नाट्यस्पंदन प्रतिष्ठानची लतादीदींना लातुरात हृद्य स्वरांजली
लातूर :
डॉ. स्वप्ना उटीकर यांनी सादर केलेल्या ‘अलविदा…. अलविदा….’ ह्या लतादीदींच्या अजरामर स्वरांची साश्रू आठवण लातूर येथील सद्गदित रसिकांच्या मनाला हेलावून गेली. लतादीदींच्या दु:खद निधनाने व्याकुळ झालेल्या वातावरणात लातूर येथील नाट्यस्पंदन प्रतिष्ठानतर्फे मात्र त्यांच्या अजरामर गाण्यांच्या गायनानेच आगळीवेगळी स्वरांजली अर्पण करण्यात आली. लतादीदींच्या एकाहून एक सरस अशा निवडक गीतांच्या सादरीकरणाने मंत्रमुग्ध ‘स्वरलतामय’ वातावरणात लतादीदींच्या स्वर्गीय व स्वर्णिम स्वरांनी क्षणोक्षणी वातावरण पुन्हा पुन्हा भारावून जात राहिले. याप्रसंगी, डॉ. देवश्री पाटील-येरटे यांनी ‘नाम गुम जायेगा…. मेरी आवाज ही पहचान है’ सादर करत भावपूर्ण दाद घेतली, तर डॉ. मंजुश्री कुलकर्णी यांच्या ‘… अजी रूठ कर अब कहां जाइयेगा…’ ह्या गाण्याने लतादीदींच्या आर्त स्वरांची आठवण करून मैफलीला व्यथित केले. स्वाती जगताप यांच्या ‘ लग जा गले…’, डॉ. विनया बनशेळकीकर यांच्या ‘दिल तो है दिल, दिल का ऐतबार …’, डॉ. सुधीर बनशेळकीकर यांनी सादर केलेल्या ‘..आजकल पांव जमींपर नही पडते मेरे..’ शुभदा रेड्डी यांच्या ‘अखेरचा हा तुला दंडवत …’, अजय पांडे यांच्या ‘..अजीब दास्तां है ये….’ अशा विविध गाण्यांनी वातावरण एकाचवेळी शोकाकुलही होत गेले आणि लतादीदींच्या आठवणीत रमतही गेले. विजयकुमार सुवर्णकार, अविनाश जाधव, डॉ. अशोक आरदवाड, डॉ. दीपाली अंबेकर, डॉ. अमित उटीकर, सुधीर राजहंस यांनी सादर केलेली सुश्राव्य गाणीही लतादीदींना उचित श्रद्धांजली अर्पण करणारी भावुकता जागृत करून गेली.

याप्रसंगी अजय पांडे यांनी आपल्या समधुर शब्दांजलीद्वारे लतादीदींच्या महनीय योगदानाची अभ्यासपूर्ण माहिती देत पिढ्यानपिढ्या आयुष्यभर पुरेल एवढा समृद्ध सुरेल ठेवा देवून लतादीदी अमर झाल्या, अशा भावपूर्ण शब्दांत कृतज्ञता प्रकट केली. सुखदा मॅटर्निटी सर्जिकल रुग्णालयात झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक आरदवाड व सचिव डॉ. मुकुंद भिसे यांनी अजय पांडे यांच्यासह लतादीदींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली व स्वरांजलीच्या मैफलीची सुरुवात केली. संजय अयाचित, संतोष कुलकर्णी व सुखदा मॅटर्निटी सर्जिकल रुग्णालयाचे डॉ. शाम कुलकर्णी, यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. शेवटी लतादीदींच्या गाण्यांची न संपणारी मैफल उरात ठेवून कार्यक्रमाची सांगता झाली.
मुंबईत लतादीदींचे पार्थिव पंचतत्वात विलीन होत असताना लातुरातील हे कलावंत त्यांच्या आठवणीने भारावून जावून आपल्या एका कलावंताला स्वरांची सलामी देत होते.