पावसाने प्रचंड नुकसान, पशुधन पिकांसह जमीनी वाहून गेल्या
शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रूपयाची
शासनाने तात्काळ मदत करावी-आ. कराड
लातूर दि. २९- गेल्या कांही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि जलाशयातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे जिल्हयात शेतीचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट नुकसानीत आलेल्या खरीप हंगामातील सोयाबीनसह सर्वच पिकासाठी हेक्टरी ५० हजार रूपये आणि ऊस पिकासह फळबागेसाठी हेक्टरी १ लाख रूपयाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी लातूर यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
लातूर जिल्हयात गेल्या कांही दिवसापासून सातत्याने मोठा पाऊस झाला अनेक भागात अतिवृष्टी आणि ढगफुटी झाली. यामुळे जिल्हयातील सर्वच तालुक्यात हातातोंडाशी आलेल्या खरीप हंगामातील सोयाबिनसह सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. बहुसंख्य शेतकऱ्यांचे ऊसाचे पिक आडवे झाले आहेत. जलाशय तुडूंब भरल्याने मोठया प्रमाणात नदिपात्रात पाणी सोडण्यात आले. यामुळे नदिकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन पिकांचे मोठे नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमीनी पिकांसह वाहून गेल्या. शेतकऱ्याचे पशुधनही पाण्यात वाहून गेल्याच्या अनेक ठिकाणी घटना घडल्या आहेत.
सततच्या पाऊसामुळे आणि अतिवृष्टीमुळे जिल्हयातील सर्वच तालुक्यात शेतीची दाणादाण झाली. सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने खरीप हंगामाचे शंभर टक्के नुकसान झाले असल्याने शासनाने लातूर जिल्हयात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी करून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, खरीपातील नगदी पिकांवर अर्थकारण अवलंबून असलेल्या शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणे नितांत गरजेचे आहे. अतिवृष्टीने जिल्हयात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून या नुकसानीची दखल घेवून तात्काळ मदत करावी त्याचबरोबर पाण्यात वाहून गेलेल्या पशुधनाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी असेही निवेदनात नमुद केले आहे.
अतिवृष्टी, ढगफुटी आणि नदीच्या पुरामूळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात शासनाने वेळ घालवण्यापेक्षा सरसकट नुकसानीत आलेल्या सोयाबीनसह सर्वच पिकासाठी हेक्टरी ५० हजार रूपये आणि ऊस पिकासह फळबागेसाठी हेक्टरी १ लाख रूपयाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देवून दिलासा द्यावा अशीही मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लातूरचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.











