जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्तता द्या – आ अभिमन्यू पवार
उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना..
औसा -( वृत्तसेवा)- काही दिवसापूर्वी आ अभिमन्यू पवार यांची लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्तता देण्यात यावी, शासकीय आदेशात वीरशैव लिंगायत सोबतच लिंगायत व हिंदू लिंगायत या शब्दांचा समावेश करण्यात यावा यासाठी सरकारकडे आपण पाठपुरावा अशी मागणी या शिष्टमंडळाने केली होती.
यानुसार आमदार अभिमन्यू पवार व आमदार विजय देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत सदरील मागणीचा पाठपुरावा केला यावेळी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्तता देऊन लिंगायत समाजातील खुल्या प्रवर्गातील नागरिकांनाही महामंडळाचा लाभ देण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत.

महायुती सरकारने लिंगायत समाजाच्या कल्याणासाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली पण हे महामंडळ इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत स्थापन करण्यात आल्याने याचा लाभ लिंगायत समाजातील केवळ इतर मागास प्रवर्गातील पोटजातींना होत होता. काही दिवसांपूर्वी लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने आ अभिमन्यू पवार यांची भेट घेऊन जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्तता देण्यात यावी, शासकीय आदेशात वीरशैव लिंगायत सोबतच लिंगायत व हिंदू लिंगायत या शब्दांचा समावेश करण्यात यावा, महामंडळासाठीच्या आर्थिक तरतुदीमध्ये वाढ करण्यात यावी आणि कर्ज मर्यादा १० लक्ष रु. वरून वाढवून २५ लक्ष रु. करण्यात यावी इ.मागण्या केल्या होत्या.
शिष्टमंडळाला दिलेल्या शब्दाप्रमाणे आमदार अभिमन्यू पवार व माजी मंत्री आमदार विजय देशमुख यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उपरोक्त मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्तता देण्यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या निर्णयानंतर लिंगायत समाजातील सर्व पोटजातींना जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा लाभ मिळायला सुरुवात होईल.