*चाचींचे “मिठे चावल” अन् आईची माया..*
नमस्कार,
आजवरच्या आयुष्यात मला ज्या ज्या वेळी गोड भात खाण्याचा योग आला त्या त्या वेळी आमच्या चाचींची आठवण आली नाही असे कधी घडले नाही.. त्यालाही कारण होते…१९७२-७३ चा दुष्काळ आणि उपासमारीचे चटके देणारा माझ्या जीवनातील तो काळ.मी अकरा-बारा वर्षांचा असेन. त्या काळात बार्शी शहरात क्रिकेट म्हटलं की तांबोळी परिवाराचे आवर्जून नाव घेतले जायचे सोलापूर जिल्ह्यातली प्रसिद्ध क्रिकेट टीमच तांबोळी परिवाराची होती. त्या वयात बऱ्यापैकी क्रिकेट खेळत असल्याने मी तांबोळी परिवाराशी आपोआपच जोडला गेलो.अस्लम आणि त्याचे लहान भाऊ शब्बीर व असीफ यांच्याशी माझी चांगली गट्टी जमली.. मी खायची मारामार असलेल्या कुटुंबातला तर अस्लम हा मे.बाबूलाल इमामभाई या श्रीमंत फर्मचे मालक रमजानभाई व अ.गनीतांबोळी वकील यांच्या कुटुंबातील,या कुटुंबाचा बार्शीच्या राजकीय-सामाजिक वर्तुळात चांगलाच दबदबा. तरीही क्रिकेटने आमची मैत्री घट्ट केली.माझा तांबोळी कुटुंबात वावर वाढला. मित्र म्हणून मला कुटुंबाचा सदस्य म्हणूनच वागणूक मिळू लागली.अस्लम, शब्बीर ,आसिफ आणि महमुदाबहनची आई मला त्यांच्या मुलांतला एक अशी वागणूक देवू लागली.मी त्यांना चाची म्हणायचो.सणवार किंवा कुणी पाहुणे आले की खाण्याचा खास बेत असायचा. बिर्याणी ही तांबोळी परिवाराची खासियत! पण मी पक्का शाकाहारी असल्याने पंचायत व्हायची. तेव्हा चाची म्हणायच्या ,” राजा,बेटा तू चिंता मत कर.तेरे लिये हैं मिटेल चावल बनाती!”… पुढे.मिठे चावलचा सिलसिला चालूच राहिला.. चाचीचा तो आपलेपणा,जिव्हाळा आणि आईची माया मनात खोलवर घर करुन राहिली. मिठे चावलचा तो स्वाद आजही कुणी माझ्याकडून हिरावून घेवू शकत नाही. आपण शून्य असताना जो संस्कार आपल्यावर घडतो,तो आयुष्यभर टिकतो.चाची आणि तांबोळी परिवाराच्या त्या काळातील सहवासाने जातीच्या पलिकडे जावून विचार करायला शिकविले.प्रेम, आपलेपणा,विश्वास आणि माणुसकी हिच “अस्सल जात”,हा संस्कार चाचींच्या मिठे चावलने माझ्यावर घडविला.काळ लोटत गेला.दुनियादारीच्या रहाटगाडग्यात मीही राज्यभर फिरत राहिलो. कधी कुठल्या लग्न समारंभात चाची भेटल्या की प्रेमपूर्ण रागात म्हणायच्या, “अरे राजा,तू मित्रा नहीं रे!”…परवा चाचींच्या निधनाची बातमी समजली आणि मन जड झाले.

चाची…महेबूबबी हाजी अब्दुल गनी तांबोळी..माजी नगरसेविका..पाच पिढ्यांना, शे-पन्नास कुटुंब सदस्य आणि प्रत्येक सदस्याच्या मित्रांच्या कुटुंबांनाही आपल्या प्रेमाच्या बंधनात बांधून ठेवणारी माऊली!.. त्यांच्या निधनाने गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास अगदी काल परवाची गोष्ट वाटावी,इतका ताजा झाला…राऊळ गल्ली.. रमजानभाई व अ.गनी वकील साहेब यांचे एक आणि लतीफभाई यांचे एक,अशी दोन मोठी तांबोळी घराणी!..पै.अमिनभाई (माजी नगराध्यक्ष),शकूरभाई, इक्बालभाई,पै.उस्मानभाई ही पै.रमजानभाईंची मुले त्यांना आम्ही भाई म्हणायचो. पै.अ.गनी वकील साहेब (माजी नगराध्यक्ष) हे भाईंचे लहान भाऊ, त्यांना आम्ही बाबा म्हणायचो. डॉ.अस्लमभाई, उद्योजक शब्बीरभाई आणि विद्यमान लोकप्रिय नगराध्यक्ष असिफभाई ही बाबांची मुले. तर पै.लतीफभाई (माजी नगराध्यक्ष) यांच्या घराण्यातील शफिकभाई, रफिकभाई,युसूफभाई,शकिलभाई,पै.अय्युबभाई,रौफभाई ही त्या काळातील तरुण पिढी क्रिकेटमध्ये सक्रीय होती. माझे मित्र डॉ.अस्लम बडबडे,उत्साही, शब्बीर आक्रमक,परखड तर आसिफ शांत आणि सोशिक असे त्यांचे लहानपणचे स्वभाव!पण तिघांच्याही स्वभावात दोस्ती आणि आपलेपणा ठासून भरलेला होता.त्याचे कारण होते चाचींचे संस्कार! त्याच संस्काराने आसिफभाई तांबोळी हा सर्वांना आपला घरचा माणूस वाटणारा नगराध्यक्ष बार्शीला दिला.चाचींच्या संस्कारांची संपत्ती आमच्या पिढीला मिळाली.ती पुढच्या पिढ्यांनी अथिक संपन्न करणे, ही खरी श्रद्धांजली! आदरणीय चाचींना भावपूर्ण आदरांजली!!

*राजा माने.*











