अरुण खोरे यांना म. स. पा चा पुरस्कार
ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा संपादन कार्यासाठी दिला जाणारा आशा प्रभाकर संत पुरस्कार जाहीर झाला आहे. अरुण खोरे यांनी सकाळ , लोकसत्ता व दै लोकमत मध्ये दीर्घकाळ पत्रकार म्हणून काम केले आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाविषयी विशेष आस्था आणि साक्षेपी व्यासंग असणाऱ्या पत्रकाराचा सन्मान या निमित्ताने होतो आहे. विद्यार्थीदशेत त्यांच्या ‘ दलित साहित्याच्या शोधात ‘ या संपादकीय ग्रंथाने लक्ष वेधून घेतले होते.

सामाजिक चळवळी , नवे बदल आणि गांधीवादी विचार हे त्यांचे विशेष आवडीचे अभ्यासविषय.. लोकसत्ता मधील यांचें वृत्तांत विशेष गाजले. पोरके दिवस हे त्यांचे आत्मकथन तसे मराठीत दुर्लक्षित राहिले. सोलापूरला असताना त्यांनी सोलापूरच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनावर काढलेल्या पुरवण्या या त्यांच्या संपादन दृष्टीचा नमुनादर्श होत्या. वर्तमापत्रातील पत्रकाराचा व्यासंग हा एकारलेला असून चालत नाही तर तो बहुविधआणि अद्यावत असावा लागतो याचा विवेक संपादक म्हणून खोरे यांना फार चांगला आहे.. त्यांचे वृत्तपत्रीय गद्य वाचनीय असे आहे. स्वतः च्या आंतरिक गरजेसाठी लोकशाहीसाठी समंजस संवाद हे मासिक चालवीत आहेत. सोलापूरला असताना गो. मा सरांच्यामुळे त्यांच्याशी अनेकदा भेटी झाल्या. सदा डुंबरे यांच्याविषयी त्यांना फार ममत्व होते. त्यामुळेच चारेक वर्षांपूर्वी त्यांनी त्यांचा पुणे येथे भव्य सत्कार आणि त्यांच्या कामाबद्दल चर्चा घेतली होती. वेगवेगळ्या गोष्टीं जाणून घेण्याचे अनावर कुतूहल , कल्पक संपादन दृष्टी आणि माणसांवर लोभ असणाऱ्या ज्येष्ठ मित्राचा या पुरस्काराने सन्मान होत आहे. याचा आनंद नक्कीच आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा.
रणधीर शिंदे











