इचलकरंजी,जि.कोल्हापूर..
आज मंगलपूर (मलकापूर) येथे 9 गावातील आरोग्य रक्षकांचा प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न झाला. प्रत्येक वाडीसाठी प्राथमिक उपचारासाठी आरोग्य पेटी बनवून देण्यात आली. या प्रशिक्षणासाठी सहा महिला कार्यकर्त्यां व तीन पुरुष कार्यकर्ते स्वखर्चाने वेळ काढून आले होते. दोन तासाच्या प्रशिक्षण वर्गात श्री. नरोत्तम लाटा यांनी उपक्रमाची आवश्यकता व संस्थेचा हेतू विषद केला.

डॉ. राजेश पवार यांनी आरोग्य पेटी त्यातील साहित्य याची माहिती दिली. रुग्णाची प्राथमिक लक्षणे समजून घेणे व त्यावर पेटीतील सूचनेप्रमाणे प्राथमिक उपचार करणे याविषयी मार्गदर्शन केले. काही आणीबाणीच्या प्रसंगी घ्यायची दक्षता पण समजावून सांगितली. अपेक्षेपेक्षा जास्त समजूतदार असलेल्या कार्यकर्त्यांनी योग्य शंका विचारून त्यांचे समाधान करुन घेतले.

आजच्या वर्गात सखाराम झोरे, बापू शिंगाडे, अमोल जंगम, सुनीता शिंदे, अर्चना काळे, शशिकला शिंदे, निर्मला भोसले, आरती झोरे व प्रियांका शेळके यांनी प्रशिक्षण घेतले. या वेळी तालुका सेवाप्रमुख श्री. उत्तम शिंगटे, श्री. महेश विभुते, श्री. प्रशांत शिरापूरम व कु. अश्विनी गुरव उपस्थित होते.

मागील तीन वर्षापासून शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम वाड्या वस्त्यांवर कार्यरत असलेल्या सेवा भारती, इचलकरंजी संचालित डॉ. हेडगेवार फिरले रुग्णालय उपक्रम चांगला मूळ धरू लागला आहे. विविध विषयांची विशेष आरोग्य शिबिरे, शाळा संपर्क, फिरत्या रुग्णालयाच्या मार्गिकेवरील कार्यकर्त्यांच्या बैठका अशा उपक्रमांच्या माध्यमातून संपर्क व संबंध दृढ होत आहेत.
सेवा भारतीचे प्रकल्प समन्वयक नरोत्तमजी यांच्या अनुभवातून कार्यकर्त्यांचा संच हळूहळू उभा रहात आहे.




