एफआरपी प्रमाणे किती आणि कधी भाव देणार जाहीर करावे
मांजरा कारखान्यावर स्व. बब्रुवान काळे तात्यांचे
स्मारक उभे करण्याचा ठराव मंजूर करण्यात यावा
मांजराच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने आ. रमेशअप्पा कराड यांची सुचना
लातूर दि. २१ – मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची येत्या २५ सप्टेंबर २०२१ रोजी ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होत असून या वार्षिक सभेत मांजरा कारखान्याच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेले स्व. बब्रुवानजी काळे (तात्या) यांचे कारखाना परिसरात स्मारक उभा करण्याचा ठराव मंजूर करण्यात यावा अशी मागणी कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी सभासद आ. रमेशअप्पा कराड यांनी चेअरमन आणि कार्यकारी संचालक यांना लेखी पत्र पाठवून केली आहे.
मांजरा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली झाली. या कारखान्याच्या उभारणीत स्व. बब्रुवानजी काळे (तात्या) यांचा सिंहाचा वाटा राहीला आहे. सतत १५ वर्षे चेअरमनपदी कार्यरत राहून अतिशय नियोजनबध्द पद्धतीने कारखाना चालविला त्यामुळेच संपूर्ण राज्यात मांजरा कारखान्याला वेगळे वैभव प्राप्त झाले आहे असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब आणि स्व. बब्रुवानजी काळे हे दोन्हीही नेते दुर्दैवाने आज हयात नाहीत. लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांचे अतिशय देखणे स्मारक मांजरा कारखान्यावर उभे केले आहे. मांजरा कारखान्याला वैभव प्राप्त करून देणारे स्व. बब्रुवानजी काळे (तात्या) यांचे स्मारक मांजरा कारखाना परिसरात व्हावे ही कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मनस्वी ईच्छा आहे. तेंव्हा २५ सप्टेंबर २०२१ रोजी होणार्या मांजरा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्व. बब्रुवानजी काळे (तात्या) यांचे स्मारक उभे करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
मांजरा सहकारी साखर कारखान्याने गेल्या २०२०-२१ या गळीत हंगामात ५ लाख ७८ हजार ८९६ मॅट्रीक टन ऊसाचे गाळप केले असून ५ लाख ३७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केलेले आहे. कारखान्याकडे गाळपास ऊस आला तेंव्हा शेतकर्यांना प्रतिटन २२०० रु. प्रमाणे ऊसाचे पेमेंन्ट करण्यात आले. त्यानंतर १०९.४० रुपयाचा हप्ता गेल्या महिन्यात शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. असे एकूण शेतकर्यांना प्रतिटन २३०९.४० रु. मिळाले आहेत.
मांजरा साखर कारखान्याच्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल आपण शेतकर्यांना दिलेला आहे. त्यात गेल्या २०२०-२१ या गळीत हंगामातील सरासरी साखर उतारा १०.७१ % दर्शविण्यात आलेला आहे. तेंव्हा सदरील साखर उतार्यानूसार शेतकर्यांना एफआरपीप्रमाणे प्रतिटन ऊसाला किती भाव मिळू शकतो. असे सांगून आ. रमेशअप्पा कराड आपल्या निवेदनात म्हणाले की, शेतकर्यांना एफआरपीप्रमाणे ऊसाचा भाव देणे बंधनकारक आहे. नविन वर्षाचा गळीत हंगाम जवळ आला असतानाही अद्यापपर्यंत शेतकर्यांना एफआरपीप्रमाणे ऊसाचे संपूर्ण बील अदा झालेले नाही. तेंव्हा शासनाच्या नियमानूसार मांजरा साखर कारखान्याने गाळप केलेल्या ऊसाला एफआरपीप्रमाणे उर्वरीत फरकाची रक्कम इतर कोणतेही कारण न सांगता किती आणि कधी देणार हे वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात यावे. अशीही मागणी त्यांनी केली आहे.