वडवळ नागनाथ, दि.२० – येथील पूर्वमुखी जागृत हनुमान मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही उद्या सोमवार (दि.२० ते मंगळवार (दि.२८) या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज शास्त्री (वृंदावन धाम) यांची श्रीमद् भागवत कथा होणार आहे. मंगळवार (दि.२८) रोजी श्री “लक्ष्मण शक्तीचा” कार्यक्रम होणार असून, या धार्मिक कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
या सप्ताहात दररोज सकाळी सहा ते सात “श्री” चा अभिषेक, सात ते साडेदहा ज्ञानेश्वरी पारायण, अकरा ते बारा तुकाराम गाथा भजन, एक ते पाच या वेळेत ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शास्त्री वृंदावन धाम यांची भागवत कथा, सायंकाळी पाच ते सहा भावार्थ रामायण, सहा ते सात हरिपाठ, रात्री नऊ ते अकरा या वेळेत सोमवार (दि.२०) भगवान महाराज महाळंगीकर, मंगळवार (दि.२१) वेदसंपन्न बापुदेव महाराज बेलगावकर, बुधवार (दि.२२) माधव महाराज अष्टेकर, गुरुवार (दि.२३) कालिदास महाराज पाळेकर, शुक्रवार (दि.२४) महादेव स्वामी महाराज सलगरकर, शनिवार (दि.२५) अमोल महाराज कारेपुरकर, रविवार (दि.२६) सौ.अनुराधाताई महाराज विळेगावकर, यांची हरिकीर्तने होणार आहेत. रात्री बारा ते साडेतीन बैठकी संगीत भजन, पहाटे साडेतीन ते सहा काकडा आरती होईल.

सोमवारी (दि.२७) सकाळी दहा ते एक ह.भ.प. माणिक महाराज उजनीकर यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर संतोष रेड्डी यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप होईल. मंगळवार (दि.२८) सकाळी सहा ते पाच या वेळेत “श्री लक्ष्मण शक्ती” चा कार्यक्रम होऊन सार्वजनिक महाप्रसादाचे वाटप होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हनुमान मंदिर समिती व सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
