आमदार अभिमन्यू पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
लातूरच्या ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ प्रकल्पाला १० कोटीच्या निधीची प्रशासकीय मान्यता
लातूर – लातूरकरांसाठी अभिमानाची बातमी! शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७५ फुट उंचीच्या भव्य पुतळ्याच्या ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ या प्रस्तावित प्रकल्पाला अखेर १० कोटी रुपयांच्या मंजूर निधीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण कामासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून, लातूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या भव्य प्रकल्पासाठी राज्य शासनाने पूर्वीच १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता, मात्र प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने काम सुरू होऊ शकले नव्हते. या बाबत विविध सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाने आमदार अभिमन्यू पवार यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर आमदार पवार यांनी तात्काळ लातूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून सदर कामाला प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती केली होती.यानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’च्या मंजूर कामाला प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर मंगळवार दि.२८ रोजी या १० कोटींच्या मंजूर कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

या संदर्भात आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की, “मला सांगताना आनंद होत आहे की लातूरातील प्रस्तावित ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कार्यात सहकार्य करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, तसेच लातूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानतो.
”आमदार पवार यांनी पुढे सांगितले की, “स्टॅच्यू ऑफ नॉलेजच्या उर्वरित कामासाठी आणखी १२ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून, तो मिळवण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील.”या निर्णयामुळे लातूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आणि ज्ञानाच्या अधिष्ठानाचे प्रतीक ठरणारा हा ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ लातूरचे नवे ओळखचिन्ह बनणार आहे. या पुतळ्यामुळे केवळ लातूरचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्व वाढणार नाही, तर समाजात समानता, शिक्षण आणि प्रेरणेचा दीप म्हणून हा प्रकल्प उजळणार आहे.




