग्न होतो, मान डोलावतो, ते दिलीपकुमारच्या चेहऱ्यावरील भूमिकेशी तादात्म्य पावून एकरूप झालेल्या अभिनयामुळेच. ‘सगीना’मधील ‘साला मै तो साहब बन गया’ ह्या गाण्याच्या वेळचे वातावरण जिवंत केले आहे, ते दिलीपकुमारच्या सहज, तरीही बारकाव्यांसह उमटलेल्या बैमालूम अभिनयामुळेच. शिवाय, ‘बैराग’, ‘राम और श्याम’, ‘दिल दिया दर्द लिया’, अशा दुहेरी भूमिकांपैकी त्यातल्या ग्रामीण दिलीपकुमारचे रूप अधिक स्पष्ट, अधिक प्रभावी आणि अधिक सच्चे वाटते. याचे कारण कदाचित दिलीपकुमारच्या पूर्वायुष्यातही असेल.

पेशावरमध्ये जन्मलेल्या, पारंपारिक फळविक्रेत्याचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील संस्कार व अनुभवाची अनुभूतीशी आणि जाणिवेशी असलेली जवळीक त्याला कारणीभूत असेल. ते काही असो. ‘गंगाजमना’मधील ‘धन्नो ओय धन्नो….’ ही मारलेली हाक आणि ‘गोपी’मध्ये थोरल्या भाऊ-भावजय-बहीण यांच्यावर जिवापाड प्रेम करतानाही हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या, अद्वातद्वा बोलत भांडणाऱ्या ग्रामीण ‘निकम्म्या’चे ओरडणे कर्कश्य न वाटता अक्षरश: मधुर आणि प्रांजळ वाटते…. आणि हे दिलीपकुमारच करू शकतो. (बाकीच्यांचे फक्त प्रयत्नच – तेही फिकेच.)

कदाचित त्यामुळेच मला तो अधिक जवळचा वाटत असेल. पण असा मी एकटा नाही, तर सगळे जगच त्याच्या या गुणांवर फिदा आहे. म्हणूनच तर आज तो नाही, यात आपल्यातलेच काहीतरी हरवल्याचा भास होतो आहे. आपल्या आयुष्यालाच काहीतरी न्यूनत्व आले आहे, अशी भावना झाली. अशी भावना अनेकांच्या जाण्याने होते. आपले सुदैव असे, की आपण अशा काळात, अशा देशात, अशा विश्वात जन्मलो, जिथे आणि जेव्हा अशा विभूतींशी आपला प्रत्यक्ष नसला तरी आपलेपणासह परिचय होतो. म्हणूनच आजच्यापेक्षा भारावलेल्या पण मागास काळात डबडेवजा, टिनपाट थेटरात घेतलेला चित्रपटानुभव रुपेरी होवून आजच्या काळात, आमच्या मानसात फुललेला व चिरतरुण आहे. त्या अर्थाने त्या दंतकथा नाहीत. पण केवळ आता असा होणे नाही म्हणून त्याला दंतकथा म्हणायचं. खरेतर चित्रपटाच्या बाबतीत ‘आमचा काळ, तुमचा काळ’ म्हणणे तितकेसे योग्य नाही. काही अजरामर व कालातीत कलाकृती आणि त्या साकारणारे कलावंत युगानुयुगे प्रेरणाच असतात.

