विद्यार्थ्यांच्या बुद्धीकौशल्याला चालना देण्याच्या
उद्देशाने चालविला जातोय अविष्कार उपक्रम
लातूर : शिक्षण क्षेत्रात आगळेवेगळे, अभिनव बदल करून प्रयोगशीलता जोपासण्याचे काम करणाऱ्या येथील कौशल्य अकॅडमीद्वारा संचलित अविष्कार लॅबोरेटरी या अभिनव उपक्रमाची सुरुवात रविवार, दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी थाटात करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार अरुण समुद्रे यांची उपस्थिती होती.
ज्येष्ठ पत्रकार अरुण समुद्रे यांनी हा उपक्रम म्हणजे गुणपत्रिकेपेक्षा कितीतरी पटीने वेगळा व विद्यार्थ्यांना बौद्धिकदृष्ट्या चालना देणारा असल्याचे मत व्यक्त केले. तर विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, कल्पनाशक्तीला पुरेशी चालना देता यावी, यासाठी अविष्कार उपक्रमाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याचे या उपक्रमाच्या संचालिका वैशाली देशमुख यांनी सांगितले. यासाठी इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाला १२० असे एकूण ३६० प्रयोग विकसित करण्यात आले आहेत. याउपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण स्वातंत्र्य असेल. आपल्याला देण्यात आलेला प्रयोग ते वेगवेगळ्या पध्दतीने करून पाहू शकतील . परिणामतः त्यांची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती आणखी विकसित होण्यास मोलाची मदत होणार असल्याचे वैशाली देशमुख यांनी उपक्रमाच्या सुरुवातीप्रसंगी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले.
आपल्याकडे विद्यार्थ्यांवर पालक – शिक्षकांकडून अपेक्षांचे मोठे ओझे लादले जाते. त्यात विद्यार्थी गुरफटून जातो. विशेष म्हणजे यामध्ये आवश्यकतेपेक्षा अनावश्यक बाबीच त्याच्याकडून करून घेतल्या जातात. पालकवर्गही इतर पालकांप्रमाणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या मुलांना वाढवण्यापेक्षा त्यांना घडवणे खूप महत्वाचे आहे. हीच बाब आपण या अविष्कार उपक्रमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. या उपक्रमात अध्ययनापेक्षा प्रॅक्टिकलला अधिक महत्व दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या मुलांमध्ये ज्ञान ग्रहण करण्याची अफाट शक्ती आहे. आम्ही फक्त त्यांच्यात ‘ कौशल्य; निर्माण करण्याचे काम करतो, असेही वैशाली देशमुख यांनी नमूद केले. दोन दिवस चाललेल्या अविष्कार प्रदर्शनीत लातूर शहरातील साडे पाचशेहून अधिक विद्यार्थ्यानी लाभ घेतला. विद्यार्थ्यांच्या अंगीभूत गुणांचा विकास झाला पाहिजे, यासाठी त्यांनी विविध प्रात्यक्षिके स्वतः हाताळणे खूप आवश्यक आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ते साध्य केले जाणार आहे,असेही वैशाली देशमुख यांनी सांगितले. या उपक्रमात लातुरातील विविध शाळांमधील विद्यार्थी – त्यांचे पालक आवर्जून उपस्थित होते. आपल्या पाल्याना या आगळ्यावेगळ्या उपक्रमात स्वतःला हरवून घेतलेले पाहून पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून वैशाली देशमुख यांचा हा आगळा वेगळा उपक्रम कल्पनेपेक्षाही अधिक यशस्वी होईल, असा विश्वास पालकांनी व्यक्त केला आहे.
——————————











