औसा – आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे औसा शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर झाला असून या निधीतून औसा शहरातील मुख्य रस्त्याच्या टप्पा ३ अंतर्गत ‘वेस हनुमान मंदिर ते जामा मस्जिद’ रस्त्याचे भूसंपादनासह रुंदीकरण व सुधारणा काम करण्यासाठी तसेच शहरातील गर्दी होणाऱ्या १४ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची बांधकाम करण्यात येणार आहे.
या कामांना निधी मंजूर करण्यात यावा यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुरव्यास यश आले असून राज्य सरकारने मुख्य रस्ता रुंदीकरण कामासाठी ६ कोटी रुपयांचा आणि गर्दीच्या १४ ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी ४ कोटी रुपयांचा असा १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.या १० कोटी निधीमुळे औसा शहरातील मुख्य रस्त्याचे रखडलेले काम मार्गी लागणार आहे तसेच शहरातील सांस्कृतिक सभागृह, बसस्थानक, सनशाईन शाळा, दत्त मंदिर गार्डन, भीम नगर, बौद्ध नगर, कटघर गल्ली गार्डन कॉर्नर, आठवडी भाजीपाला बाजार भरण्याचे ठिकाण, इंदिरा नगर, निलंगा वेस, जमाल नगर गार्डन, मुक्तेश्वर मंदिर परिसर, टी पॉईंट व तुळजापूर मोड इत्यादी ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यात येणार आहे.
सदरील कामांना निधी मंजूर केल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत….




