*अविस्मरणीय भेट व आठवण*

0
289

*आणि मा. अमितभाई म्हणाले,*
*‘स्वागत तो आप का होना चाहिये…’*
——————————-
(दत्ता जाेशी, औरंगाबाद)
*‘‘अरे भई, आप लेखक हो… इतनी सारी पुस्तके लिखी है… इतना बडा काम किया है… स्वागत तो आप का होना चाहिये…’’, असे म्हणत, दिलखुलास हसत मा. अमितभाईंनी चक्क स्वतःच्या खांद्यावरची शाल काढून माझ्या खांद्यावर पांघरली…!*

माझ्यासाठी हा अनपेक्षित धक्का होता. खरे सांगायचे तर मी त्या क्षणी अक्षरशः शून्य झालो होतो. नेमके काय होतेय ते कळण्यापलिकडे गेलो होतो. हे मी कधी कल्पिलेलेही नव्हते. भेटीदरम्यान पूर्ण वेळ आमचा शब्द न शब्द लक्षपूर्वक ऐकत असलेल्या अमितजींनी त्या क्षणी जे काही केले ते मोरपीस अंगावरून फिरविण्यापासून थेट कानाशेजारी मोठा धमाका ऐकू येण्यापर्यंतच्या सगळ्याच अनुभूती मला एका क्षणात देणारे ठरले…!

सुनीलजींनी (गोयल) शाल – श्रीफळ देऊन नुकताच त्यांचा सत्कार केला आणि पुष्पगुच्छ देण्यासाठी मी त्यांच्या शेजारी पोहोचलो. माझ्या हातातला पुष्पगुच्छ हाती घेताघेता त्यांनी माझ्याच बद्दल चार चांगले शब्द उच्चारले आणि स्वतःच्या खांद्यावरची शाल काढून माझ्या खांद्यावरून गळ्याभोवती प्रेमाने पांघरली. पुष्पगुच्छ माझ्याच हाती राहिला. *मी खाली वाकून माेटाभाईंना नमस्कार केला. त्यांनी पाठीवर किंचित थोपटले आणि वर उचलले.*

देशाच्या कर्तृत्त्ववान गृहमंत्र्यांच्या आणि अर्थातच देशात उच्च पदावर पोहोचलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका पूर्व कार्यकर्त्याच्या शुभहस्ते ‘तुम्ही बी घडा ना’ या परिषदेच्याच 25 पूर्व कार्यकर्त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा आलेख मांडणार्‍या पुस्तकाचे प्रकाशन आम्ही योजले होते. मा. अमितजींनी आमची प्रेमाची विनंती स्वीकारत 2 नोव्हेंबरच्या दुपारी 12 ची वेळ दिलेली होती.

ठरल्या वेळी आम्ही सगळे त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो. प्रशस्त हॉलमध्ये ते डाव्या गुडघ्यावर उजवा पाय आडवा ठेवून त्यांच्या नेहेमीच्या स्टाईलमध्ये बसलेले. आम्ही आत गेलो. नमस्कार – चमत्कार झाले. श्री. संजय पाचपोर यांनी सगळ्यांचा परिचय करून दिला. ‘तुम्ही बी घडा ना’ या पुस्तकाबाबतची माहिती दिली. पुस्तकातील काही कार्यकर्त्यांच्या कामाबद्दलचा तपशील सांगितला.

*मग मी आणि सुनीलजींनी ‘पोलादी माणसे’ची संक्षिप्त माहिती सांगायला सुरुवात केली. मागील 10 वर्षांपासून उद्यमिता प्रसारासाठी चालू असलेले आमचे काम, राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांत प्रवास करून मी लिहिलेली 25 पुस्तके, त्यातून मांडलेली सुमारे 800 हून अधिक उद्यमींची संघर्षकथा, त्यात आलेले काही अनुभव मी सांगत गेलो.*

‘पोलादी माणसे’च्या काही मोजक्या जिल्ह्यांच्या प्रती आणि मी लिहिलेली आणखी काही पुस्तके आम्ही सोबत नेलेलीच होती. तो गठ्ठा त्यांच्या हाती सोपविला आणि *त्यातले ‘पोलादी माणसे – कोल्हापूर जिल्हा’ हे पुस्तक काढून मी त्यांच्या हाती ठेवले. (कोल्हापूर ही त्यांची सासुरवाडी, हे मला माहिती होते. तो एक धागा नक्की जुळेल अशी माझी अपेक्षा होती आणि घडलेही तसेच!) त्यांनी या पुस्तकाची काही पाने चाळली. काही व्यक्तिमत्त्वांच्या प्रोफाईलचे लीड वाचले. (बहुधा तेवढे मराठी त्यांना येते.) काही पाने वाचताना ते मंदपणे हसत हाेते. त्या काही माणसांची ओळख बहुधा त्यांना आठवली असावी.* ‘का हसलात?’ हे विचारायचे धाडस काही मला झाले नाही…!

