
ज्ञानोबा माऊली पालखीचे पहिले रिंगण तरडगाव जवळील लिंब गावात होईपर्यंत पालखीचे अखेरचे रिंगण ज्या वाखरी गावात होते तिथवर दिल्लीकर वारकरी पोचलेले असतात. यावेळी वेळापूरहून वाखरी गाठताना उन्हाची काहिली असते काय याचा अनुभव सर्वांना येत होता. जिवाला जरा आराम तेव्हाच मिळाला जेव्हा एमआयटीच्या शाळा व मंदिरपरिसरातील बागेच्या गर्द सावलीत सर्वांना जरा पहुडायला मिळाले.आमच्या लातूर जवळील रामेश्वरचे मूळचे असलेले एमआयटीचे विश्वनाथ कराड यांच्या सा-याच संकल्पना अतिभव्य.त्याची प्रचिती येथेही येते.त्यांनी येथे प्रचंड मोठा स्विमिंग पूल बांधलाय जो पालखीसोबतच्या वारक-यांना खुला केलेला असतो.भव्य मंदीर,त्यामागे शाळा आणि यात्रीनिवासाची अप्रतिम व्यवस्था आहे.कोरोना काळातच विठ्ठल मंदिर संस्थानाचे नवे यात्रीनिवास पंढरपुरात बांधून तयार झाले आहे.ते सुद्धा अतिशय रमणीय असेच बनले आहे.
आळंदीहून निघाल्यानंतर वारी वाखरीला येऊन पोहोचली की तिथपासून वारक-यांचा धावा सुरू होतो.म्हणजे ते येथून धावतच सुटतात आणि जेव्हा चंद्रभागेत स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन झाले की कोणी मंदिराचे कलशाचे,कोणी नामदेव पायरीचे,कोणी मुख दर्शन घेऊन तर कोणी विठ्ठल चरणांचे दर्शन घेऊनच विसावतात.
यावेळेस वाखरी ते चंद्रभागेचे अंतर पार करताना तो धावा आठवला आणि केव्हा चंद्रभागेच्या पाण्यात अलगद पाय शिरले ते कळालेही नाही.विठ्ठल चरणी माथा टेकवून झाल्यावर यावेळेस नामदेवांच्या वाड्यात पहिल्यांदा जाणे झाले.तिथे नामदेवांचे १७व्या पिढीचे वंशज केदार महाराजांच्या तोंडून विठ्ठलाचे आणि नामदेवांचे गुरूशिष्याचे नाते ऐकण्यास मिळाले.विठ्ठलाने आपल्या जागी एकदा नामदेवांनाच 'समचरण कर कटी,उभा तरी भीवरेच्या' विटेवर उभा राहण्यास लावले.जनाबाईंना रोज रात्री मदतीला कसे ते नामदेवांच्या वाड्यात धावून यायचे असे कितीतरी किस्से आम्ही केदार महाराजांकडून ऐकले.या वाड्यामध्ये विठ्ठलाची बाल स्वरूपातील अत्यंत मनमोहक अशी हसरी मूर्ती आहे.संत नामदेवांनी भागवत धर्माची ध्वजा उत्तर प्रांतात पंजाबापर्यंत नेऊन पोहोचवली होती.आजही या घराण्यास विठ्ठलाच्या काकडारतीचा मान आहे.
प्रत्येक वारीत विठ्ठलाचे नवनवे दर्शन आणि नवनवे अनुभव येतच राहतात.यावेळेस नामदेवांच्या वाड्यातील बालस्वरूपातील चैतन्यमयी मूर्तीचे दर्शन घडणे हा एक अपूर्व योग होता.पाच वर्षांखाली अचानक गप्पांमध्ये मित्रवर्य वैभव डांगे व अशीम पाटलांनी आषाढी वारी दिल्लीकरांसाठी खुली केली आणि ती आम्हाला घडतच गेली.यावर्षी तर संख्येत आणखी भर पडलीय.वारी घडणे सर्वांच्याच नशिबी असत नाही. आपले पूर्वसंचित, आईवडिलांची पुण्याई आणि गुरूमहाराजांचे आशीर्वादाच्या बळावर ती घडतेच आहे.ती कायम घडत राहो,एवढेच ते मागणे.तसे करताना ज्ञानदेवांचे पसायदान आणि नामदेवांचे कल्याणधावा विसरायला नकोच.


अहंकाराचा वारा न लागो राजसा !
माझ्या विष्णुदासा भाविकांसी!!
नामा म्हणे तयां असावे कल्याण!
ज्या मुखी निधान पांडुरंग!!
जय जय पांडुरंग हरी !

गणेश रामदासी