ओबीसींना आरक्षण देण्याची मानसिकता
महाआघाडी सरकारची नाहीच-आ. कराड
लातूर दि.०३–
ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरीम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला. खऱ्या अर्थाने ओबीसींना आरक्षण देण्याची राज्यातील महाविकास आघाडी सरकारची मानसिकता नव्हती. जर न्याय द्यायचा असता तर न्यायालयात परिपुर्ण अहवाल सादर केला असता. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत संघर्ष चालूच राहील असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड यांनी बोलून दाखविले.
ओबीसी आरक्षणासंबंधी राज्याच्या मागासवर्ग आयोगाचा अंतरीम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने आज गुरूवारी नाकारला. न्यायालयाच्या या निर्णयाकडे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील ओबीसी समाजाचे लक्ष लागून होते. मागासवर्ग आयोगाने दोन आठवड्यात अहवाल तयार करून न्यायालयात दाखल केला. राजकीय प्रतिनिधीत्वापासून ओबीसी समाज वंचित आहे असे अहवालातून दिसून येत नाही. अहवालावर असलेली तारीख ही राज्यसरकारला अहवाल सादर केला तेव्हाची आहे. त्यामुळे नेमकी आकडेवारी कधी गोळा करण्यात आली हे यातून स्पष्ट होत नाही असे नमुद करून सदरील अहवाल न्यायालयाने फेटाळला.
निकालाबाबत प्रतिक्रिया देताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे अशी राज्य सरकारची कधीच मानसिकता दिसून आली नाही. राज्य सरकरकडे एक वर्षाचा कालावधी असतानाही ओबीसी समाजाचा इंपेरिकल डेटा गोळा केला नाही. त्याचाच हा फटका बसला असून यामागे कोणाचे तरी निश्चितच षडयंत्र आहे.
राज्य सरकार ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे. गोरगरीब ओबीसी समाजाला न्याय मिळू नये हीच या महाविकास आघाडी सरकारची भुमिका असल्याचे वेळोवेळी दिसून आले. समाजाला न्याय देण्याची भावना असती तर परिपुर्ण अहवाल न्यायालयात दाखल केला असता. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मनात जे होते तेच झाले असेही आ. कराड यांनी बोलून दाखविले.
न्यायालयाकडून आलेला निर्णय हा ओबीसी समाजाला धक्का देणारा आहे, घोर निराशा करणारा आहे. येणाऱ्या निवडणूका ओबीसी शिवाय होणार असल्याने ओबीसी समाजाचे राजकीय भवितव्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. ओबीसींना आरक्षण मिळाले पाहीजे यासाठी आजपर्यंत समाज बांधवांनी वेळोवेळी लढा दिला, संघर्ष केला. जोपर्यंत हक्काचे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. येत्या काळात आक्रमकपणे आंदोलने करून संघर्ष करून आरक्षण पदरात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाहीत असेही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी बोलून दाखविले.