वास्तविक पाहता, अशा व्यक्तींच्या लौकिकासह त्यांना वादांचे, प्रवादांचे मळभ सहन करावे लागते. दिलीपकुमारच्याही वाट्याला ते आलेच. त्याने साकारलेल्या, जिवंत केलेल्या भूमिकांबाबतही त्याला टीकास्त्र झेलावे लागले. काम करताना त्याचे आक्रमक असणे, त्याचे मधुबालाशी फसलेले प्रेमप्रकरण, वयात दुपटीहून अधिक फरक असलेल्या सायराशी विवाह, त्यात दरम्यानच्या काळात त्याने केलेला दोन-तीन दिवसच टिकलेला दुसरा विवाह, त्याला परदेशात हातोहात लुबाडल्या गेलेल्या प्रसंगाची बातमी, त्याचे मुंबईचे ‘मेयर’पद, पाकिस्तान सरकारातील व पाकिस्तानी जनतेतील प्रभावी व्यक्तींशी असलेले स्नेहसंबंध आणि पाकिस्तानने त्याला दिलेल्या पुरस्कारासह नागरिकत्वाचा दर्जा अशा अनेक बाबतीत तो विरोधी चर्चेचा धनी झाला. पण तरीही एक भारतीय म्हणून आणि सच्चा माणूस, समर्थ कलावंत म्हणून मात्र त्याची ओळख – खरे म्हणजे त्याचे जनमानसावरील अधिराज्य नखाकणानेही काळवंडले नाही. धूसर झाले नाही.

चित्रिकरणाच्या वेळी त्याचे दिग्दर्शकाशी झालेले वाद हाही चर्चेचा विषय असे. एकदा एका मुलाखतीत त्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्याने त्याचे ‘तो वाद नसून निर्मितीतील सहभाग असे’ असे अतिशय संयतपणे वर्णन केले होते. ‘देवदास’मधील भूमिकेमुळे चुकीचे आदर्श पसरतील का व तरुण पिढीवर घातक संस्कार होतील का आणि अशी भूमिका आपण का स्वीकारली ? – असे विचारले असता – देवदासच्या भूमिकेतील नकारात्मकतेपेक्षा आणि तुम्ही चर्चा करत आहात त्या संस्कारमूल्यांपेक्षा त्याच्यातील नाट्यमूल्ये अधिक मोठी आणि श्रेष्ठ आहेत, असे माझ्यातल्या कलावंताला वाटते’, असे अतिशय समर्पक उत्तर देवून ‘… असे ‘देवदास’ न होण्यासाठीही या भूमिकेचा उपयोग करून घेण्याची जबाबदारी समाजाची आहे’ असेही आवाहन त्याने केले होते.

मुळात ही माणसे प्रतिभावान होती. त्यामुळे ती त्यांच्या अभिनयक्षेत्रापुरती मर्यादित रहात नसत. त्यांच्या जीवनशैलीवर, कार्यशैलीवर त्यांच्यावरील संस्कारांचा पगडा असे. निष्ठा, श्रद्धा असे. त्या जोरावरच व्यावसायिकतेचा राक्षसी अंध:कार त्यांनी त्यांच्या जीवनात होवू दिला नव्हता. काहीतरी तत्वज्ञान उराशी, बुद्धीशी ठेवून जगणाऱ्या कलावंतांचे जीवन असे समृद्ध असतेच. त्यांचा समाजमनावर संस्कार होत असे. त्यामुळे त्यांच्या लौकिकाला वैयक्तिक जीवनातील न्यूनत्व जोडण्यापेक्षा त्यांच्या निर्मितीची, योगदानाची उत्तुंगता, भव्यता आणि त्याचवेळी सूक्ष्मताही त्यांच्या स्मृतींना अधोरेखित करत राहील. असे ‘कोहिनूर’ ‘अमर’ आणि सर्व वादांपासून ‘आझाद’ असतातच. नौशादप्रमाणेच दिलीपकुमार तर स्वत: कविता, शायरीचा जाणकार होता. त्याने काही गझलाही लिहिल्या होत्या. शायरी केलेली होती. तो त्या गाऊन सादरही करत असे. त्याचे काही कार्यक्रमही करण्याचा त्याने प्रयत्न केला. पण त्याला पडद्याच्या चौकटीतच स्वीकारलेल्या रसिकांना ते भावले नाही. अर्थात, त्यामुळे दिलीपकुमारला फरक पडण्याचे कारण नव्हते. काव्य आणि प्रतिभा यांचे नाते जपतो तो कलावंत सर्वसमृद्ध असतो.

दिलीपकुमारही असाच राहील. सतत जिवंत. सतत अंत:करणात. चिरंतन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here