सोमवारी एफआरपी प्रमाणे भाव मिळावा
यासाठी शेतकऱ्यांचे मांजरा कारखान्यासमोर आंदोलन
हाजारोंच्या संख्येनी सहभागी व्हावे आ. रमेशआप्पा कराड यांचे आवाहन
लातूर दि.०७ – शासनाच्या नियमानुसार गाळप केलेल्या ऊसाला एफआरपी प्रमाणे भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी 9 ऑगस्ट सोमवार रोजी क्रांतीदिनी सकाळी 10.30 वाजता मांजरा कारखान्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तेव्हा मांजरा परिवारातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात हजारोंच्या संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी केले आहे.
गाळप केलेल्या ऊसाला एफआरपी प्रमाणे भाव देण्याचे शासनाचे बंधन असून मांजरा परिवारातील मांजरा, विलास, विलास -२ आणि रेणा साखर कारखान्यांनी आतापर्यंत केवळ प्रतिटन २२००/- रूपये याप्रमाणे शेतकऱ्यांना भाव दिला आहे. सध्या शेतकरी अडचणीत आहे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे होणारी रक्कम आणि प्रत्यक्ष दिलेली रक्कम यातील फरकाची रककम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे आ. रमेशअप्पा कराड यांनी सांगितले.
मांजरा परिवारातील साखर कारखान्यांना हजारो शेतकऱ्यांनी लाखो टन ऊस गाळपासाठी दिलेला आहे. मात्र या शेतकऱ्यांना अद्याप एफआरपी प्रमाणात ऊसाचा भाव मिळाला नाही असे सागून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, गाळपासाठी ऊस दिलेले सर्वजण कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आहेत. एफआरपीप्रमाणे त्यांना भाव मिळाला पाहिजे हा त्यांचा हक्क आहे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा आणि घामाचा मोबदला मिळालाच पाहिजे ही आमची आग्रही भुमिका आहे.
मांजरा परिवारातील साखर कारखान्याकडे गाळपास ऊस दिलेल्या शेतकऱ्यांची प्रतिटन रक्कम मांजरा कारखाना ५७५/- रूपये, विलास कारखाना ४९९/- रूपये आणि रेणा साखर कारखाना ६५६/- रूपये याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर तात्काळ मिळाली पाहिजे. या मागणीसाठी क्रांतीदिनी ९ ऑगस्ट २०२१ सोमवार रोजी सकाळी 10.30 वाजता मांजरा कारखान्यासमोर शेतकऱ्यांच्या न्याय
हक्कासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत तेव्हा मांजरा, विलास आणि रेणा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी या आंदोलनात हजारोंच्या संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केले आहे.











