वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी गुणवत्ता यादीची प्रक्रिया सुरु करा-माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- वैद्यकीय प्रवेशासाठी महत्वाच्या असलेल्या नीट परीक्षेचा निकाल लागून दीड महिना झाला तरीदेखील राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नाही. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व त्यांच्या वेळेची बचत व्हावी याकरीता राज्य गुणवत्ता यादीपर्यंतची ही प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरु करावी, अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा क्रमप्राप्त आहे. यावर्षी नीट परीक्षा दि. 12 सप्टेंबरला पार पडलेला असून दि. 1 नोव्हेंबरला त्याचा निकाल लागला आहे. यानंतर होणारी वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया मात्र सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल झाल्याने थांबलेली आहे. या याचिकेवर दि. 6 जानेवारी 2022 रोजी सुनावणी होणार असल्यानेच ही प्रवेश प्रक्रिया सध्या झालेली नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने गुणवत्ता यादीची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी स्थगिती दिलेली नाही. केवळ त्या गुणवत्ता यादीचा निकाल घोषीत करता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन देशातील गुजरात, कर्नाटक यासह इतर राज्याने गुणवत्ता यादी प्रक्रिया पुर्ण करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केलेली असून कांही राज्याची ही प्रक्रिया पुर्णही झालेली आहे. सदर प्रक्रिया पुर्ण झाल्याने विद्यार्थ्यांचा वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी एक ते दीड महिन्याच्या कालावधीची बचत होणार आहे.

देशातील इतर राज्याप्रमाणेच महाराष्ट्र राज्यानेसुद्धा विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत आणि त्यांचे हित लक्षात घेऊन गुणवत्ता यादीची प्रक्रिया पुर्ण करणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदर करत महाराष्ट्र सरकारने ही प्रक्रिया पुर्ण केल्यास निश्चितच विद्यार्थ्यांचे हित साधून त्यांच्या पालकांची व त्यांची फरफट थांबणार आहे. सदर बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता यादीची प्रक्रिया पुर्ण करावी अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


