लातूर/प्रतिनिधी: श्रीअरविंद व नरेंद्र अर्थात स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृतीची जगाला खऱ्या अर्थाने ओळख करून दिली.या दोन संस्कृतीमध्ये सेतू बांधून आपल्या संस्कृतीचे महत्त्व जगाला पटवून दिले,असे मत पुणे येथील प्रसिद्ध प्रवचनकार श्रीमती माधवीताई जोशी यांनी व्यक्त केले.
श्रीकेशवराज संचलित रेनिसन्स सीबीएसई स्कूल येथे राष्ट्र चेतना सप्ताहानिमित्त आयोजित प्रवचन मालिकेत पहिल्या दिवशी विचार मांडताना माधवी जोशी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या श्रीमती वर्षाताई मुंडे तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ.नीताताई अग्रवाल स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी तुंगीकर तसेच रेनिसन्स सीबीएसई स्कूलचे अध्यक्ष डॉ.मनोज शिरुरे यांची मंचावर उपस्थिती होती. ‘नरेंद्र ते अरविंद-अरविंद ते नरेंद्र’ हा श्रीमती जोशी यांच्या प्रवचनाचा विषय होता.

विषय मांडणी करताना श्रीमती जोशी यांनी योगी अरविंद घोष यांच्या बालपणापासून ते स्वातंत्र्य लढ्यातील सहभागापर्यंत विविध प्रसंग सांगत त्यामागची भूमिका आहे विषद केली.वडिलांच्या मतानुसार इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर परदेशात शिकलेल्या अरविंद यांना तेथेच भारतीय पारतंत्र्याची माहिती मिळाली.तेंव्हापासून मातृभूमीला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले.संधी मिळताच भारतात येऊन बडोदा संस्थानात काम सुरू केले.स्वातंत्र्यलढ्यात योगदान देत असताना त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. या तुरुंगवासानंतर अरविंद यांच्यात कायापालट झाला. त्यांनी स्वतःला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झोकून दिले.स्वातंत्र्यलढ्यात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी काम सुरू केले.सज्जनांनी शांत राहणे चुकीचे आहे,असे ते म्हणत. आपल्या देशावर पश्चिमेकडून सांस्कृतिक आक्रमणे झालेली आहेत,ती थोपवली पाहिजेत. यासाठी आपण पेटून उठले पाहिजे,असे म्हणत त्यांनी या आक्रमणाविरोधात पहिल्यांदाच प्रतिहल्ला केला.योगी अरविंद यांनी जगाला भारतीय ऋषीमुनींची परंपरा,हिंदू धर्माचा वारसा,वैदिक धर्म,विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखवला.हा मार्ग कठीण असला तरी त्यावर आपल्याला चालायचेच आहे,हे त्यांनी पटवून दिले.

योगी अरविंद पाश्चिमात्य देशात शिक्षण घेऊन ते पूर्वेकडे म्हणजेच भारतात आले होते.याच काळात नरेंद्र अर्थात स्वामी विवेकानंद भारतीय वारसा घेऊन पश्चिमेकडे म्हणजे शिकागो मध्ये गेले.या दोघांनी पूर्व आणि पश्चिम असा सेतू बांधला.असे महापुरुष आपल्या देशाला लाभले होते. आज भारतीय संस्कृतीचा बोलबाला आहे पण त्याचा पाया घालण्याचे काम योगी अरविंद आणि स्वामी विवेकानंद यांनी केलेले आहे.स्वामीजी दृष्टे होते.त्यांना भविष्य लक्षात येत होते.त्यामुळे उत्तम कर्म करा,विचारांचे अधिष्ठान ठेवा,असे सांगतानाच भगवद्गीतेतील कर्मयोगाची आठवणही ते करून देत असत, असे माधवीताई म्हणाल्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.राष्ट्र चेतना शिबिराचे संयोजक नितीन शेटे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला.संतोष बीडकर यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती राजश्री कुलकर्णी यांनी केले.श्रीमती कांचन तोडकर यांच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री केशवराज विद्यालयाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी (तुंगीकर),शालेय समिती अध्यक्ष शैलेश कुलकर्णी , शिबिराचे संयोजक नितीन शेटे, सहसंयोजक संजय गुरव,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विष्णू सोनवणे,समन्वयक राहुल गायकवाड,माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी हेंडगे, रेनिसन्स सीबीएसई स्कूलचे अध्यक्ष डॉ.मनोज शिरुरे, प्रधानाचार्य अलिषा अग्रवाल,शिशुवाटिका अध्यक्षा श्रीमती वर्षा डोईफोडे,शिशुवाटिका प्रमुख मंजुषाताई जोशी,सौ.योगिनी खरे,उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे, पर्यवेक्षक संदीप देशमुख,दिलीप चव्हाण,बबन गायकवाड,अंजली निर्मळे,शिबीर प्रमुख गुरुनाथ झुंजारे,शिबीर महाव्यवस्थापक जितेंद्र जोशी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




