आमदारांचे निलंबन रद्द..
सरकारने मतदारसंघातील जनतेची माफी मागायला पाहिजे – आ. अभिमन्यू पवार
जिल्हाभरात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष
औसा, -(प्रतिनिधी)- आघाडी सरकारने षडयंत्र रचत भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना विधिमंडळातून निलंबित केले होते.दि.२८ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने हे निलंबन रद्द केले असून या निर्णयाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी स्वागत केले आहे. मागच्या दाराने सत्ता मिळवून ती असंवैधानिकपणे राबविण्याच्या आघाडी सरकारच्या प्रयत्नांना हा मोठा धक्का असून सरकारने आम्हा १२ आमदारांच्या मतदारसंघातील जनतेची माफी मागायला पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.

यापूर्वीच न्यायालयाने १२ आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय असंवैधानिक असून या संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का पोहोचवणारा तसेच आमदारांना नाही तर मतदारसंघातील जनतेला शिक्षा देणारा हा निर्णय आहे अशा शब्दांत आघाडी सरकारवर ताशेरे ओढले होते.यानंतर दि.२८ जानेवारीला सदरील १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. हा निर्णय येताच लातूर जिल्ह्यासह आमदार अभिमन्यू पवार यांच्या लातूर शहर संपर्क कार्यालय, औसा व कासारसिरसी येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले.आमदार अभिमन्यू पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करीत आमच्या अधिकारांचे रक्षण केल्याबद्दल विनम्रतापूर्वक आभार मानले आहेत.हा लोकशाहीचा विजय असून सरकारने आम्हा १२ आमदारांच्या मतदारसंघातील जनतेची माफी मागायला पाहिजे.’सत्यमेव जयते’ आशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.





