*कोजागिरीचा नवा प्रकाश !*
*सलाम सुजाता*
अत्यंत प्रतिकुल सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती असताना त्यात पुन्हा क्रूर अंधत्वाची भर, नातेवाईकांची हेटाळणी अशा बिकट
परिस्थितीवर मात करून स्टेट बॅंकेत अधिकारी झालेल्या विवाहापूर्वीच्या सुजाता कोंडीकिरे आणि आताच्या सुजाता राजपूत यांची प्रेरक कथा ऐकून सर्व उपस्थितांची मनं हेलावून गेली. डोळ्यात अश्रू तरळले . तर दुसरीकडे तिची जिद्द पाहून उपस्थितांचा उर अभिमानाने भरून आला.
हे सर्व घडले ते कोजागिरी निमित्ताने नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ जगताप आणि त्यांच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या सुजाताच्या प्रकट मुलाखतीमुळे.न्यूज स्टोरी टुडेच्या सहसंपादक अलका भुजबळ यांनी घेतलेली ही मुलाखत अतिशय भावपुर्ण , अविस्मरणीय ठरली.काही प्रश्नांच्या सुजाताच्या उत्तरांमुळे प्रेक्षक स्तब्ध झाले तर काही वेळा टाळ्यांचा कडकडाट झाला.

काही स्वानुभव कथन करताना समाजात आजही अंध, अपंगांना किती कुचेष्टेला, मानहानीला तोंड द्यावे लागते हे सांगून समाजाने आमच्याशी मित्रत्वाने, समजूतदार पणे वागले पाहिजे अशी रास्त अपेक्षा सुजाताने व्यक्त केली.
खेळताना झाडाला आदळल्याचे निमित्त होऊन दृष्टी कशी गेली, त्यामुळे शिक्षणात पडलेला खंड, त्यातून आलेले नैराश्य, पुढे डॉक्टरांनी दिलेला धीर, मानसोपचार,अंध असूनही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची ३ वर्षें अहोरात्र केलेली तयारी,अभ्यासाची पद्धत, त्यात आई,काही शिक्षक, वरळी येथील नॅशनल ब्लाईंड असोसिएशनचे सहकार्य, मार्गदर्शन ,अशा एक ना अनेक प्रश्नांची उपस्थितांची डोळे उघडणारी दिलखुलास उत्तरे दिली.
विशेष म्हणजे अंध असूनही ती बँकेचे कामकाज कसं करते याची विविध प्रात्यक्षिकं दाखवून सुजाताने उपस्थितांची मनं जिंकून घेतली.बँकेनी दिलेली विविध उद्दिष्ट्ये पूर्ण केल्याबद्दल मिळालेले पुरस्कार, परदेश दौरे याचीही तिने सांगोपांग माहिती दिली.
मोबाईलमध्ये अंधांसाठी असलेले विविध ऍप्स डोळस व्यक्तींसाठी सुद्धा किती उपयोगी आहे,हे तिने सोदाहरण दाखविल्याने सर्व उपस्थित चॅट पडले !

विवाहापूर्वी आई वडिल,भाऊ ,बहिणी,
भाऊजी यांनी तर विवाहानंतर पती मनीष राजपूत हे देत असलेल्या साथी बद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली.सुजाताच्या या मुलाखतीमुळे
कोजागिरीच्या रात्री नवाच प्रकाश पडला. शिवाय तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापुन गाणी गाऊन वातावरणात जल्लोष निर्माण झाला.
सौ श्रुतिका ,किरण जगताप आणि त्यांच्या मित्र मंडळीने विशेष परिश्रम घेऊन आयोजित केलेल्या या मुलाखतीमुळे ही कोजागिरी अविस्मरणीय ठरली यात काही शंकाच नाही.
लेखन :- देवेंद्र भुजबळ 9869484800











