लातूर/प्रतिनिधी : लातूरमध्ये पाणी, कचरा, अस्वच्छता, वाहतूक कोंडी यासारख्या असंख्य समस्या आहेत. अतिक्रमणे, अवैध बांधकामे, वाढती गुंडगिरी देखील लातूरकरांसाठी डोकेदुखी ठरलेली आहे. यावर उपाय योजना करत सामान्य लातूरकरांना सुखसोयी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असताना लातूरचे आमदार व खासदार करतायत तरी काय ? असा प्रश्न सामान्य लातूरकर उपस्थित करू लागला आहे.
लातूरमध्ये आठवडयातून एकदा नळाला पाणी येते. कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नाही, मुख्य रस्ते आणि चौका-चौकात कचºयाचे ढिग साठलेले दिसतात. या कचºयात फिरणारे पशु – प्राणी कचरा रस्त्यावर पसरवतात. दुर्गंधीतून वाट काढत नागरिकांना जावे लागते. प्रत्येक चौकात वाहतूक कोंडी ही दररोजची बाब आहे. प्रमुख चौकातून रस्ता ओलांडायला १५ ते २० मिनीट लागतात. पार्किंगची सोय नाही. वाहतूकीला शिस्त नाही. आधीच अरुंद असणाºया रस्त्यांवर अतिक्रमण करून फुटपाथ गायब करण्यात आले आहेत. त्यापुढे रस्त्यावर पार्किंग आणि मध्यभागापर्यंत फेरीवाले. यातून वाट काढत वाहने चालवावी लागतात. भर रस्त्यावर अनेकांनी अवैध बांधकामे केली आहेत. हे सर्व प्रकार खपविण्यासाठी गुंडागर्दी केली जात आहे. अशा स्थितीत लोकप्रतिनिधींनी नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित असते. पण याबाबत लातूरचे आमदार आणि खासदार यांनी नेमके काय केले ? हा संशोधनाचा विषय ठरावा.

आता मात्र निवडणूकीच्या तोंडावर इतरांनी केलेली कामे स्वत:च्या नावावर खपवत लातूरकरांच्या डोळ्यात धूळफेक करणे जोरात सुरू आहे. काँग्रेसकडून पॉम्प्लेट आणि सोशल मीडियातून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महानगरपालिका बकाल का झाली ? हा काँग्रेसचा प्रश्न आहे. याचे उत्तर लातूरकरांना ठावूकच आहे. प्रशासकाची तीन वर्षे सोडली तर त्यापूर्वी काँग्रेसच सत्तेत होती. मध्यंतरी अडीच वर्षे भाजपा असली तरी त्यापूर्वी अनेक वर्षे काँग्रेसचेच राज्य होते. मग ठेकेदार मालामाल कसे झाले ? याच उत्तर काँग्रेसनेच देणे अपेक्षित आहे.अनधिकृत बांधकामांना अभय कोणी दिले ? हा प्रश्न विचारणाºया काँग्रेसने ही बांधकामे नेमकी कोणाची आहेत ? हे तपासून पाहिले असते तर प्रश्न विचारायची वेळ त्यांच्यावर आलीच नसती. आपल्या बगलबच्चांना अतिक्रमणे करायला लावून विविध संस्था व शासकीय जागा याच पक्षाच्या नेत्यांनी बळकावल्या. त्यावर आता टोलेजंग इमारती उभ्या आहेत. त्यामुळे हा प्रश्नही निकाली निघतो. आता काँग्रेसने भ्रष्टाचाराला फुलस्टॉप देण्याचे वचन दिले असले तरी काँग्रेसच्या नेत्यांना किती टक्केवारी द्यावी लागते ? हे गुत्तेदार उघडपणे सांगतात. मनपाच्या सेवा घरपोच देण्याची भाषा आता ते करत असले तरी त्यांच्या कार्यकाळात एका कागदासाठी नागरिकांना अनेक महिने चकरा माराव्या लागल्या हे सत्य आहे. प्रत्येक लातूरकरांच्या आरोग्याची हमी घेण्याचा शब्द काँग्रेस देत असली तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव बदलण्यापलिकडे त्यांनी आजवर कुठलीच सुविधा दिली नसल्याचे लातूरकर जाणतात. महिलांना मोफत सिटीबस प्रवास देण्याचा शब्द काँग्रेस देत आहे. पुर्वीही महिलांना ही सुविधा होती. विशेष म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाºया तत्कालिन महापौरांनी जेव्हा ही सुविधा जाहीर केली तेव्हा काँग्रेसच्या आमदारांनी त्यांची कानउघाडणी केली होती, हे मनपा वर्तूळातील उच्चपदस्थांना ठावूकच आहे.

वाहतुकीच्या विषयात तर बोलायलाच नको. घर तिथे रस्ता, नाली, नळ असे आश्वासन देत आता ‘कोपराला गुळ’ लावला जात आहे. पण याच आमदारांनी मागील निवडणुकीत नळाच्या तोट्या चालू करून ठेवा, शंभर दिवसात उजनीचे पाणी आणतो असा शब्द दिला होता. त्याचे काय झाले ? हाही सामान्य लातूरकरांना पडलेला प्रश्नच आहे. निवडणुकीच्या तोंडावर सामान्य नागरिकांना मुर्ख बनविण्याचे उद्योग आता सुरु आहेत. त्याच्याही पुढे जात जी कामे भाजपा सत्तेत असताना किंवा केंद्र आणि राज्यात सरकारने लातूरसाठी मंजूर केली त्या कामांचे श्रेय घेणारे फलकही यांनी लावले आहेत. एका फलकावर तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७५ फुट उंचीचा पुतळा उभारणी पूर्ण करू असे म्हटले आहे. मुळात ही मागणी भाजपाच्या तत्कालिन खासदारांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती तात्काळ मजंूर करून त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी वर्गहीकेला होता. उर्वरित निधी काम सुरु झाल्यानंतर देण्याचे ठरले होते. याच काँग्रेसने त्यावेळी एकाच ठिकाणी दोन पुतळे नको म्हणत विरोध केला होता. हा प्रकार तर ‘चोराच्या उलट्या.…’ असा म्हणावे लागेल. आमदार व खासदार म्हणून जनतेने निवडून दिल्यानंतर त्या माध्यमातून विकास करणे हे कर्तव्य असते. पण सोशल मीडियातून छायाचित्र प्रसारित करत इतरांनी केलेली कामे आपल्या नावावर खपविण्याचे उद्योग लातूरचे आमदार व खासदार करत आहेत. ही बाब आता लपून राहिलेली नाही. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत ‘पळता भुई थोडी’ अशी अवस्था झाली आहे.




