शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून महाविद्यालय सुरू होणार
लातूर ;(माध्यम वृत्तसेवा ):- लातूर हे शैक्षणिक हब म्हणून राज्याला परिचित आहे. लातूर पॅटर्न हा राज्यासह देशात गाजला. लातूरमधून देशाला अनेक डॉक्टर्स व इंजिनिअर्स पुरविले जातात. लातूर पॅटर्नमुळे राज्यातील अनेक विद्यार्थी दहावीच्या शिक्षणानंतर लातूरला येण्यास प्राधान्य देतात. लातूरमध्ये मुलींसाठी शासकीस पॉलिटेक्नीक अस्तित्वात आहे.

परंतु त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांना लातूर सोडून इतरत्र जावे लागत असे. ही बाब लक्षात घेऊन आ. अभिमन्यू पवार यांनी लातूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व्हावे यासाठी शासनदरबारी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता. आज तो पाठपुरावा प्रत्यक्षात उतरला असून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून शासकीय पदविका संस्थेत पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्याचबरोबर संस्थेच्या नावातही बदल करण्याची अनुमती दिल्याने आता पुरणमल लाहोटी शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था असे नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी लातूरमध्येच सोय झाली असून त्यामुळे लातूरकरांचे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्वप्नही पूर्ण झाले आहे.
लातूर जिल्ह्यात शैक्षणिक बातावरण असल्यामुळे लातूर शहरात विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अनेक कोर्सेस चालविले जातात. महाविद्यालयाचे कठोर परिश्रम त्याबरोबरच खासगी शिकवणीतील अभ्यासक्रमामुळे जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी डॉक्टर आणि इंजिनिअर्स होण्याचे स्वप्न बाळगून असतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुलींचाही सहभाग दिसून येतो. लातूर शहरात अनेक पॉलिटेक्नीक महाविद्यालये उपलब्ध असून या महाविद्यालयांतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु पुढील शिक्षणासाठी त्यांना पुणे अथवा मुंबई येथे जावे लागते. हीच अडचण ओळखून औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर शहरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असावे यासाठी प्रयत्न चालू केला. तत्कालीन मंत्री विनोद तावडे यांच्याशी पत्रव्यवहार करून लातूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असणे आवश्यक आहे, ही बाब निदर्शनास आणून दिली. आ. अभिमन्यू पवार यांच्या मागणीला सरकारने सकारात्मक घेत शासकीय महाविद्यालय चालू करण्यासाठी पावले उचलली. विद्यार्थ्यांना यापूर्वी शासकीय तंत्रनिकेतनची सुविधा उपलब्ध होती. पुढील शिक्षणासाठी त्यांना पुणे येथे जावे लागणार नाही, यासाठी शासनाने पावले उचलत शासकीय महाविद्यालय चालू करण्यासाठी काल दि. ७ जुलै रोजी अध्यादेश काढत लातूरकरांच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास मंजुरी देऊन सदर महाविद्यालय चालू वर्षात या सुरू होणार आहे. या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नाव आता पूरणमल लाहोटी शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था लातूर असे करण्याच्या प्रस्तावालाही अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी मान्यता दिली आहे. लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला डॉ. बाबासाहेब आबेडकर तंत्रशास्र विद्यापीठ (बीएटीयू), लोणेर विद्यापीठाचीही संलग्रता प्राप्त होण्याचा प्रस्ताव सुध्दा अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात विद्यापीठ सलग्नता (युनिव्र्व्हसिटी अॅफिलेशन) मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे. यामुळे निश्चितच लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी लातूर शहरातच शासकीय महाविद्यालय मिळणार आहे….
