शेतकर्याच्या जखमेवर सरकारने मिठ चोळू नये-आ. संभाजी पाटील निलंगेकर
पिकविमा कंपनीकडून होणारी आर्थिक लुट व विजतोडणी तात्काळ थांबविण्याची मागणी
लातूर/प्रतिनिधी ः- अतिवृष्टी आणि पुराचे पाणी यामुळे लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील बहुतांश शेतकर्यांच्या शेतात पाणी घुसून त्याचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. या संकटाने शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या त्रस्त झालेले आहेत. त्यातच सरकारने आता शेतकर्यांच्या शेतातील विजजोडणी विद्युतदेयक वसुली करण्यासाठी तोडण्यास सुरुवात केलेली असून शेती नुकसानीचे पंचनामे करण्यास येणार्या विमा कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांकडून शेतकर्यांकडे आर्थिक रक्कमेची मागणीही होऊही लागेलेली आहे. ही बाब म्हणजे शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखे असून, सरकारने तात्काळ याबाबत पिकविमा व महावितरण कंपनीस तात्काळ निर्देश देऊन हे थांबविण्यात यावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पालकमंत्री यांच्याकडे केलेली आहे.
लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात वार्षीक सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. गेल्या कांही दिवसात तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने जलप्रकल्प पुर्ण भरल्याने नदीपात्राद्वारे पाणी सोडण्यात आलेले आहे. अतिवृष्टी व नदीपात्राद्वारे सोडलेले पाणी यामुळे लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये पुरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. पाऊस व पुराचे पाणी शेतात घुसल्याने शेतीपिके पाण्याखाली गेलेली असून अनेकांची पिके पाण्याखाली असून कांहीजणांची वाहून गेली आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकर्यांच्या जमीनीसुद्धा खरडून गेल्याचे पाहण्यास मिळत आहे. जिल्ह्यासह मराठवाड्यात खरीपाचे प्रमुख उत्पन्न असणारे सोयाबीन शेतकर्यांच्या हातातून गेलेले असून शेतकरी आता मानसिकरित्या खचलेला असून आर्थिक संकटातही सापडलेला आहे. शेतकर्यांना दिलासा देऊन सरकारने त्यांना तात्काळ मदत जाहीर करणे गरजेचे आहे. मात्र अजूनही पंचनाम्याच्या नावाखाली सरकारकडून कागदीघोडे नाचविले जात असल्याचे सांगत आता तर शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम सरकारकडून होऊ लागले असल्याचे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले आहे.
शेतकरी अजून पुर व अतिवृष्टीच्या फटक्यातून सावरलेला नसतानाच महावितरण कंपनीकडून विजबिल वसुलीसाठी शेतकर्यांच्या शेतातील विद्युत जोडणी तोडण्यास सुरुवात झाली आहे. तसेच शेती नुकसानीचे पंचनामे करण्यास आलेल्या विमा कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांकडून शेतकर्यांकडे आर्थिक रक्कमेची मागणीही होऊ लागलेली आहे. याबाबतच्या तक्रारी लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक शेतकर्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळेच सरकारकडून त्यांना मदतीच्या माध्यमातून दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम चालू आहे ते तात्काळ थांबवावे अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेली आहे. सदर मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडे पत्रद्वारे करण्यात आलेली आहे.