या सगळ्या मुलाखती प्रत्यक्ष भेटून घेतल्या आहेत का, अशी विचारणा त्यांनी मला केली. प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रात जाऊन त्यांना भेटून हे लेखन केल्याचे मी त्यांना सांगितले. *‘पोलाद उद्यमिता प्रतिष्ठान’च्या माध्यमातून प्रकाशित केलेल्या पुस्तक मालिकेत ‘फर्स्ट जनरेशन’च्या 800 हून अधिक उद्यमींची संघर्षकथा प्रकाशित झाली आहे, ही माहिती सुनीलजींनी दिली आणि ‘दत्ता जोशी यांनी एकट्याने स्वतः प्रवास करीत प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी भेटी देऊन हे लेखन केले आहे’,* हे वैशिष्ट्यही त्यांनी अधोरेखित केले. संजय पाचपोर यांनीही ‘तुम्ही बी घडा ना’ साठी मी घेतलेल्या मेहनतीबद्दल सांगितले आणि त्यानंतर अमितजींच्या स्वागताची औपचारिकता पूर्ण करता करताच वरची ‘लेखकाच्या स्वागता’ची घटना घडली.

मोठ्या माणसांकडून खूप काही शिकता येत असते. मा. अमितजींनी आम्हाला 10-15 मिनिटे देण्याचे मान्य केले होते. पण प्रत्यक्ष चर्चा सुरू झाली आणि जवळजवळ 40-45 मिनिटे कशी उलटली, हे आम्हालाही कळले नाही. आरंभी स्थिरस्थावर झाल्यानंतर 1-2 फोटो काढून झाले आणि त्यांनी फोटोग्राफरना बाहेर थांबायला सांगितले. बेल वाजवून सगळ्यांसाठी चहा (आणि स्वतःसाठी ब्लॅक कॉफी) आणायला सांगितले. आमच्या लक्षात आले, की त्यांना आमचा हा विषय आवडलेला आहे आणि त्यासाठी त्यांनी सवडही काढलेली आहे.

*‘चला, आटपा’ असा भाव त्यांच्या वागणुकीत अक्षरशः क्षणभरासाठीही दिसला नाही. आम्ही क्रमाक्रमाने बोलत होतो आणि ते लक्षपूर्वक ऐकत होते. मागच्या 10-12 दिवसांपासून त्यांचे सतत दौरे सुरू होते, तो थकवा चेहर्‍यावर दिसत होता खरा, पण थेट डोळ्यांत पाहात, अधून मधून मान हलवीत,किंचित स्मित करीत ते प्रत्येकाचा प्रत्येक शब्द नीट ऐकून घेत होते. या संपूर्ण वेळात मिळून त्यांनी फार फार तर 10-12 वाक्ये उच्चारली असावीत. या पूर्ण वेळेत कुठेही सहज चाळा म्हणून सुद्धा त्यांनी अन्य कुठल्या गोष्टीला हात लावला नाही. अन्य कामे केली नाहीत. मोबाईल हाताळला नाही. संपूर्ण लक्ष आमच्या सांगण्याकडे…! ‘क्वालिटी लिसनिंग…’! ‘ऐकून घेणारी माणसे मोठी होतात’, याचे प्रत्यंतर देणारा हा अनुभव.*

‘आयआयएम’ जम्मूच्या गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन ‘पद्मश्री’ नागरी सन्मानप्राप्त श्री. मिलिंद कांबळे, ‘सहकार भारती’चे राष्ट्रीय संघटनमंत्री श्री. संजय पाचपोर, वनवासी कल्याण आश्रमाचे केंद्रीय कार्यालयीन संपर्क प्रमुख श्री. शरद चव्हाण आणि ‘जेएनयू’मध्ये मध्य आशियाई देशांच्या अभ्यासक असलेल्या प्राध्यापिका डॉ. रश्मिनी कोपरकर यांच्यासोबत मी (दत्ता जोशी) आणि श्री. सुनील गोयल मिळून मा. अमितभाईंच्या भेटीला गेलो होतो. सुनीलजी वगळता आम्ही सगळेच परिषदेचे पूर्व कार्यकर्ते. *परिषदेच्या संस्कारांचा हा धागा सर्वांना एका सूत्रात ओवणारा ठरला आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडून कौतुकाचे चार शब्द ऐकून रोमांचित होत आम्ही तेथून बाहेर पडलो. *

त्यांनी मला पांघरलेली शाल आणि त्यांची स्वाक्षरी घेतलेली माझ्या पुस्तकाची प्रत माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा ठरणार आहे.

*दत्ता जाेशी, औरंगाबाद*
(व्हाटस्अप – ९४२२ २५ २५ ५०)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here