ट्वेन्टीवन ॲग्रीच्या माध्यमातून ३५० एकर क्षेत्रावर
अश्वगंधा लागवडीस गातेगाव येथून प्रारंभ
औषधी वन्सपती व सेंद्रिय शेती काळाची गरज
शेतकऱ्यांनी अश्वगंधा लागवड करण्यासाठी सहभाग नोंदवावा
सौ. अदिती अमित देशमुख
लातूर (प्रतिनिधी): (दि. २२ आँक्टोबर २१)
येणाऱ्या काळात सेंद्रिय शेती व सुगंधी औषधी वन्सपतीची शेती ही काळाची गरज आहे. या उत्पादनाला मागणी चांगली राहणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी अश्वगंधा, इतर औषधी व सुगंधी वन्सपतीच्या शेतीकडे वळणे गरजेचे आहे. लातूरमध्ये वन्सपती शेतीला चालना देण्यासाठी ट्वेन्टीवन ॲग्रीच्या माध्यमातून अश्वगंधा शेतीची ३५० एकर क्षेत्रावर लागवड करण्यात येणार आहे, लातूर तालुक्यातील गातेगाव येथील शेतकरी रामेश्वर शिवाजी माळी यांच्या शेतातून अश्वगंधा लागवडीच्या या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. सेंद्रिय शेती व औषधी वन्सपती अश्गंधा लागवड करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन यानिमीत्ताने ट्वेन्टीवन ॲग्रीच्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी केले आहे.
ट्वेन्टीवन ॲग्रीच्या माध्यमातून ३५० एकर अश्वगंधा वन्सपती लागवडीचा लातूर तालुक्यातील गातेगाव येथे गुरूवार दि. २१ आँक्टोंबर रोजी शुभारंभ करण्यात आला. या लागवड प्रसंगी ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन व नियोजन समितीचे सदस्य विजय देशमुख, अश्वगंधा लागवड सल्लागार धनंजय राऊत, माजी सरपंच व पंचायत समिती सदस्य किशोर माळी, सोसायटी चेअरमन विरसेन भोसले, मुरुड आकोला सोसायटीचे चेअरमन दयानंद बिडवे आदी उपस्थित होते.

येथील परिसर अश्वगंधा वन्सपती
लागवडीसाठी अनुकूल
यावेळी पूढे बोलतांना ट्वेन्टीवन ॲग्रीच्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख म्हणाल्या की, भागोलीकदृष्टीने येथील परिसर अश्वगंधा वन्सपती लागवडीसाठी अनुकूल आहे. अश्वगंधा पिक कमी पाण्यावर व कमी मेहनतीवर येणारे आहे. सोयाबीन व हरभरा पिकाला पर्यायी पीक म्हणून अश्वगंधाची लागवड करणे फायदेशीर आहे. नवीन लागवड होणाऱ्या उसामध्येही आंतरपीक म्हणून शेतकरी अश्वगंधाची लागवड करू शकतात. येथील निसर्गाचा लहरीपणा व बाजारांमधील दरामधील असमतोलता लक्षात घेता शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहे. येणाऱ्या काळामध्ये सेंद्रिय शेती काळाची गरज बनली आहे. तसेच आरोग्य व उपचारासाठी औषधी वनस्पतीची मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांनी अश्वगंधा व इतर औषधी व सुगंधी वनस्पती लागवड शेतीकडे वळणे गरजेचे आहे असे सौ.अदिती अमित देशमुख यांनी सांगितले.

प्रायोगिक अभ्यासाअंती अश्वगंधा शेती येथे फायदेशीर
ट्वेंटीवन ॲग्रीच्या माध्यमातून अश्वगंधा शेतीला चालना देण्यासाठी मागील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर शेती करण्यात आली.या शेतीच्या अभ्यासाअंती अश्वगंधा शेती येथे फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. अश्वगंधा पिकाला कीड-रोग नसल्यामुळे फवारणीचा खर्च लागत नाही, सेंद्रिय शेतीमध्ये हे पीक घेत असल्यामुळे याला रासायनिक खताची गरज पडत नाही. अश्वगंधाच्या पानांचा उग्र वास येत असल्यामुळे जंगली जनावरे जसे हरीण रानडुक्कर यासारखे प्राणी याला नुकसान करत नाहीत, यातली विशेष गोष्ट म्हणजे याची काढणी मार्च-एप्रिल महिन्यामध्ये येते. त्यावेळी मजूर आपल्याकडे मुबलक असल्यामुळे काढणीची अडचण फारशी जाणवत नाही, या सर्व बाबीचा विचार करून शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळावे असे आवाहन अदिती अमित देशमुख यांनी केले आहे.

लातूरमध्ये साडेतीनशे एकरवर
अश्वगंधाची लागवड करण्याचा निर्णय
ट्वेन्टीवन ॲग्रीकडून लातूरमध्ये साडेतीनशे एकरवर अश्वगंधाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी अश्वगंधाची लागवड केल्यास त्यांच्याशी करार करण्यात येणार आहे. यामुळे होणाऱ्या अश्वगंधा लागवडीसह उत्पादन विक्रीसाठी मदत आणि मार्गदर्शन मिळणार आहे. जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात ते यामध्ये सहभागी होऊ शकतात, ज्या शेतकऱ्यांनी मागच्या तीन वर्षाच्या पासून शेतीमध्ये रासायनीक खते व किटकनाशके वापरले नाहीत अशा शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होऊन शेती करावी, लागव्ड केलेल्या शेतकऱ्यांनी तयार केलेला मालाची खरेदी ट्वेंटीवनकडून शाश्वत दराने करण्यात येणार असल्यमुळे शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही असे त्यांनी सांगितले.
अश्वगंधा लागवडीमध्ये शेतकऱ्यांनी
जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा
येणाऱ्या काळामध्ये अश्वगंधा व इतर अनेक औषधी पिकांची ट्वेन्टीवनच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये करार पद्धतीने शेती करण्यात येणार आहे. या वर्षी रब्बी हंगामामध्ये अश्वगंधा लागवड, पुढील वर्षी कालमेघ, सर्पगंधा यासारखी अनेक वेगवेगळी पीकांच्या लागवडीस प्रोत्साहन देणार असल्याचे सांगून सौ. आदिती अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा देऊन अश्वगंधा लागवडीमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन शेवटी केले आहे. ट्वेन्टीवन ॲग्रीच्या माध्यमातून अश्वगंधा शेतीची लागवड करण्यासाठी सहभाग घ्यायचा असल्यास किंवा अधिक माहितीसाठी धनंजय राऊत 9260000083, दत्ता वाघमारे 9604300021 यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास शुभम कत्ते, विजय कांबळे, सुरेंद्र गिरी, दिगंबर सुभेदार, गणेश भाकरे, योगेश मुळे, अश्रुबा नरसिंगे, दस्तगिर शेख, प्रतीक सव्वासे, आकाश सव्वासे, गोंविद देवणे,कृष्णा निमट, गावातील सत्तारसाहब, तानाजी कदम, माधव खोसे, श्रीकृष्ण माळी, बलराम माळी, सावता माळी, आदिनाथ सुतार, नितीन पोतदार, पांडूरंग बनसोडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.











